अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील नायिका

    दिनांक  31-Aug-2020 14:27:52
|


anna bhau sathe_1 &n

 


अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांमधील स्त्रीनायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. मंगला, वैजयंता, आवडी, चित्रा, रत्ना, चंदना या नायिकांचे जगणे मनाला चटका लावून जाते. पण त्याचवेळी मनाला एक हुरूप देऊन जाते. स्त्री म्हणजे नाजूक, लाडे लाडे बोलणारी, पुरुषांवरच विसंबणारी परावलंबी सजीव, यासारख्या व्याख्येमधून अण्णा भाऊंच्या नायिका स्त्रीची सुटका करतात. त्यांच्यात प्रचंड आंतरिक सामर्थ्य आहे. ‘रांधा वाढा उष्टी-खरकटी काढा’ या चौकटीत तीही आहे, पण त्या चौकटीमध्येही तिचे स्वत:चे धगधगते जगणे आहे. जे जगणे कुटुंबाला जगवते, समाजाला बळ देते. श्रमशक्तीवर विश्वास असणाऱ्या अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका.


अण्णा भाऊ साठे आपल्या लेखनात म्हणतात, “माझी जीवनावर फार निष्ठा आहे. श्रमशक्ती महान आहे. जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतं आणि त्यांचीच झुंज व यशावर माझा विश्वास आहे.” अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्रीनायिका या वचनाला अक्षरश: जागतात. स्त्रीने कसे असावे, याचे नियम अगोदरच समाजाने ठरवलेले आहेत. त्यामुळे अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका या ठरवलेल्या नियमाला व साचेबंदपणाला ठोकरून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

 

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे नाव ऐकताच त्यांनी केलेल्या कामगिरीचा प्रभाव डोळ्यासमोर येतो. प्रचंड लेखन, कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट अशा कथा लिहिल्या म्हणून त्यांना ‘साहित्यसम्राट’ अशा नावाने ओळखले जाते. मराठी साहित्याच्या क्षेत्रात अण्णा भाऊ यांनी स्त्री पात्राचे मनस्वी जीवन मांडले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतील नायिका कथेला अधिक व्यापक करतात. त्यांच्या साहित्यातील स्त्री शालीन आहे, कुलीन आहे, पण ती अन्याय सहन करणारी नाही. परिस्थितीने तिला तोडू पाहिले, पण ती तुटत नाही की वाकत नाही. अण्णा भाऊंच्या साहित्यामधील स्त्री परिस्थितीला आणि तशी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांना न घाबरता स्पष्ट व रोखठोक प्रश्न विचारुन घायाळ करते. खरेतर अण्णा भाऊंच्या काळातील इतर मान्यवर लेखकही कथा-कादंबऱ्यांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा रेखाटत. पण तुमच्या-आमच्या सर्वसामान्यांच्या खऱ्या जगण्यातील स्त्रिया आणि त्यांचे जगणे त्यामध्ये क्वचितच व्यक्त होत असे. अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्री मानी आहे, स्वतंत्र विचार मांडणारी आहे आणि जगणारीही आहे, पण ती स्वैराचारी नाही. समाजातील अनेक प्रकारची बंधने तिच्यावर लादलेली आहेत. स्वत:च्या स्वातंत्र्याकरिता व त्यांच्या अस्मितांसाठी ती जबरदस्त झगडणारी व विजय मिळवणारी स्त्री आहे. मात्र, हे सगळे करताना अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका कुठेही स्वार्थी होत नाही.

 

