पालीच्या दोन नव्या प्रजातींचा उलगडा; राज्यातील तरुण संशोधकांचे यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020   
Total Views |

gecko _1  H x W


गेल्या आठ महिन्यात पालीच्या नऊ नव्या प्रजातींचा शोध 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी आंध्रप्रदेशातून पालीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. आंध्रप्रदेशातील ऋषी व्हॅली परिसरातून उलगडलेल्या या पाली 'निमास्पिस' आणि 'हेमिडॅक्टिलस' या पोटजातीमधील आहे. या पालींचा उलगडा केलेल्या तरुण संशोधकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरेंचा समावेश असून या संशोधकांच्या चमूने यंदा पालीच्या नऊ नव्या प्रजाती उलगडल्या आहेत. 
 
 

gecko _1  H x W

 
राज्यातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी भारतात आढळणाऱ्या पालींच्या प्रजीतीमध्ये दोन नव्या प्रजातींची भर घातली आहे. अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि तेजस ठाकरे यांनी आंधप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातून पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. संशोधक इशान अग्रवाल यांना २००७ मध्ये ऋषी व्हॅली परिसरातील ऋषी व्हॅली स्कूलनजीक असलेल्या ग्रेनाईटच्या खडकाळ पठारावर या पाली सर्वप्रथम आढळल्या होत्या. या पाली त्यांना आंध्रप्रदेशात अस्तित्वात असलेल्या 'निमास्पिस' आणि 'हेमिडॅक्टिलस' या गटातील पालींसारख्या वाटल्या होत्या. २०१९ साली या परिसरात पुन्हा एकदा संशोधन कार्यासाठी गेलेल्या संशोधकांचा चमूला या पालींमध्ये वेगळेपण आढळून आले. या पालींचे नमूने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत गुणसूत्र (डीएनए) आणि आकारशास्त्राच्या आधारे तपासणी करण्यात आली. यावेळी या दोन पाली विज्ञानासाठी नवीन असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. 
 


gecko _1  H x W

 
 
ऋषी व्हॅलीमधून या पालींचा शोध लावल्याने आम्ही त्यांचे नामकरण 'निमास्पिस ऋषीव्हॅलीएन्सिस' आणि 'हेमिडॅक्टिलस ऋषीव्हॅलीएन्सिस केल्याची माहिती संशोधक अक्षय खांडेकर याने दिली. या दोन्ही नवीन प्रजाती आंध्रप्रदेशमध्ये आढळणाऱ्या 'निमास्पिस' आणि 'हेमिडॅक्टिलस'या पोटजातीमधील तिसर्‍या प्रदेशनिष्ठ प्रजाती आहेत. ग्रेनाईटच्या दगडावर त्या अधिवास करत असून निशाचर असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. नव्या पालींच्या शोधाचे वृत्त शु्क्रवारी ‘झूटाक्सा’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले. 'निमास्पिस' या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हणतात. या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाली. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहज वेगळ्या ओळखून येतात. भारतातील इतर पालीची बुबुळे उभी असतात.
 
gecko _1  H x W 



देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. मात्र, आंध्रप्रदेशमधून नव्याने शोधलेली 'निमास्पिस ऋषीव्हॅलीएन्सिस' ही पाल निशाचर आहे. येथील भौगोलिक क्षेत्रात सकाळचे तापमान अधिक असल्याने या पालीने स्वत:ला रात्रीच्या वेळेत वावरण्यासाठी विकसित केल्याचे खांडेकर यांनी सांगितले. ‘निमास्पिस’ या कुळातील पश्चिम घाटाबाहेर सापडलेली ही १३ वी प्रजात आहे. भारतामध्ये ‘निमास्पिस’या कुळातील आजवर ५० प्रजातींची नोंद झालेली आहे. त्या पश्चिम घाट, मैसूरचे पठार, पूर्व घाटातील काही भाग, आसाम, अंदमान आणि निकोबर बेटांवरती आढळतात. त्यांचे मुख्य खाद्य हे कीटक असून त्या नैसर्गिक अन्नसाखळीचा महत्वाचा भाग आहेत. तर 'हेमिडॅक्टिलस' या पोटजातीमध्ये भारतात सुमारे ३५ प्रजातीच्या पाली सापडतात.

@@AUTHORINFO_V1@@