अण्णा भाऊंच्या साहित्यातील मानवतावाद

    दिनांक  31-Aug-2020 14:10:11
|


Annabhau Sathe_1 &nb

 


प्रत्येक मानवाला स्वातंत्र्य, समता व बंधुताही हवी असते. यात प्राणिमात्रांवरील दया, निसर्गावरील प्रेमही अंतर्भूत आहे. यासच ‘मानवतावाद’ असे म्हटले आहे. आपल्या भारत देशात अनेक राष्ट्र पुरूष होऊन गेले. एक सुसंस्कृत देश म्हणून संपूर्ण जगाचे लक्ष आपण वेधून घेतले आहे. अनेक ऋषी, तत्त्वज्ञानी, महापुरुषांची परंपरा आपणास लाभली आहे. ज्याप्रमाणे ग्रंथातून आपल्याला मानवतावाद दिसतो, तसा साहित्यातूनही आपल्याला मानवतावाद व नीतिमत्ता शिकवण्याचे महान कार्य आपल्याकडील साहित्यिकांनी केले आहे. हेही एक राष्ट्रकार्यच आहे. जे आपल्या राष्ट्रासाठी समर्पित असतात. ‘प्रथम राष्ट्र’, ‘राष्ट्राय स्वाह:’ हाच उद्देश त्यांचा असतो, असे श्रमिक राष्ट्रपुरुष, राष्ट्रसंत या देशात होते व आहेत व होत राहतील. अशा या महामानवामध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मरण होणे हे योगाने येतेच. आपल्या साहित्यातून विश्व ओळख निर्माण करुन घेणाऱ्या अण्णा भाऊंच्या साहित्यातील मानवतावादाच्या पैलूचा आढावा घेणारा हा लेख...


 

कोणतेही शिक्षण न घेता अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यामध्ये सर्वांगीण साहित्य रचना केली आहे. यात त्यांनी शाहिरी, पोवाडे, गण, गवळण, लेख, कथा, कादंबरी नाटक, लोकनाट्ये, प्रवासवर्णन, चित्रपटाच्या पटकथा अशा साहित्यनिर्मितीबरोबरच समाजाला आदर्श जीवनपद्धती देण्याचा प्रयत्न केला आहे. मानवतावाद हा त्यांच्या अंतर्मनात होता. केवळ त्यांनी तो लिहिला नाही, तर तो आपल्या कृतीतून जागविला होता. यासाठी आपण अण्णा भाऊंच्या ३२ कादंबऱ्या, २२ कथासंग्रहं, १६ नाटके व लोकनाट्यं, पोवाडे यातून त्याचा अभ्यास केला असता, त्यांचा मानवतावाद दिसून येतो. अण्णांच्या वैयक्तिक जीवनातील अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी त्यांनी स्वत: एका प्रस्तावनेत म्हटले आहे की, “स्वागत लॉजमध्येे काम करणाऱ्या मुलांचा उल्लेख करणं हे मला जरुरीचे वाटते. इथे राम, परसराम, सीताराम, तुकाराम, अशा चार रामांचे रामराज्य आहे. ही मुले अत्यंत कष्टाळू व प्रेमळ आहेत. ही सर्व मुलं माझ्याशी फार चांगली वागली, त्याबद्दल त्याचं कौतुक करावे तेवढं थोडं आहे.”

 

