माझी मैना गावावर राहिली

    दिनांक  31-Aug-2020 13:13:24
|


Anna bhau Sathe_1 &n

 

 


अण्णा भाऊ साठे म्हणजे एक थोर व्यक्तिमत्त्व होते. समाजव्यवस्थेमुळे त्यांना कुठलीही ज्ञानाची, शिक्षणाची परंपरा लाभली नाही. त्यामुळे त्यांना घराण्याचा वैचारिक वारसा मिळालेला नव्हता. त्याकाळी ‘महार- मांगांची कला’ म्हणून ढोलकी- तुणतुणे आणि तमाशा हेच गणित होते. अण्णा भाऊंना जेमतेम वाचता येत होते. तरीही त्यांनी दलितांच्या,वंचितांच्या उद्धारासाठी आपली लेखणी झिजवली. त्यांचे लिखाण साचेबंद नव्हते, तर जनआंदोलनात सक्रिय असलेले ते कार्यकर्ते असल्याने त्या काळातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर भाष्य करणारे त्यांचे लेखन होते. त्यांच्या लेखणीने इतिहास घडवला. अण्णा भाऊ फक्त कुठल्या एका समाजाचे, जातीचे नव्हते तर ते समस्त जगातील कष्टकऱ्यांचे, पीडितांचे, शोषितांचे प्रतिनिधी होते. अशा या महान, वंदनीय लेखकाला, कवीला माझे विनम्र अभिवादन! त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान लिहिलेल्या ‘माझी मैना गावावर राहिली’ लावणीचे मी रसग्रहण करणार आहे. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तरी सर्व वाचकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, ही नम्र विनंती.

 


‘माझी मैना गावावर राहिली...’ लावणीचे शीर्षक जरी आठवले तरी डोळ्यांसमोर येते की, एक रांगडा तरूण आपल्या अत्यंत प्रिय पत्नीला सोडून कामानिमित्त गावापासून दूर मोठ्या शहरात जातो आहे. त्या दोघांनाही भावी विरहाची कल्पना भेडसावते आहे. अर्थात, वरकरणी हेच चित्र आहे.. पण ही ताटातूट इतकी वैश्विक आहे की, तो रेखाटलेला विरह कोणत्याही विरहाशी तादात्म्य पावतो. अण्णा भाऊंचे साहित्य संवेदनशील, सामाजिक, क्रांतिकारी आहेच. पण ‘माझी मैना गावावर राहिलीने त्यांच्या साहित्याला एक अजोड बुद्धिवाद अर्पण केला. पोटासाठी घरकुटुंब सोडणाऱ्या कोणत्याही गृहस्थाला हा पोवाडा आपलाच वाटेल. पण, त्याचवेळी या पोवाड्याने संयुक्त महाराष्ट्राच्या असंख्य बुद्धिशील कृतिशील विचारवंतांनाही हा पोवाडा आपल्यासाठीच आहे, असे वाटायला लावले. शब्द तेच, आशय तोच, मात्र या पोवाड्याची व्याप्ती प्रिय पत्नीसाठी विरहाने झुरू पाहणारा पती ते कारवार निपाणी बेळगावसह महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा लढा लढणाऱ्यांच्या भावनांना जोडणारा आहे. हे जोडणे म्हणजे साहित्यातला एक अजरामर निर्मिती आहे.

 
 
