व्यापाराचे नवे ‘तंत्र’

05 Aug 2020 21:46:05


Microsoft_1  H


चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना डेटा चोरीच्या आरोपाखाली केंद्र सरकारने भारतातून हद्दपार केले. मात्र, जोपर्यंत या अ‍ॅप्सची बाजारातील पोकळी भरून निघत नाही, तोपर्यंत हे प्रकरण संपले, असे समजणे चुकीचे ठरेल. मायक्रोसॉफ्टशी संभाव्य असलेला ‘टीकटॉक’चा करार हादेखील याच प्रकरणाचा नवा अध्याय आहे.



नुकतेच ‘फोर्ब्स’ या मासिकाने जगातील अग्रगण्य असलेल्या १०० ब्रॅण्ड्सची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे, भारतातील एकाही कंपनीला यात स्थान मिळवता आले नाही. ‘ब्रॅण्ड’ जो कंपनीची ओळख बनतो, नाव बनतो, त्याचे मूल्यांकन हे कंपनीची पत (गुडविल) ठरवत असतो. प्रामुख्याने या यादीत पहिल्या पाच कंपन्या या तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत.
 

अनुक्रमे ‘अ‍ॅपल’, ‘गुगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फेसबुक’ जगभरात कोट्यवधी ग्राहक असणार्‍या या कंपन्यांची ‘ब्रॅण्डव्हॅल्यू’ अब्जावधी डॉलर्समध्ये आहे. भारतात ज्याप्रमाणे ‘जिओ’ने आपली पाळेमुळे घट्ट रोवायला सुरुवात केली, अमेरिकन आणि इतर तंत्रज्ञान कंपन्यांनी याचा प्रघात कित्येक दशकांपूर्वीच सुरू केला होता. ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘ट्विटर’, ‘गुगल’, ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ या कंपन्यांनी सुरुवातच एका चढत्या आलेखाप्रमाणे केली. ‘तुम्ही जर ’टीकटॉक’ची विक्री ‘मायक्रोसॉफ्ट’ला केली नाही, तर अमेरिकेत त्यावर बंदी येऊ शकते,’ हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही दिवसांपूर्वीचे विधानही याच घडामोडींमागे महत्त्वाचे आहे.
 
‘टीकटॉक’ची खरेदी ‘मायक्रोसॉफ्ट’ करणार का? ५० अब्ज डॉलर्सला हा व्यवहार होणार का? ‘टीकटॉक’ संपूर्ण अमेरिकन गुंतवणूक असलेली कंपनी बनणार का? ‘टीकटॉक’च्या सहकारी कंपन्यांही ‘मायक्रोसॉफ्ट’ खरेदी करणार का आणि विशेष म्हणजे हा व्यवहार झाल्यानंतर ‘टीकटॉक’ पुन्हा भारतात सुरू होणार का? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांतच मिळू शकतात. परंतु, या घडामोडींमागे सुरू असलेले राजकारण व अर्थकारण, जगातील सर्वात दुसरी मोठी बाजारपेठ म्हणून समजून घेणे गरजेचे आहे.
 
कोरोना-लॉकडाऊन आणि अन्य कुठलेही संकट डिजिटल तंत्रज्ञान कंपन्यांचे काहीही वाकडे करू शकले नाही. याउलट या माध्यमांना गेल्या सहा महिन्यांत अधिक बळ मिळत गेले. ‘फेसबुक’ आणि ‘गुगल’ची जिओमधील गुंतवणूक अन्य तंत्रज्ञान क्षेत्रातील जिओ कंपनीतील गुंतवणूक या गोष्टी सरळ स्पष्ट करून देते. भारत हा डिजिटल कंपन्यांसाठी जगातील प्रमुख बाजारापेठांपैकी एक मानला जातो. त्यामुळे कुठल्याही कंपनीला किंवा देशाला भारताला नाराज करून व्यवसाय करणे शक्य नाही.
 
कोरोनामुळे चीनविरोधात उठलेली एक संतापाची भावना तिथल्या कंपन्यांनाही याचा चटका लावणारी आहे. अर्थात, ‘टीकटॉक’ची ‘पॅरेंट कंपनी’ ‘बाईट डान्स’लाही या गोष्टी माहिती आहेत. ‘टीकटॉक’ आपले मुख्यालय चीनमधून हलवण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून करत आहे, याउलट आता चिनी गुंतवणूक काढून घेऊन संपूर्णपणे मालकी हक्कच अमेरिकेला देऊन टाकणार का? याचेही उत्तर आपल्याला मिळणार आहे.
 
‘मायक्रोसॉफ्ट’चे सीईओ सत्या नाडेला यांची नजर ‘टीकटॉक’वर फार पूर्वीपासूनच आहे. यापूर्वी त्यांनी ‘माईनक्राफ्ट’ आणि ‘लिंक्डइन’ या दोन सोशल मीडिया कंपन्या विकत घेतल्या. २०१४ पासून सीईओ बनलेले सत्या नाडेला यांनी एक ‘किंगमेकर’ची भूमिका कंपनीत निभावली. आजवरचा इतिहास पाहता ‘टीकटॉक’ खरेदी करण्याची ही संधी ते दवडू देणार नाहीत. याला जोड मिळाली ती त्यांना मिळालेल्या पाठबळाची!
 
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच ’टीकटॉक’ ‘मायक्रोसॉफ्ट’ला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. डेटा सुरक्षेच्या मुद्द्यावर अमेरिका तडजोड करत नाही, याबद्दलचा इतिहास आहे. ‘टीकटॉक’वर ज्याप्रमाणे डेटाचोरीचा आरोप झाला, तो कलंक पुसरण्याचे आवाहन ‘मायक्रोसॉफ्ट’ पुढे असणार आहे. या घडामोडींकडे पाहता, भारतीय तंत्रज्ञान कंपन्या कल्पकतेच्या स्पर्धेत मागे पडत आहेत की काय असे चित्र उभे राहते. डिजिटल क्षेत्रासाठी असलेली सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या देशात जिओव्यतिरिक्त अद्याप कुठल्याही कंपनीला स्पर्धा करणे तर दूरच स्पर्धेत उभे राहणेही समजले नाही. यासाठी हा व्यवसाय आणि व्यवसायाचे नवे तंत्र समजून घेणे गरजेचे आहे.
 
 

Powered By Sangraha 9.0