आपल्या कादंबरीच्या प्रस्तावनेत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या प्रति असलेली अण्णा भाऊंनी प्रकट केलेली ही मानवता दिसून येते. “आपण जे जीवन जगतो, ज्या जीवनाला आपला आणि आपल्या कैक पिढ्यांचा जन्म झाला. ज्या जीवनाचा आपण रोज अनुभव घेतो, तेच जीवन जगणारी बहुसंख्य जनता तिचे विशाल जीवन जगण्याची धडपड व संघर्ष त्यांचे उदात्त विचार हे सारे मी आपल्या लेखनातून मांडतो.” अण्णा भाऊ साठे म्हणतात, “देशाचं स्वातंत्र्य, स्त्रीचे शील, पुरुषाचा स्वाभिमान आणि मानवाची प्रतिष्ठा याबाबत तडजोड नाही. इतिहास त्याला क्षमा करीत नाही. देशाची मान मोडली, स्त्रीचे शील भंगले, पुरुषाचा स्वाभिमान खचला, माणसाची मानच मोडली तर, ताठ मान कुणाची व कशासाठी राहील?” हेच मानवतेचे तत्वज्ञान अण्णा भाऊंनी साहित्यातून जोपासले आहे. आपल्याला हे त्यांच्या कथा व कादंबरीतून दिसून येते. अण्णा भाऊंच्या कथांमधून त्यांनी जो मानवतावाद लिहिला आहे त्यामध्ये काही कथा या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये ‘सावळामांग’, ‘सापळा’, ‘प्रायश्चित’, ‘गुऱ्हाळ’, ‘तमाशा’ या कथा आपण या ठिकाणी विचारात घेऊ. तसेच ‘वारणेचा वाघ’, ‘फकिरा’, ‘डोळे मोडीत राधा चाले’, ‘पाझर’ या कादंबऱ्या, ‘बंगालची हाक’ हा पोवाडा मानवतावादाचे दर्शन घडवितात.

 

‘सावळा मांग’ या कथेमधून स्त्रीचे शीलरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे मांडले गेले आहे. कथेमध्ये इंग्रजांनी सावळाच्या समाजावर तीन वेळा हजेरी देण्याची सक्ती केलेली असते. कारण, ही माणसे इंग्रजी सत्ता उलटून लावण्यासाठी बंड करतात. या जाचक अटी विरुद्ध सावळा बंड करतो व इंग्रजांचे खजिने व त्यांना सहकार्य करणाऱ्या माणसांना लुटतो. त्या खोऱ्यात सावळाचे नाव गाजत असते. असेच एकेदिवशी जयसिंगपूरचा दादा पाटील आपली मुलगी काशीबाई हिला तिच्या सासरी सोडवण्यासाठी टाळगावला जात असताना त्यांची भेट सावळाशी होते. दादा पाटील सावळ्याला ओळखतो व हात जोडून विनंती करतो. तेव्हा सावळा त्याच्या थोबाडीत मारतो व म्हणतो, “तूच तेवढा अब्रदार आणि आम्ही आब्रू सोडलीया असं तुला कोणी सांगितले,” यावर सर्व खोऱ्यात होणारी चर्चा असे दादा पाटील सांगतात. तेव्हा सावळा सर्व हकीकत ऐकून घेऊन काशीबाईला तिच्या सासरी पाठवतो आणि सर्व खोऱ्यातील स्त्रियांचे रक्षण करतो. सर्व गावात समाज स्त्रियांना आदराने वागवू लागतो. हा सावळ्याचा नीतिवाद मानवतावाद ‘सावळा मांग’ या कथेतून दिसतो. ‘सावळा’ या कथेमधून गावामध्ये जातपात, उच्चनीच हा भेद न पाळता ‘मानसांवानी जगू या’ हे गाव ठरवतं. गावातील महार समाजाची माणसं आणि गाव यांच्यात वाद निर्माण होतो. म्हणून गाव समाजाला कोंडीत पकडून त्यांना नमवण्यासाठी सापळा लावतात आणि सर्व महारांचा कोंडमारा करतात, यातून निघण्यासाठी गावातील हरिबा हा सापळा उलटवतो आणि संपूर्ण गावाला सापळ्यात धरतो. तेव्हा गावचा पाटील आपली चूक उमजून ‘मानसावानी’ राहण्याचा निश्चय करतात. अशीच कथा ‘उपकाराची फेड’ नावाचीही आहे. जातपात नष्ट व्हावी, माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जण सन्मानान, स्वाभिमानाने राहावा, हा मानवतावाद या कथेत दिसतो.