ती अत्याचाराविरोधात बंड करते, पण संस्कृती, समाज यांची पाठराखणच करते. जगण्यातील अंध:कार ती जाळून टाकते. पण ती कुटुंबातले, समाजातले जनजीवन मानवी मूल्यांनी प्रेरितच ठेवते. वारणेच्या खोऱ्यामधील मंगला ही एक वीरांगना आहे. ती एक क्रांतिकारी मराठी स्त्री आहे. आईबापाची ती लाडकी आहे. तिचा भाऊ तिचा विवाह एका देशद्रोह्यासोबत ठरवतो. त्यामुळे ती त्या विवाहाला नकार देते. स्वत:च्या आयुष्याचा सकारात्मक निर्णय घेणारी अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका आहे. ‘वारणेच्या खोऱ्या’तील लढण्याची तिला पार्श्वभूमी आहे. इंग्रजी साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी घरावर तुळशीपात्र ठेवून बाहेर पडलेल्या हिंदुरावांवरती ती कहाणी आहे मंगला देशासाठी बलिदान देण्यासाठी निघालेल्या हिंदुरावांशी लग्न करते. त्यांना सैनिकांनी चारही बाजूने वेढलेले असताना हिंदुरावांच्या बरोबरीने हातात बंदूक व गळ्यात काडतुसांची माळ घालून लढा देत अण्णा भाऊ यांना प्रसिद्ध नायिकेत स्त्री सन्मान हा समाजपरिर्वतनाच्या हेतूने करण्यात आला. अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यामध्ये स्त्रीला ‘स्त्री’ म्हणण्यापेक्षा ‘माणूस’ हणून रेखाटले आहे. अण्णा भाऊंचे आवडीचे गाणे, त्यांनी स्वत: लिहून प्रसिद्ध केले. ‘माझी मैना गावावर राहिली’ या प्रसिद्ध लावणीत त्यांनी आपली भावना व्यक्त करुन संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून टाकले. एवढेच नव्हे तर स्त्रीबद्दल जगजागृती निर्माण झाली. स्त्री म्हटले की, सर्वप्रथम एकोणिसाव्या शतकात स्त्रीला दुय्यम स्थान समाजात मिळत न तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार होय. मात्र, अण्णा भाऊंनी साहित्यामध्ये स्त्री व्यक्तिरेखांच्या जीवनचरित्र्यात श्रम, घटना, अडथळा, नियम यांनाही चितारले आहे. कोणत्याही प्रसंगात न घाबरता तिच्या इज्जतीसाठी ती मरणाला कवटाळायला तयार आहे. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्याची नावे वेगळी असली तरी त्यांची भावना, गतिमानता स्त्रीवरच रेखाटलेली आहे, मग ती ‘अलगुज’ कादंबरीमधील रंगू असो की ‘गुलाम’मधील मिनाश्री असो की, ‘माकडीची माळ’मधील दुर्गा असो की, ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’मधील अमृ या वेगवेगळ्या संदर्भात अण्णा भाऊंनी स्त्रीनायिका रेखाटल्या आहेत ही तिच्या हृदयात ममतेचे प्रेम व वात्सल्याची भावना आणि अन्यायाविरुद्द लढण्याची प्रेरणा आहे.

 

त्यांच्या सगळ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका या संघर्षशील प्रेरणादायी असल्यातरी त्या एकाच स्तर, गट किंवा समाजातील नाही. त्यांच्या साहित्यामध्ये गरीब, श्रीमंत, कामगार, मजूर, तमासगीर ते देहविक्री करणाऱ्या नायिकाही आहेत. त्यांच्या साहित्यातील काही नायिका समाजसंकेतानुसार कुलीन क्षेत्रातल्या नाहीत. तरीही त्या वाचकांच्या मते अत्यंत श्रेष्ठ आणि प्रेरणादायी ठरतात. कारण एकच, या साऱ्याजणी मानवी शाश्वत मूल्यांसाठी जगतात. ते जगताना त्या स्वत्व, कुटुंब, समाज आणि देश यांच्यासाठी आशादायी चित्र निर्माण करतात.

 

समाजात वावरताना स्त्रियांचे प्रश्न कधीच संपत नसतात. कुटुंबाची, समाजाची असलेली बंधनं तिच्यावर लादली जातात. परंतु, अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका या सगळ्या बंधनातून आपला विकासच करतात. बंदिस्त आकाशामध्ये ती स्वत:चे आकाश निर्माण करते. ‘चित्रा’, ‘आवडी’, ‘मैना’, ‘चंदन’, ‘मथुरा’, ‘रत्ना’, ‘रूपा’, ‘वैजयंता’ आणि अण्णा भाऊंच्या इतरही साहित्य कलाकृतीतील स्त्रीनायिका शोषित, पीडित, वंचित, स्त्रियांनाच नव्हे, तर पुरूषासही जगण्याचे बळ देते. परिस्थितीवर स्वार होऊन जगाला जिंकण्याची ऊर्मी देते. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णा भाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दु:ख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही या जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. मला खूप आश्चर्य वाटते की, ज्याप्रमाणे अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्रिया समस्यांवर मात करतात, त्याचप्रमाणे या वस्ती पातळीवरच्या स्त्रियाही संघर्ष करत असतात. शिक्षण नाही, हाताला काम नाही, बहुतेक घरातले कर्ते पुरूष व्यसनी, या सगळ्या गदारोळात आई, बहीण, पत्नी मुलगी म्हणून स्त्री आजही संघर्ष करते आहे. अक्षरश: नवदुर्गेचे रूप धारण करून समस्यांवर मात करत आहे. आपल्या लेकरा-बाळांना कुटुंबाला सावरत आहे. अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्रीनायिकांचे हे जितेजागते रूप आहे. मुंबईतील गोवंडी परिसर असो की मानखुर्दचे अण्णा भाऊ साठे नगर असो की मलबार हिलच्या सुखासिन वातावरणातील स्त्रिया असोत, आजही अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका या स्त्रियांमध्ये जीवंत आहेत. त्यांचे जगणे खूप वर्षाआधी अण्णा भाऊंनी आपल्या कादंबऱ्यांत जीवंत करून ठेवले आहे, असे वाटते. आज हा लेख लिहिताना इतकेच वाटते की, चौकट आहे, बंधन आहे, संधी नाहीत, पण अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्रीनायिकांचे प्रेरणादायी चिंतन तर समाजासमोर आहे ना? या नायिकांपासून प्रेरणा घेऊन जगणे सुंदर करूया...

 

- ज्योती साठे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.