रामजन्मभूमी आंदोलन : एका कारसेवकाचे मनोगत

    दिनांक  04-Aug-2020 23:39:59
|


babari_1  H x W
 
 

आज, दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत भरतवर्षाचे आराध्यदैवत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीवर निर्माण होणार्‍या भव्य मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या देशातील हिंदूंनी शेकडो वर्षे उराशी बाळगलेले भव्य राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. स्वातंत्र्य आंदोलनानंतर सर्वात प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाची सांगता, सर्व अडथळे पार करत या ५ ऑगस्ट रोजी होईल. गेल्या ४९२ वर्षे चाललेल्या शेवटच्या ४० सक्रिय वर्षांतील सहभागी कारसेवक व साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले, ही मी माझी पूर्वपुण्याई समजतो.१५२८ साली (मीर) बाकी ताशकंदी या मुघल आक्रमक बाबराच्या उझबेक सरदाराने रामजन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून तिथे तीन घुमटाची इमारत उभी केली. त्यानंतर सुरू झाला रामजन्मभूमी मंदिरासाठीचा प्रदीर्घ संघर्ष. मधल्या ३०० वर्षांत अनेकदा हिंदू जन व साधू यांनी जन्मभूमीसाठी बलिदान केले. १८५३ साली निरमोही आखाडा या साधूच्या संघटनेने या जागेवर पुन्हा ताबा मिळविला, ज्यामुळे अयोध्येत मोठी दंगल उसळली व त्यावेळच्या इंग्रज सरकारने १८५५ साली रामजन्मभूमी जमिनीचे हिंदू व मुसलमानांमध्ये दोन भाग केले. १८८३ मध्ये पुन्हा हिंदू समाजाने या जागेवर मंदिर बांधकामासाठी आंदोलन उभे केले. मधल्या काळात या बाबरी इमारतीत मुस्लीम समाजाकडून कुठल्याही प्रकारची प्रार्थना केली जात नव्हती. १९४९ मध्ये बाबरीच्या बांधकामात रामललाची मूर्ती स्थापित झाली व तिची पूजाअर्चा सुरू झाली. ज्यामुळे पुन्हा तणाव निर्माण होऊन प्रशासनाने टाळे लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही हजारो हिंदू रामललाचे दर्शन बाहेरून घेत होते व या ठिकाणी पूजाअर्चा करत होते.
१९८० साली विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन करण्याचा निर्धार केला व या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १९८१ साली तमिळनाडूतील मानिक्षिपुरं येथील सामूहिक धर्मांतराने हिंदू समाज खडबडून जागा झाला आणि देशात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्यक्रम व आंदोलनाची मालिका विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर सहयोगी संघटना यांनी सुरू केली.

 


या कार्यक्रमांच्या मालिकेत १९८३ सालच्या देशभर विविध ठिकाणी काढलेल्या एकात्मता यात्रा आणि भारतमाता व गंगापूजनाच्या कार्यक्रमांचा मोठा वाटा होता. मला मुंबई येथील चौपाटीवर झालेल्या भव्य कार्यक्रमात व्यासपीठ व्यवस्थेत काम करायची संधी मिळाली. १९८५ साली शाहबांनो खटल्याचा निकाल व त्याची स्व. राजीव गांधी यांच्या काँग्रेस सरकारने पाशवी बहुमताच्या आधारे केलेल्या पायमल्लीमुळे देशभर संतापाची लाट उसळली. त्यातच फेब्रुवारी १९८६ ला फैजाबाद जिल्हा न्यायालयाने रामजन्मभूमीचे टाळे उघडण्याचा निर्णय दिला व हिंदू समाजामध्ये चैतन्याची लहर निर्माण झाली.


जून १९८९ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या पालामपूर (हिमाचल प्रदेश) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेत रामजन्मभूमीचा विषय आपल्या विषयपत्रिकेत घेतला व त्यासंबंधी एक ठराव पारित केला. मी, या काळात भारतीय जनता पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता या नात्याने काम सुरू केले होते. दरम्यान, ९ सप्टेंबर १९८९ला विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत शिलान्यासाचा कार्यक्रम केला व या आंदोलनाला गती प्राप्त झाली.


१९९० हे वर्ष रामजन्मभूमी आंदोलनासाठी अतिशय महत्त्वाचे व धकाधकीचे वर्ष होते. विश्व हिंदू परिषदेने अशोक सिंघलांच्या अध्यक्षतेत ऑक्टोबर १९९० मध्ये अयोध्येत कारसेवा करण्याचा निर्धार जाहीर केला.