 

‘प्रायश्चित’ ही कथा प्रामुख्याने आपल्या मनावर नीतिमत्तेचे जे संस्कार झालेले असतात, ती नीतिमत्ता जपण्यासाठी माणूस वेळेस आपले प्राणही देतो. या कथेत बळी, उमा, सुभद्रा, लिला ही प्रमुख पात्रे आहेत. कामाच्या निमित्ताने ते मुंबईत येतात, पण कुठेच काम मिळत नाही म्हणून ते दगड फोडण्याच्या खाणीत काम करतात. बळीची बायको ही उमाची बहीण व उमाची बायको ही बळीची बहीण असे नाते असते. सर्वजण आनंदाने राहत असतात. ते राहत असलेल्या झोपडपट्टीतील काही गुणांचा उमा व बळीवर प्रभाव होतो व ते दारु प्यायला लागतात. आता हे रोजचे होते. त्यांच्या बायका समजावून सांगतात पण, काही उपयोग होत नाही. हे चौघे जण एकाच झोपडीत पडदा बांधून राहतात. एकेदिवशी विपरीत प्रकार घडतो. दारुच्या नशेत ते काय करतात, हेच समजत नाही. त्या रात्री ते दोघे आपल्याच बहिणीबरोबर झोपतात. जेव्हा हे त्या दोघींना कळते, तेव्हा त्या दोघी उठतात आणि तळ्यात जीव देतात. बळीही दगडाच्या खाणीत आपला जीव देतो. उमाही घर सोडून जातो. आपल्या हातून मोठी चूक झाली, समाजरिती विरुद्ध आपण वागलो म्हणून हे चार जीव आपले जीवन संपवतात.प्रायश्चित करतात.

 

‘गुऱ्हाळ’ या कथेत गावचे दत्ता पाटील हे गावातील मात्तबर पाटील असतात. उसाचे गुर्‍हाळ सुरु झाल्यावर जो येईल त्यास त्यांच्या गुर्‍हाळावर रस, ऊस व गूळ हा मोफत मिळत असे, म्हणून त्यांचे गुर्‍हाळ सुरु झाल्यावर गोरगरीब माणसे तीथे जात. एकदा गावातील एका गरीब बापाची तरुणदेखणी मुलगी पुतळा तीथे जाते. तिच्या देखणेपणावर गावातील एक वाईट प्रवृत्तीचा मुलगा टपून असतो. गुर्‍हाळावर पुतळा पाहताच पाटील आनंदाने तिला हाक मारुन वडिलांची चौकशी करुन रस देतो व काही वेळाने येऊन गरमगरम गुळ घेऊन जा, असे सांगतात. पुतळा आपल्या आजारी बापाला रस नेऊन देते व गुळासाठी परत येते. तेव्हा अंंधार पडत असतो. गूळ घेऊन परत येताना ओढ्यात नेवऱ्या तिच्यावर बळजबरी करतो. तो प्रकार ती घरात सांगत नाही, पण काही दिवसांनी तिला दिवस जातात. तेव्हा मात्र, तिचा बाप व ती दोघं खूप रडतात आणि कुणाला समाजायच्या आत गाव सोडून जाण्याचा निर्णय करतात व वाटेला लागतात. ते असे जाताना दत्ताजी पाटील पाहतात व त्यांना बोलवून विचारतात, तेव्हा पुतळाचे वडील सर्व सांगतात. हे ऐकून पाटील त्यांना थांबवतो व नेवऱ्याला व त्याच्या बापाला जाब विचारून पुतळाबरोबर लग्न लावून देतात. या व अशा अनेक कथांमधून मानवतावाद दिसून येतो. याचबरोबर मानवतेचे विद्रूप स्वरुपही अण्णा भाऊ दाखवतात. या जगात केवळ आपले पोट भरण्यासाठी माणसं काय करतात, त्यांना कोणत्या थराला जावं लागत हेही ‘भोमक्या’, ’सुलतान’, ‘स्मशानातील सोनं’, ‘भुकूल मुलानी’ या कथेमधून आपल्याला जाणवते. माणसं बलवान, धाडसी असूनही नीतिमत्ता सोडून वावगे वागत नाहीत की, कोणाची लूट व चोरी करीत नाही की, दरोडा टाकीत नाहीत. अशा कथा अण्णा भाऊंचा मानवतावाद दर्शवितात. कथांप्रमाणेच अण्णा भाऊंच्या कांदबरी लिखाणातून आपणास मानवतावाद दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने ‘वारणेचा वाघ’, ‘फकिरा’, ‘डोळं मोडीत राधा चाले’, ‘पाझर’, ‘चिखलातील कमळ’ या कादंबऱ्या येतात.

