पुण्यातील हवेली तालुक्यात खवले मांजरांची जत्रा; पाच खवले मांजरांचा बचाव

    दिनांक  05-Aug-2020 19:42:51
|

pangolin_1  H xवन विभाग आणि 'सह्याद्री निसर्ग मित्र संस्था' जनजागृती अभियान राबविणार 


मुंबई (अक्षय मांडवकर) - लाॅकडाऊनच्या काळात पुण्यातील हवेली तालुक्यातील काही गावांमधून पाच भारतीय खवले मांजराचा बचाव करण्यात आला. या परिसरामध्ये अचानक खवले मांजर सापडू लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खवले मांजर संकटग्रस्त प्रजाती असल्याने येत्या कालावधीत वन विभाग आणि वन्यजीव संशोधन संस्थांकडून या परिसरातील गावांमध्ये जनजागृती तसेच खवले मांजर संशोधनाला सुरुवात होणार आहे.
 


pangolin_1  H x

 
 
गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यातील हवेली तालुक्यातील काही गावांमध्ये खवले मांजर आढळून येत आहेत. २७ मार्च रोजी सर्वप्रथम एका गावात प्रौढ खवले मांजर आढळून आले. वन विभागाचे अधिकारी आणि सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण व पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनच्या स्वयंसेवकांनी मिळून या खवले मांजराची नैसर्गिक अधिवासात सुटका केली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांमध्ये या परिसरात चार खवले मांजर आढळली आहेत. ग्रामस्थांनीच प्रसंगावधान राखून या प्रकरणांची माहिती वन विभागाला दिल्याने या प्राण्यांचा जीव वाचला. ३ आॅगस्ट रोजी या परिसरातील एका गावात एक जखमी प्रौढ खवले मांजर सापडले. यावेळी सरपंचांनी महाराष्ट्रात खवले मांजरांवर अभ्यास करणाऱ्या चिपळूणच्या 'सह्याद्री निसर्ग मित्र संस्थे'ला याची माहिती दिली. संस्थेमार्फत ही माहिती वन विभागाला कळविल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन खवले मांजराला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी पुण्यातील 'कात्रज प्राणी अनाथालया'मध्ये उपचारासाठी केली. pangolin_1  H x

 
हवेली तालुक्यातील काही आसपासच्या गावांमधूनच गेल्या तीन महिन्यांमध्ये आम्ही पाच खवले मांजरांचा बचाव केला असून त्यामधील चार ही प्रौढ आणि एक पिल्लू असल्याची माहिती 'सह्याद्री निसर्ग मित्र संस्थे'चे स्वयंसेवक प्रसाद गौंड यांनी दिली. यामधील तीन खवले मांजरांना वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे, तर दोन जखमी प्राण्यांना 'कात्रज प्राणी अनाथालया'मध्ये पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हवेली तालुक्यातील गावांमध्ये अचानक खवले मांजरे आढळू लागल्यामुळे 'सह्याद्री निसर्ग मित्र' संस्थेच्या मदतीने आम्ही या परिसरातील गावांमध्ये जनजागृती आणि संशोधन प्रकल्प राबविणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक पवार यांनी दिली. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये गावकऱ्यांशी बोलून खवले मांजराच्या नेमक्या अधिवासाविषयी माहिती घेतली जाईल. तसेच त्यांना या प्राण्याचे महत्व पटवून देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष खवले मांजराचे बीळ आढळल्यास त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवून प्राण्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. खवले मांजरांना संरक्षण


वन्यजीव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खवले मांजराच्या खवल्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे त्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होते. या शिकारीमुळे आज हा प्राणी जगात संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित झाला आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यामधील प्रथम श्रेणीत हा प्राणी संरक्षित असल्याने त्याची शिकार किंवा तस्करी करणे कायदेशीर गुन्हा आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.