मी भाजपचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून ठाणे ग्रामीण भागात संघटनमंत्री या जबाबदारीवर कार्यरत होतो. प्रत्येक गावातून श्रीराम लिहिलेली शिला कारसेवेपूर्वी अयोध्येत जावयाची होती. शिलापूजनाचे कार्यक्रम देशभर प्रत्येक गावात सुरू झाले, ठाणे ग्रामीणमधील वनवासी भागातही मोठा उत्साह होता. मी त्यावेळेस तेथे कार्यरत असलेले रा. स्व. संघाचे प्रचारक राजाभाऊ एकांडे यांच्यासोबत पूर्ण ग्रामीण भाग दुचाकीवरून पिंजून काढत होतो. वाडा, मोखाडा, जव्हार, सूर्यमाळ, शहापूर, डहाणू, बोईसर, पालघर, बोरडी भागातील जवळजवळ सर्व गावांत शिलापूजनाचे कार्यक्रम झाले. ‘सोगंध राम की खाते हई, मंदिर वही बनाएंगे’, ‘बच्चा बच्चा राम का, जन्मभूमि के काम का’ या घोषणांनी कार्यक्रम स्थान दणाणून जायचे. ऑक्टोबर १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा सोमनाथ ते अयोध्या या मार्गावर मार्गस्थ झाली. या रथयात्रेचे कार्यक्रम मुंबई व ठाणे जिल्ह्यातही झाले. आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग या यात्रेत होता. सर्व यात्रा कार्यक्रमात जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा व सहभाग होता.


रथयात्रा व पूजन केलेल्या शिला अयोध्येच्या दिशेने मार्गस्थ झाल्या व कार्यकर्त्यांना वेध लागले ते कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याचे. ऑक्टोबर २१ ते ३० पर्यंत अयोध्येत कारसेवा आयोजित केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी अयोध्येत कारसेवकांना येऊ देणार नाही, अशी वल्गना केली होती. अडवाणींच्या रथयात्रेने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. या सर्व घटनांमुळे अयोध्येला जाण्याचा कारसेवकांचा निर्धार दृढ झाला होता. काही करून आपण अयोध्येत जाऊन कारसेवा करायचीच, हा निश्चय कारसेवकांनी केला होता. ठाणे जिल्ह्यातून आम्ही कारसेवक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघालो. रात्रीची गाडी होती, सकाळी गाडी झांसी स्थानकात पोहोचली. अचानक पोलिसांनी गाडीला घेरले व आम्हा सर्वांना उतरवून बसेसमध्ये कोंबले व ललितपूरच्या दिशेने नेले. ललितपूरमध्ये एका शाळेचे जेलमध्ये रूपांतर करून आम्हा सर्वांना तिथे ठेवले. जवळजवळ १२ दिवस आम्ही तिथे होतो. देशभरातील अनेक ठिकाणचे कारसेवक तिथे होते. मुलायमसिंह यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचे जेलमध्ये रूपांतर केले होते. मध्ये मध्ये रेडिओवर आम्हाला बातम्या कळत होत्या. अडवाणींना २३ ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये समस्तीपूर येथे अटक झाली होती. अयोध्येला जाणारे सर्व रस्ते रोखले गेले होते. या सर्व विपरीत परिस्थितीमध्येही अनेक कारसेवक चालत व लपतछपत अयोध्येच्या दिशेने चालले होते. अनेक साधूंचा या आंदोलनात सहभाग होता. या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंना आपल्या दैवताच्या मंदिर मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर लढा द्यावा लागतोय, हे सारे जग पाहत होते. कारसेवेच्या दिवशी जे कारसेवक व साधू अयोध्येला गेले, त्यांच्यावर गोळीबार झाला. १६ कारसेवकांचे बलिदान त्यात झाले. रामजन्मभूमीचा लढा एका निर्णायक वळणावर गेला. अयोध्येतील गोळीबाराच्या घटनेनंतर हा लढा कारसेवकांचा न राहता, सर्वसामान्य हिंदू जनतेचा झाला, ज्याचे प्रत्यंतर आम्हाला ललितपूरमध्ये मिळाले. ललितपूर जिथे आम्हाला ठेवले होते, ते बुंडेलखंडातले एक छोटेसे शहर. पण, तिथल्या जनतेचे जे प्रेम आम्हाला लाभले ते विसरणे शक्य नाही. कारसेवक एका मोठ्या कार्यासाठी दुरून आलेत ते आपले अतिथी आहेत व त्यांचा आदरसत्कार आपण केला पाहिजे, ही भावना ललितपूरमधील घराघरांतून आम्हाला दिसली. असेच अनुभव इतर कारसेवकांना अन्य ठिकाणी आले.