 

‘वारणेचा वाघ’ या कादंबरीत सत्त्तू भोसले हा कुमज या गावचा असतो. आपल्याच गावातील मथाजी चौगुल्या एका तरुण व गरोदर बाईला मारत होता. सत्तू त्याला विनंती करीत होता, पण चौगुल्या ऐकत नव्हता. ती बाई मार खात होती. एकाएकी उठून ती ओरडली “माझ्या पोटात बाळ हाय, मला मारु नंग, मी मरीन. पण, तुमच्या कुंपाला हात लावणार नाय. मला सोडा एवढ्या पावटी सोडा. मी पाया पडते. पदर पसरते. मला माफ करा.” बाईच्या या हंबरड्यानं सत्तूचं काळीज पोखरलं, मस्तक बधीर झालं. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या राक्षसाला मारलाच पाहिजे, यास्तव सत्तूने माथाजी चौगुल्याला ठार केले आणि फरारी झाला. पुढे वारणेच्या खोऱ्यात तो वाघासारखा राहू लागला, अनेक स्त्रियांचे संसार घडीला लावले. अनेक माथेफिरुंना ठिकाणावर आणले. अख्या खोऱ्यातील स्त्रिया सत्तूला आपला भाऊ मानीत होत्या. मानवतेच्या रक्षणासाठी स्वत:चे बलिदान देण्याऱ्या सत्तूची ही कथा एक आदर्श मानवतावाद दाखविते.

 

‘फकिरा’ ही अण्णा भाऊंची सर्वश्रेष्ठ कादंबरी असून त्यांच्याच गावातील शणू मांग(साठे) व फकिरा यांची ती कथा आहे. राणोजी रात्रीचे घरी येताना शंकरराव पाटलांच्या वस्तीवर थांबतो. तेव्हा बोलता बोलता पाटील म्हणतात, “जत्रा काय आपोआप भरत नाय. त्या भरवाव्या लागतात. आपल्याही गावात जोगण्णा भरल्या पाहिजेत आणि त्या भरवण्यासाठी उभ्या गावसी लढा देऊन जोगिणी आणणारा डोंगरागत काळीज असणारा माणूस पायजी.” हे बोेल राणोजीच्या अंत:करणात घुसतात. तेव्हा तो म्हणतो, “मी उद्या शिगवाला जाणार आहे. तुम्ही येता का?” तेव्हा ते म्हणतात, “लोकांच्या आरतीनं ओवाळून घेणं मला बरं वाटत नाही.” राणोजी गाव, जोगणी, शिगाव आणि शिगावात जत्रा भरवणारा बाबाजी असा विचार करीत घरी आला व आपल्या वडिलांच्या बरोबर जेवायला बसला. जेवताना जोगिणीचा विषय निघाला. तेव्हा त्याची सर्व माहिती वडील समजावून सांगतात. त्याचवेळी ‘फकिरा’ही ऐकत असतो व तो म्हणतो,“आनकी गा ती वाटी हिसकन आबा मारु दे डोस्क. परत वाटी आण.” रात्रभर राणोजी विचार करतो जोगणी जत्रा, डोस्क याचा विचार करुन गावच्या आनंदासाठी आपण हे करायचं. गाव आनंदात जगला पाहिजे या उदार मानवतावादातून राणोजी शिगावची जोगिण हिसकवून आपल्या गबऱ्या घोड्यावर बसून वाटेगावकडे निघतात. पण, शिगावची मंडळी नियम मोडून राणोजीचं शिर मारतात. जोगिण वाटेगावच्या हद्दीत येतात. पण, राणोजी राहात नाही. गावच्यासाठी आपलं शिर देणारा राणोजी याठिकाणी मानवतेचे दर्शन घडवून जातो.

