अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील नायक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |


Anna Bhau Sathe_1 &n

 


शब्दाला आपलं करून शब्दाला वाचा देणारं, शब्दांची खाण, शब्दांची जाण आणि बहुजन समाजातील संघर्षाची धगधगती आग आणि वास्तव जीवनातील सत्य घटनांवर आधारित अण्णा भाऊ साठे यांनी कथा आणि कादंबऱ्यांचे लेखन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील नायकाला लढा मान्य होता रडगाणे नाही. त्यांच्या साहित्यातील नायक हा दलित, शोषित, वंचित समाजाचा आहे. परंतु, स्वाभिमानाने जगणारा आहे. इतरांसाठी लढणारा आहे, त्यागी समर्पित भावना ठेवून वेळ पडली तर जीवसुद्धा देणारा आहे.


अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य तरुण पिढीला आदर्श ठरत आहे. मराठी साहित्यातील दलित, शोषित, कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज... उपेक्षित, वंचित समाजाचे दुःख, वेदना यांना वाचा फोडण्याचे आणि त्याला साहित्याचा विषय बनवून वंचित बांधवाला ‘नायक’ करणारे अण्णा भाऊ यांच्या साहित्यनिर्मितीमागे तत्त्वज्ञान आहे. समतेचा दृष्टिकोन आहे. अण्णा भाऊ यांच्या साहित्यातील नायक हा वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा आहे. समतेचा आणि ममतेचा व अतिशय संवेदनशील मनाने मानवतावादी विचारावर जगणारा आहे. मानवतावादी तत्त्वज्ञान आणि जग बदलण्याची जिद्द अण्णा भाऊ यांच्या नायकामध्ये आपल्याला दिसून येते. ध्येयवादी लढवय्ये आणि स्वाभिमानी जीवन जगणे हा मूलमंत्र उराशी बाळगणारा अण्णा यांच्या कादंबरीचा नायक होता. ‘वारणेचा वाघ’, ‘फकिरा’, ‘गुलाम’, ‘वैर’, ‘अघात’, ‘आवडी’, ‘आग’, ‘आघात’, ‘संघर्ष’, ‘वारणेच्या खोऱ्यात’, ‘चंदन’ आणि ‘माकडीचा माळ’ या अशा असंख्य कादंबऱ्यांमध्ये...बहुजन समाजाचे वंचित, शोषित कष्टकरी नायक आपल्या समोर मांडले आहेत.

 
 

‘वारणेच्या खोऱ्यात’तील नायक हा लढणारा आहे. त्या नायकाच्या साहसाचं चित्रण करणारा त्यांच्याकडे वास्तववादी जीवन दृष्टिकोन आहे. ‘वारणेच्या खोऱ्यात’ प्रतिसरकार स्थापन करणाऱ्या हिंदुराव हे ध्येयवादी आणि लढवय्ये आहेत. ते शक्तिमान आणि नीतिमान, देशप्रेमी व त्यागी समर्पित आहेत. क्रांतिकारी हिंदुरावांनी तरूणांची चळवळ उभी करून सरंमजाशाही वृत्तीच्या विरुद्ध बंड पुकारले आहे. मूळचे शेतकरी असलेले हिंदुराव बंडखोर आणि अन्यायाविरूद्ध लढणारे आहेत आणि शोषित लोकांना त्यांचे हक्क प्राप्त करून देणारा नायक म्हणून हिंदुराव अण्णा भाऊ साठे यांनी मांडला आहे. तसेच ‘फकिरा’ हा मानवतावादी विचारांवर चालणारा अतिशय संवेदनशील तसेच धाडसी नायक आहे. सत्य घटनेवर आधारित ही वास्तववादी कादंबरी आहे. ग्रामपातळीवर संघर्षाची कथा आहे. गावाला समृद्धी मिळाली पाहिजे.

 
 

तसेच गावाचा सामाजिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा म्हणून ‘फकिरा’चे वडील आपल्या जीवाची पर्वा न करता गावाला जत्रेचा मान मिळाला पाहिजे म्हणून राघोजी आपला जीव गमावतात आणि गावात इज्जत मिळवतात. परंतु, गावातील जातीयवादी उतंरडीच्या झळा पुढे चालून गरिबांना कशा भोगायला भाग पाडतात आणि उपाशी पोटी मरणयातना भोगायला लावतात. त्यामुळे ‘फकिरा’सारखा बलाढ्य तरूण मजबूर होऊन चोरी करतो. अस्पृश्यांच्या वाट्याला आलेली अवहेलना, गुलामी, अपमान नाकारून त्याविरूद्ध बंड करून पेटून उठणारा महानायक ‘फकिरा’ हा मानवतावादाचे प्रगल्भ दर्शन देणारा आहे. सहकाऱ्यांना सोबत घेऊन स्वाभिमानाने पराक्रमाने,धाडसाने लढणारा ‘फकिरा’हा क्रांतिनायक आहे. वाटेगावची शान आणि आदर्श आहे.

