सुशांत प्रकरण अखेर सीबीआयच्या हाती सुपूर्द!

05 Aug 2020 13:07:15
Sushant _1  H x


बिहार सरकारच्या शिफारसीला केंद्र सरकारकडून मंजुरी!

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीसाठी केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात या सर्न्दर्भात माहिती दिली. पटना येथे दाखल केलेला खटला मुंबईत हस्तांतरित करण्यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने सर्व पक्षांना हे प्रकरण हस्तांतरित करण्याच्या मागणीवर तीन दिवसांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. एका आठवड्यानंतर पुन्हा या खटल्याची सुनावणी होणार आहे.


या संदर्भात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सुशांत आत्महत्या प्रकरणी एफआयआर दाखल करणे आणि तपास करणे बिहार पोलिसांच्या अखत्यारीत येत नाही. हे एक राजकीय प्रकरण बनले आहे. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्र पोलिस पुरावे नष्ट करीत असल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला.


मुंबईच्या उपनगराच्या वांद्रे येथे १४ जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमध्ये छतावर लटकलेला आढळला. या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिस व्यतिरिक्त बिहार पोलिसही सामील आहेत. २५ जुलै रोजी सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी रिया चक्रवर्ती, त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह ६ जणांविरूद्ध पटणा पोलिसात मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दिली.


हे प्रकरण पाटणा येथून मुंबईत वर्ग व्हावे यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुशांतच्या वडिलांनी कोर्टात कॅव्हेट दाखल केले होते. यानंतर या याचिकेवर काही आदेश देण्यापूर्वी बिहार आणि महाराष्ट्र सरकारनेही कोर्टाला विनंती केली आहे की त्यांच्या बाजूची सुनावणीही झाली पाहिजे.




Powered By Sangraha 9.0