 

‘डोळे मोडीत राधा चाले’ या कादंबरीतील राधाही सर्वांच्या बरोबर मनमोकळेपणानं बोलत असते. बोलताना डोळे मोडीत बोलण्याची तिची सवय, तिचे तारुण्य व देखणेपणा व तिचा भोळा स्वभाव हा तिला संकटात आणतो. तिच्या या स्वभावामुळे गावातील गुंड प्रवृतीचे लोक तिच्या मागे लागतात. नवऱ्याचा खून झाल्यानंतर ती पंढरपूरला जाते व पंढरपूरहून परत आल्यावर ती देवधर्मात रमून जाते. पंढरपूरला जाताना वाटेत नारुमामा तिच्यावर आसक्त होतो व रात्रीच्या अंधारात तिच्या शरीरावरुन हात फिरवतो. पण, राधा त्याला जाब न विचारता समजावून सांगते व नारुमामाचे डोळे उघडते. पंढरपूरात ती जगूबुवाचे कीर्तन ऐकते. त्या कीर्तनात जगूबुवा म्हणतात-

 

‘वारियाने कुंडल हाले।

डोळे मोडीत राधा चाले।

 

हे कीर्तन म्हणत ते राधाकडे पाहत होते. तेव्हा ती सवयीप्रमाणे हसत होती व डोळे मोडीत होती. पंढरीहून आल्यापासून राधा नामस्मरणात लीन होते. तिच्या आग्रहास्तव जगूबुवा तिच्या घरी येतात व कीर्तन करतात. जगूबुवा तिच्या या वागण्याने तिच्यावर मोहित होतात. जगूबुवा एके रात्री तिला आपली करण्यासाठी तिला धरतात. तेव्हा, ती शांतपणे त्यांना सांगते, “जमीन उन्हात तापली नी मृग नक्षत्र आलं की ती तापलेली जमीन फुलारते. तिच्यात बी चटकन अंकुर आकार घेतं, हे तुम्हाला ठाव हाय नव्हं. मग माझी जमीन पाच वर्षं तापलीया जर त्या तापल्या जमिनीत पेरलेलं बी टर्रकन रुजलं नि आकार घेतला तर.” पुढं काय जगूबुवांना आपली चूक कळते. कोणत्याही परिस्थितीत आपल्या शीलाच रक्षण करुन ती राहते. आपली नीतिमत्ता सोडत नाही.

 

‘पाझर’ ही कादंबरी गावामध्ये असलेल्या दोन गटातील वैर व त्यातून निर्माण झालेले वाद त्यात फुणगी टाकून आगीत तेल ओतण्याचे काम करणारे, गावात तुकोबा, सकुबा हे दोघे मात्तबर असतात. तुकोबाची मुलगी चंद्रा व सकुबाचा मुलगा नाना याचे प्रेम आणि वैर यात आलेले आहे. नाना कितीही रागीट असला तरी आपल्या वैरासाठी तो एखाद्या स्त्रीला संकटात सापडू देत नाही. वेळेला तो पुढ जाऊन चंद्राची जीव वाचवतो. पुढे त्यांचा संघर्ष व प्रेम आहे. पण, किती वैर असले, तरी स्त्रीचे रक्षण करणे हा मानवतावाद यात दिसून येतो.

 

कथा व कादंबऱ्यांबरोबर अण्णांनी पोवाडे व लावण्याच्या माध्यमातूनही मानवतावाद सांगितला आहे. बंगालला जेव्हा मोठा दुष्काळ पडतो तेव्हा तेथील माणसं अन्न-अन्न करुन मरु लागतात. तेव्हा अण्णा भाऊ आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून जागृती करतात व मदत गोळा करुन बंगालला पाठवतात. ते म्हणतात,

 

“बंगाल मारीतो हाका।
भारतीय युवका उठ आता ऐका।

वाचवा त्याला धरासावरुन सर्व जनतेत ऐक्य उभारुन।

निराशा दुर्बलता झुगारुन॥

 

सर्वांनी ऐक्य करुन त्यांना वाचविले पाहिजे हा मानवतावाद अण्णांनी यातून मांडला आहे. अण्णा भाऊ लिखाण करीत असताना म्हणतात, “माझा माझ्या देशावर जनतेवर आणि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश समृद्ध व्हावा, सुखी व्हावा इथे समानता नांदावी, या भूमीचे नंदनवन व्हावे, अशी मला रोज स्वप्ने पडतात आणि मी लिहीत असतो.” यातूनच अण्णा भाऊंचा मानवतावाद दिसून येतो.

 

- जालिंदर कांबळे

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.