 
 

‘फकिरा’ हा नैतिकता जपणारा, तसेच आपल्या अजस्त्र ताकदीचा महामेरू आणि दीनदलितांसाठी व उपेक्षित समाजासाठी लढणारा धैर्यशील जननायक आहे. ‘फकिरा’ हा नायक दुष्काळ आणि रोगाच्या साथीत अडकलेल्या मांग, महार, रामोशी समाजाला जगवण्यासाठी धान्यची गोदामं लुटतो आणि ते धान्य सर्वांना समान वाटतो. ही त्यांची न्यायिक भूमिका तरूणांना आदर्श ठरत आहे. गोरगरीब समाजाला उपासमार होत आहे म्हणून आणि ब्रिटिश गरिबांना त्रास देत आहेत म्हणून ‘फकिरा’ यांनी सोबतीला जीवलग मित्र घेऊन ब्रिटिशांचा खजिना लुटला. आणि गोरगरिबांना समान वाटला. त्यामुळे चिडलेल्या ब्रिटिश सरकारने ‘फकिरा’ला पकडण्यासाठी गावातील गरिबांना डांबून ठेवले. ही बातमी ‘फकिरा’ला समजली आणि आपल्यामुळे निष्पाप माणसाचे बळी जातील म्हणून ‘फकिरा’ स्वतः समर्पित झाले आणि गोरगरिबांना समाजाला सोडून देण्याची इच्छा व्यक्त केली. अशा अतिशय प्रामाणिकपणे समाजासाठी जीव देणारी माणसं अण्णा भाऊ यांनी आपल्या साहित्यात मांडली आहेत. ‘वारणेचा वाघ’मधील सत्यबा हा कुणबी समाजाचा आहे. परंतु, अन्यायाच्या विरोधात बंड करणारा नायक आहे. पोटात बाळ असताना महार समाजाच्या स्त्रीवर अन्याय होतो आहे. भर उन्हात तो प्रस्थापित नराधम त्या असाहाय्य महिलेला मारत आहे ही घटनाच सत्यबाला सहन झाली नाही आणि मारणाऱ्याचा खून करून ‘वारणेचा वाघ’ बनलेला नीतिवान सत्यबा म्हणजे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील महानायक आहे.

 
 

आवडीचा धनाजी जीवाची पर्वा न करता आवडीच्या खुनाचा बदला घेतो. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते श्रेष्ठ आहे हा संदेश देणारी धनाजी हा प्रेमिकांसाठी आदर्श नायक ठरला आहे. ‘वैर’ कादंबरीमध्ये इमानदार व त्यांना साथ देणारे गरिबांना कसे फसवितात हे चित्र रेखाटलेले आहे. तसेच आपसातील वैर नष्ट व्हावे देश सुखी संपन्न व्हावा, हेवेदावे संपुष्टात यावे आणि येथे नंदनवन फुलावे, ही भावना अण्णा भाऊ यांनी मनात ठेवून त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे. ‘माकडीचा माळ’ ही कथा एका भटक्या समाजातील यंकु माकडवाल्याची आहे. या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे, सुगीच्या दिवसात गावाच्या बाहेर पाल ठोकून राहणाऱ्या फिरत्या जमातीचे जगण्याचे चित्र आहे. तसेच नीतिसंपन्न तरूणाची कहाणी आहे. माणसापेक्षा जनावर आणि पशुपक्ष्यांवर प्रेम करावं हा संदेश देणारी कथा आहे. यंकु माकडवाल्याच्या दुर्गावर प्रेम करणारा नायक प्रेमाचं पावित्र्य जपतो. यंकु माकडवाला आणि दुर्गावर जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येतात, तेव्हा यमु दुर्गावर प्रेम करणारा त्यांना निःसंकोचपणे मदत करतो. त्यांच्या पाठीशी उभा राहतो. पोटासाठी रानोमाळ भटकणारे जीवन व्यवहारातही यंकु आणि दुर्गाची निष्ठापूर्वक अव्वल दर्जाची तीही अतिशय प्रामाणिकपणे प्रेमाचे पावित्र्य जपणारी कहाणी आहे. मुळात ती प्रेमकहाणी वाटत असली तरी भटक्या जातीतली पालात राहणार, पण स्वाभिमानी जीवन जगणारे माकडवाल्याची दुःखद कहाणी आहे. अन्यायाविरोधात उसळणारी आणि मातीशी इमान राखणारी पात्रे अण्णा भाऊ यांनी आपल्या साहित्यात रेखाटली आहेत, त्या साहित्यातील व्यक्तिरेखा गरीब आहेत, पण लाचार नाही. अन्यायाविरोधात बंड करणारे आहेत. ‘जुलमाचे सांगा कारण, मग खुशाल द्यावे मरण’ हे ठणकावून सांगणारे पात्र म्हणजे खरोखर प्रामाणिकपणाचे कळस होते. कारण, दिलेला शब्द पाळला पाहिजे म्हणून आपल्यालाही वेळ प्रसंगी मरण आले तरी चालेल हा संदेश देणारा सर्व बहुजन समाजातील उपेक्षित नायक म्हणजे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील आत्मा होते. म्हणूनच जसा जंगलाचा राजा सिंह, पक्ष्यांचा राजा मोर, फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब, तसेच शब्दांचा राजा, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे होते. अण्णा भाऊंनी जनसामान्यांच्या वैचारिक वावरात, प्रतिभा आणि प्रतिमेची पेरणी केली. तसेच संघर्षाच्या गोफणीने विषमतावादी टोळ्यांना पिटाळून लावले. तळागाळापर्यंत बहुजनांना जागे करण्यासाठी त्यांनी लोकप्रबोधन करणारे साहित्य लिहिले...

 
 

- जोशिला लोमटे

 
@@AUTHORINFO_V1@@