१९९०ची पहिली कारसेवा व १९९२ची दुसरी कारसेवा यामध्ये रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या कार्यक्रमाची मालिका विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता पक्षाने आखली होती, ज्यामध्ये नवी दिल्ली येथे ‘संसद घेराओ’ हा एक कार्यक्रम होता. मधल्या काळात १९९१ मध्ये श्री नरसिंहरावांचे काँग्रेस सरकार व उत्तर प्रदेशात कल्याणसिंह यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार स्थापित झाले होते. १९९२ची कारसेवा ६ डिसेंबरला होणार याची घोषणा झाली. मी, त्या वेळेस भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता व युवा मोर्चाचा मुंबई संघटन मंत्री होतो. १ डिसेंबर १९९२ दरम्यान आम्ही मुंबईचे कारसेवक विविध रेल्वे गाड्यांतून अयोध्येच्या दिशेने रवाना झालो. कल्याणसिंह सरकारने कारसेवेला परवानगी दिली होती व केंद्रातील सरकारला व कोर्टाला बाबरीला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, ही ग्वाही दिली होती. कारसेवा होणार; पण ती शरयूतील वाळू शिलान्यासाच्या ठिकाणी टाकून होणार या स्वरूपाची होती. 


दि. ४ डिसेंबरला आम्ही कारसेवक अयोध्येला पोहोचलो. आमच्या परळ भागातील कारसेवकांची निवास व्यवस्था रामजन्मभूमीच्या सर्वात जवळ शरयूकिनारी एक गुरुद्वारात केली होती. ४ डिसेंबरला अयोध्या कारसेवकांनी भरली होती. जवळपास दीड ते दोन लाख कारसेवक देशातल्या विविध भागातून अयोध्येत दाखल झाले होते. ‘मंदिर वही बनाएंगे’च्या घोषणांनी सर्व वातावरण दुमदुमले होते. हजार वर्षांच्या गुलामगिरीत देशभरात उद्ध्वस्त झालेल्या हजारो मंदिरांचे गाडले गेलेले खांब व खंडित मूर्ती त्या घोषणांनी थरारून उठल्या असतील. समाजपुरुषाचा निर्धार व हुंकारांचा अनुभव आम्ही सर्व घेत होतो. 


दि. ४ व ५ डिसेंबरला आम्ही अयोध्येतील सर्व मंदिरे पाहून घेतली, ज्यामध्ये हनुमान गढीचे मंदिर प्रमुख होते. तसेच, दि. ५ ला संध्याकाळी रामललाचे डोळे भरून दर्शन घेतले. दि. ६ डिसेंबरला सकाळी कारसेवेपूर्वी विश्व हिंदू परिषद व रामजन्मभूमी न्यास यांनी एका सभेचे आयोजन केले होते. आम्ही सर्व कारसेवक शरयूत अंघोळ करून कारसेवेसाठी व सभेसाठी बाबरी ढांच्यासमोरील पटांगणात जमलो. सभेला व्यासपीठावर अशोकजी सिंघल, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, प्रमोद महाजन, गोविंदाचार्य व इतर नेते तसेच विविध मठांचे आणि आखाड्यांचे साधू जमा झाले होते. एकेक नेत्याचे भाषण होत होते, अचानक मैदानात बसलेले कारसेवक व व्यासपीठावरचे नेते हे बाबरीकडे पाहू लागले. भाषण करणारेदेखील आपले भाषण सोडून तिकडे पाहू लागले, कारण तिन्ही घुमटांवर काही कारसेवक व साधू चढले होते आणि त्यांनी बाबरी इमारतीवर घाव घालायला सुरुवात केली होती. खालून पोलीस व व्यासपीठावरील नेते त्यांनी खाली उतरावे व नंतर आपण कारसेवा शांततेत पार पाडणार आहोत म्हणून विनंती करत होते. पण, कुणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. रामजन्मभूमीसंबंधीचा ५०० वर्षांचा राग त्यांच्या कृतीतून दिसत होता. अचानक बांध फुटावा, तसे कारसेवक घुमटाच्या दिशेने धावले व सापडेल त्या वस्तूने आपल्या ताकदीप्रमाणे बाबरीवर प्रहार करू लागले. आम्ही सर्व विस्मयाने व चकित होऊन या घटनेकेडे पाहत होतो. कारसेवकांचे जथ्थे गुणाकाराने त्या वास्तूला भिडत होते. कुणीतरी रामललाची मूर्ती सुरक्षित स्थळी हलवली होती. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तिन्ही घुमट कारसेवकांच्या झंझावातासमोर पडले होते व संपूर्ण इमारत भुईसपाट झाली होती. ‘जय श्री राम, हो गया काम’ ही घोषणा आसमंतात दुमदुमली. मधल्या काळात दिल्लीवरून सूत्रे हलली होती. अयोध्येजवळ फैजाबादमध्ये तैनात केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या अयोध्येच्या दिशेने येत होत्या. भाजपची चारही राज्यांतील सरकारे केंद्र शासनाने बरखास्त केली. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती शासन लागू झाले. जवळपासचे अनेक कारसेवक त्याच दिवशी अयोध्येतून बाहेर पडले. ६ डिसेंबरला रात्री अयोध्येला केंद्रीय राखीव दलाचा वेढा पडला.