‘माझी मैना गावावर राहिली’मध्ये नवरा कामाधंद्यासाठी गाव सोडून शहराकडे निघालेला आहे. सोबत तो पत्नीला घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे तिच्या विरहात त्याच्या जीवाची तगमग होते आहे. पुढे तो आपल्या पत्नीचे अगदी सुंदर शब्दांत वर्णन करत आहे. माझी पत्नी अगदी सुबक बांध्याची आणि गौरवर्णाची आहे. मी तिचा राम आणि ती माझी सीता आहे. माझी पत्नी जणू एखाद्या कोरीव पुतळ्याप्रमाणे तिची छबी आहे. यापुढील कडव्यामध्ये हा तरुण जेव्हा मुंबईला जाण्यासाठी निघतो, त्यावेळी काय काय घडले याचे वर्णन केलेले आहे. तो म्हणतो की, गरिबीमुळे आमची ताटातूट झाली. वेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मैना सोबत निघाली. गावाच्या वेशीपर्यंत आल्यानंतर मात्र तिचे मन नाराज झाले. आता आपले पती आपल्यापासून दुरवणार या भीतीने तिचे मन पोखरून टाकले. मी तिला खूप हसवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिला अनेक वचने दिली. पत्र लिहिण्याची आश्वासने दिली. सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्याचे आमिष दाखवले. मुंबईला गेल्यानंतर परत येताना शिंदेशाही तोडे, गळ्यात घालण्यासाठी वज्रटिक, कोल्हापुरी साज, पुतळ्यांची माळ आणण्याची बोली केली. पण, तरीही तिची कळी काही खुलली नाही आणि मी तसाच जड अंतःकरणाने मुंबईला जायला निघालो. पण, माझी पत्नी मात्र मनातून खूप खचली होती. तिच्या गालावर जराही हसू नव्हते आणि नजरेत मला दु:खाची झालर स्पष्टपणे जाणवत होती. मला निरोप देण्यासाठी खिन्न मनाने ती फक्त हात उंचावून उभी होती. तिची ती नजर माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हती.
 
 

 

गरिबीने ताटातूट केली आम्हा दोघांची

झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची

घालवित निघाली मला माझी मैना

चांदनी शुक्राची।

गावदरिला येताच कळी

कोमेजली तिच्या मनाची

शिकस्त केली मी तिला हसवण्याची

 
प्रिय पत्नीशी इतक्या गुजगोष्टी करूनही हसली नाही. ताटातूट झाली म्हणून ती उदासच राहिली. तिच्या मन:स्थितीचे वर्णन करताना अण्णा तिची उदास प्रतिमा तंतोतंत शब्दांत मांडतात.
 

परि उमलली नाही कळी

तिच्या अंतरिची

आणि छातीवर दगड ठेवून वाट धरिली मी मुम्बैची

मैना खचली मनात ती हो रूसली डोळ्यात

नाही हसली गालात हात उन्चावुनी उभी राहिली

 
 
मुंबईत आल्यावर मात्र त्याला तिथल्या परिस्थितीची जाणीव झाली. पोटापाण्यासाठी आलेल्या अनेक लोकांमध्ये त्याचीही भर पडली. इथेही मोठ्या प्रमाणावर नोकरीसाठी आलेले बेकार लोक होते. ज्याप्रमाणे एखाद्या प्रक्षेत्रावर टाकण्यासाठी फक्त मूठभर माती मिळावी, अशी अवस्था झाली होती. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. बेळगाव, निपाणी, कारवार आणि गोव्यासह एकभाषिक राज्य निर्माण होण्याची चळवळ उभी राहिली. ही चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्याविरूद्ध मग कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गाची आणि सर्व मराठी माणसांची फौज उभी राहिली. नामशेष करण्यासाठी सर्वजण निधड्या छातीने पुढे सरसावले. त्यात मीही सहभागी झालो. प्रसंगी मी अंगावर गोळीही झेलली आणि त्यावेळेस पण त्याला पत्नीची खूप आठवण झाली. हेच कवीने खालील कडव्यात मांडलेले आहे. मात्र, ते मांडताना मुंबईचे केलेले वर्णन आजही जीवंत वाटते. त्यामुळे पहिल्यांदा मुंबईबद्दल काय म्हणतात ते आपण पाहू. ते म्हणतात -
 
 

ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनाराची, शेंदिची, दाढीची

पुस्तकाच्या थंडीची, माडीवर माडी। हिरव्या माडीची।
पैदास इथे भलतीच चोरांची

 

एतखाऊची। शिरजोरांची
हरामखोरांची भांडवलदाराची
 
 
पण, याचवेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. बेळगाव, कारवार, निपाणीसह मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि राहणार यासाठी अभूतपूर्व लढा सुरू झाला. कारवार, निपाणी आणि बेळगाव हे महाराष्ट्राचे अतूट प्रेम आहे आणि ते महाराष्ट्राशी जोडलेले आहे. त्याचा विरह मराठी माणसाला सहन होणारच नाही. तत्कालीन सरकारने क्रुरतेची परिसीमा गाठली. अण्णा भाऊ वर्णन करतात-
 

त्याच दरम्यान उठली चळवळ
संयुक्त महाराष्ट्राची

 

