स्टंट सोडा, 'तुंबई'वर कायमचा तोडगा काढा !

    दिनांक  04-Aug-2020 18:49:35
|
aditya thackeray Left sid
 
 
 
 
मुंबई : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईत आता काहीशी उसंत घेतली आहे. अवघे काही तास सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली. लॉकडाऊनमुळे मुंबईकर बाहेर पडले नसले तरीही अत्यावश्यक सेवेत बाहेर फिरणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला. या सर्व गोष्टींची पहाणी करण्यासाठी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महापौर गुडघाभर साचलेल्या पाण्यात पाहणी करण्यासाठी पोहोचले. 
 
 
मात्र, फोटोसाठी असली स्टंटबाजी सोडा, परळ हिंदमाता-दादर या भागात तुंबणाऱ्या पाण्याचा नेमका तोडगा काढा, असा टोला नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी महापौरांना लगावला आहे. भाजप प्रवक्ते नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी मुंबई महापालिकेच्या भोंगळ कारभाराची पोलखोल केली आहे. मुंबईत कुठेही पाणी तुंबत नाही. पाणी साचते पण लगेच निघून जाते, असा दावा करणाऱ्या महापौर किशोरीताई पेडणेकर या स्वतःच हिंदमाता, परळ भागात गुडघाभर पाण्यात उभ्या आहेत. 
 
 
उगाच स्टंट करण्यापेक्षा ठोस उपाययोजना करा. पाऊस कमी पडो की जास्त भरती असो की ओहोटी पाऊस पडला की मुंबईची तुंबंई होतेच. ब्रिमस्टोवॉड अहवाल व चितळे समितीच्या शिफारशीनुसार एकात्मिक कामे न करता कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी केवळ piece meal work केल्यामुळेच कुठेही पूरस्थिती आटोक्यात आलेली नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
 
 
मुंबई महापालिकेची तिजोरी उपसण्याचे धंदे कंत्राटदारांकडून सुरू असल्यानेच ही वेळ आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. आयुक्तांकडून नालेसफाई ११३ टक्के केल्याचा दावा केला जातो, म्हणजे नाल्याच्या तळात खणून 13% खोल सफाई झाली का ? डिवॉटरिंग पंप रात्रभर बंद फक्त दिवसा सुरू ? पाणी उपसतात व पाणी फिरून तेथेच येते!, या प्रकारावर त्यांनी ताशेरे ओढले आहेत. दरवर्षी तुंबई होणाऱ्या या भागांचे नियोजन करून प्रश्न सोडवा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.