आम्ही रामजन्मभूमीच्या सर्वात जवळ असलेले कारसेवक त्या रात्री झोपलो नाही. रात्री २-३च्या सुमारास आमच्यासकट अनेक कारसेवक जन्मस्थानाजवळ जमले व सर्वांनी घोषणा देऊन उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या विटा व माती गोळा करून बाजूला टाकण्याचे काम केले. सकाळपर्यंत जागा साफ झाली व आश्चर्य म्हणजे १५२८ साली उद्ध्वस्त झालेल्या मंदिराचे काळे कोरीव खांब दिसायला सुरुवात झाली. अनेक भग्न मूर्ती आम्हाला त्यात सापडल्या. एक ऐतिहासिक कार्यात सहभागी झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होते. झोप, थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. पुन्हा आम्ही कारसेवक आपल्या ठिकाणी परत गेलो. अयोध्येत तोपर्यंत केंद्रीय राखीव दलाचा प्रवेश झाला होता. संपूर्ण अयोध्येला एक छावणीचे रूप आले होते. आम्ही सर्वात शेवटी ९ डिसेंबरला अयोध्येतून निघालो. अयोध्या, फैजाबाद, लखनौ, प्रयाग मार्गे आम्ही कुर्ला टर्मिनस येथे १२ डिसेंबरला आलो. मुंबईत संचारबंदी लागू झाली होती.


६ डिसेंबरची घटना रामजन्मभूमी आंदोलनाचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर सुरू झाली गेली २८ वर्षे चाललेली न्यायालयीन लढाई ज्याची सांगता दि, ९ नोव्हेंबर २०१९ रोजी आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने झाली. ५ फेब्रुवारी २०२० ला संसदेत त्यासंबंधीचा ठराव व आता बरोबर सहा महिन्यांनंतर दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी होणारे भूमिपूजन. बाबरी पतनानंतर सगळीकडे काहूर उठवणारी मंडळी, त्यानंतर पाकिस्तान व बांगलादेशात जी शेकडो मंदिरे पाडली गेली, त्यावर मात्र चूप होती. हीच दुहेरी नीती त्यांच्या पतनास कारण होती. या सर्व आंदोलनात एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करायची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. मला या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक नेत्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली व त्यांचा सहवास लाभला. ज्यामध्ये सर्वश्री लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, आचार्य गिरीराज किशोर, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, गोविंदाचार्य, जगतप्रकाश नड्डा, धरमचंद चोरडिया, शेषाद्री चारी, विनय सहस्रबुद्धे, कारसेवकांबरोबर ललितपूरच्या जेलमध्ये राहिलेले राम कापसे, सर्वांशी गप्पा मारणारे ललितपूरमधले साधू, रा. स्व. संघाचे दामुअण्णा दाते, सोमनाथ खेडकर, राजाभाऊ एकांडे तसेच कारसेवक रवींद्र व मंगेश हे पवार बंधू.


या समारंभानिमित्त ज्यांची स्मृती जागवली पाहिजे, असे सर्वश्री मोरोपंत पिंगळे, अशोक सिंघल, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस व असंख्य कारसेवक ज्यांच्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले.


माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाच्या आठवणी मनात मोरपिसासारख्या जतन करून ठेवल्या आहेत. या आंदोलनात सामील समाजसिंधूतला मी एक बिंदू एवढीच भूमिका माझी आहे.
 

- सूर्यकांत जगताप

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.