मालिका विश्वाला आणखी एका धक्का; अभिनेता समीर शर्माची आत्महत्या!

06 Aug 2020 13:28:13

Sameer_1  H x W


पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. ४४ वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.


समीर सर्माने ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राईट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूं - एक बार फिर’, ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक मालिकांत त्याने भाऊ, वडील, नायिकेचा भाऊ अशा व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. मालाडमधील राहत्या घरी किचनमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.


नाईट ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने बुधवारी रात्री त्याचा मृतदेह पाहिला आणि रहिवाशांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या शरीराची अवस्था पाहता समीर शर्माने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच सध्या राहत असलेले घर त्याने फेब्रुवारी महिन्यात भाड्याने घेतले होते, असेही पोलिसांनी सांगितले.


दरम्यान समीर शर्माच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घरात कोणतीही सुसाईड नोटही सापडलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी तो आजारी होता. परंतु आजारपणातून बरा होऊन त्याने मालिकेत पुनरागमनही केले होते. सध्या तो स्टार प्लसवरील ये रिश्ते है प्यार के या मालिकेत काम करत होत. या मालिकेत ते कुहूच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारत होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर त्याने सोशल मिडीयावर पोस्टदेखील लिहिली होती.




Powered By Sangraha 9.0