बेळगाव,कारवार,निपानी,गोव्यासह एकभाषिक राज्याची

चकाकली संगीन अन्यायाची

फौज उठली बिनिवारची

कामगारांची,शेतकऱ्यांची,मध्यमवर्गियांची

उठला मराठी देश आला मैदानी त्वेष

वैरी करण्या नामशेष

गोळी डमडमची छातीवर झेलली

माझ्या जीवाची होतिया काहिली

 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊ साठे स्वत: सक्रिय होते. त्यामुळे त्यावेळी झालेला संगर त्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता, सोसला होता आणि तेच त्यांनी पुढील कडव्यात मांडलेले आहे. ते म्हणतात की, “सत्ययुगात रावणाची लंका अधर्मीपणे, गर्विष्ठपणे वागल्यामुळे नामशेष झाली. अजय असणारा त्याचा पुत्र इंद्रजित याचीही हत्या करण्यात आली. जुलमीपणे, जबरदस्ती करणाऱ्यांची घरे बुडाली आणि तसेच कलियुगात घडले. मुख्यमंत्री असणाऱ्या मोरारजी देसाईंची व स. का. पाटलांची पण तशीच गत झाली,” असे अण्णा भाऊ साठे परखडपणे मांडतात. शेवटी सत्याचा विजय झाला आणि मुंबई महाराष्ट्राची झाली. अनेकांनी जीवाची पर्वा न करता लढा दिला व स्वतंत्र महाराष्ट्रासाठी बलिदान दिले.
 

म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची, मी-तू पणाची 
जुल्माची, जबरिची

 

चौदा चौकड्याचे राज्य गेले रावनाचे, लंका त्याची जळाली,तीच गत झाली,कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स.का.पाटलाची

अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची

झाली फौंटनला जंग,तिथे बांधुनी चंग,आला मर्दानी रंग,
धार रक्ताची मर्दानी वाहिली

 

माझ्या जीवाची होतिया काहिली

 
 
महाराष्ट्रातील जनतेने पराक्रमाने विजयाची गुढी उभारली. चिवटपणे, शेवटपर्यंत लढण्याची मराठी माणसांची रीत दाखवून दिली. पण, तरीही माझ्या जीवाची तगमग काही थांबली नाही. अजूनही महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या बेळगाव, कारवार, डांग आणि उंबरगावावर दुसऱ्या राज्याचीच मालकी होती. हे प्रदेश परत मिळवण्यात यश आले नव्हते. पण, त्यासाठी सर्वांनी एकीने वागण्याची गरज आहे. इथे अण्णा भाऊ स्वत: शाहीर म्हणून शिवाजी महाराजांच्या या राज्याला व सैनिकांना विनवणी करतात की, आता कुणीही मागे वळून नका, रणांगणात पळू नका, कुणीही भान सोडू नका. अजून पण आपली लढाई शिल्लक आहे.
 

महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची

दाखवली रितं पाठ लावून लढायची

परि तगमग थांबली नाही माझ्या अंतरिची

गावाकडे मैना माझी,भेट नाही तिची

तीच गत झाली आहे
या खंडित महाराष्ट्राची

 

दंगलीची, चिं बेकिची,गरज एकीची

म्हणुन विनवणी आहे या शिवशक्तिला शाहिराची

रणी पळू नका,कुणी चळू नका,
बिनी मारायची अजून राहिली

 

माझ्या जीवाची होतिया काहिली

माझी मैना गावावर राहिली

 
 
हे अण्णा भाऊंचे काव्य म्हणजे त्यांच्या प्रभावी, अभ्यासू प्रतिभेचे उदाहरण आहे. एका पती-पत्नीच्या वियोगाचे चित्रण अतिशय भावस्पर्शी शब्दात मांडले आहे. त्यातूनच चपखलपणे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या गोष्टींशी जोडलेली आहे, जी सामान्यजनांच्या मनात खोलवर पोहोचली. हे काव्य वाचताना प्रत्येकजण त्याच्याशी तनामनाने जोडला जातो. हे काव्य मराठी साहित्यात चिरतरूण टिकून राहणारे आहे. अण्णा भाऊ साठेंनी कथा, कविता, लावणी, वग असे अनेक प्रकारचे साहित्य लेखन केले. त्याकाळात त्यांना तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु, शिक्षण नसतानाही त्यांच्यातील प्रतिभेने त्यांचे लेखन अजरामर केले आहे.
 

- गौरी शिरसाट

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.