अण्णा भाऊ साठेंचे साहित्य : एक संघर्ष गाथा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |


Annabhau Sathe_1 &nb

 


महाराष्ट्राची शाहिरी परंपरा प्रदीर्घ व समृद्ध आहे. अण्णा भाऊंनी ती परंपरा अधिक उन्नत, परिणत व संपन्न केली. अण्णा भाऊंचा जो हात डफावर पडला, त्याच हाताने त्यांनी पोवाडे लिहिले. साहित्याचे विविध प्रकार हाताळले. आपल्या प्रज्ञा-प्रतिभेने त्यांनी काळाच्या छातीवर मानवी शाश्वत मूल्यांच्या अस्मितेची लेणी कोरली. त्यांची शाहिरी ही त्यांच्या हातातली तळपती तलवार होती. कामगार चळवळीत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. मराठी भाषेचा त्यांना सार्थ अभिमान होता. मराठी संस्कृतीवर त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला होता. त्यांचे जीवन, त्यांचे विचार आणि त्यांचे साहित्यही संघर्षाची गाथा गाणारे महाकाव्यच आहे. त्यांनी लिहिलेले आणि गायलेले पोवाडे, त्यांचे विपुल साहित्य मानवी जीवनाच्या संघर्षाची साक्ष देतात. हा संघर्ष माणसाच्या जगण्याचाच नसून मानवी मूल्यांच्या जगण्याचा आहे. नीति-अनीति, न्याय-अन्याय यासाठीचा आहे.


 

महाराष्ट्र मायभू अमुची । मराठी भाषिकांची । संत महंतांची ।

ज्ञानवंतांना जन्म देणार ।

नररत्नांचे दिव्य भांडार ।

समरधिर जिथे घेत अवतार ॥ जी ॥

 

अण्णा भाऊंना मराठी माणसाच्या गाथा गाण्यात धन्यता वाटत होती. ‘महाराष्ट्राची परंपरा’ हा त्यांचा प्रदीर्घ पोवाडा महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास आहे. हा पोवाडा महाराष्ट्राचा तर आहेच, पण प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. त्यांचे काही पोवाडे पाहू. मुंबईतील गिरणी कामगारांचा क्रांतिकारी श्वासोच्छवास त्यांना स्पर्श करत होता. कामगारांच्या चळवळीत वारकऱ्यांच्या श्रद्धेने त्यांनी भाग घेतला होता.. कामगारांचा श्वास आपल्या छातीत कोंडून त्यांनी ‘स्टॅलिनग्राड’चा पोवाडा लिहिला व गायला. वर्गसंघर्षात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होतेे. ‘दलितांचा आशाकिरण’ म्हणून ते स्टॅलिनग्राडकडे पाहत होते. कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा प्रत्येक नेता हा अण्णा भाऊंच्या शाहिरीचा जणू नायक होता. खानदेशातल्या श्रीपत पाटलांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कामगारांच्या मोर्चात नऊ कामगारांनी प्राण गमावले. श्रीपत पाटलांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्यावर अण्णा भाऊंनी ‘अमळनेरचे अमर हुतात्में’ हा पोवाडा लिहिला आणि त्यात प्राण फुंकून त्यांनी तो गायला. श्रीपत पाटलांना त्यांनी अमरपद दिले.

 

श्रीपती पाटील दिलदार । पुढारी खंबीर । केला निर्धार ।

घेऊन विचार सर्वांचा । बेत केला त्याने निकराचा ।

पोवाडा ऐका म्होरं त्याचा ॥

 

अण्णा भाऊंनी कामगारांना स्फूर्ती देण्यासाठी हा पोवाडा लिहिला. कामगारांच्या निर्धाराचा व एकजुटीचा गौरव त्यांनी या पोवाड्याच्या माध्यमातून केला आहे. ‘मुंबईचा गिरणी कामगार’ हा पोवाडा तर गिरणी कामगारांचा प्रेरणास्रोत होता. बंगालच्या दुष्काळात हजारो लोक मेले. इंग्रज सरकारला त्याचे काहीच वाटले नाही. ‘बंगालची हाक’ हा पोवाडा भारतीय युवकांना एकजुटीचे आवाहन करतो. त्यांच्या ‘महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून कायाया पोवाड्याने तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रान पेटवले होते. मराठी माणसाच्या अंगावर त्याने रोमांच उभे केले होते. त्याने त्याच्या मनात अग्नी चेतवला होता.

 

अण्णा भाऊंच्या शाहिरीमध्ये पोटतिडीक आहे. त्यांची वर्गसंघर्षाची जाणीव सखोल व उत्कट होती. त्यांचा आवाज हा दलित- शोषितांचा आवाज होता. ‘दलित’ हा शब्द त्यांनी व्यापक अर्थाने वापरला आहे. जो जो शोषित व पीडित तो तो दलित! समाजाच्या तळागाळातला माणूस हा त्यांच्या साहित्याच्या विषय होता. तो त्यांच्या कथा-कादंबऱ्याचा नायक होता. अन्यायाच्या शृंखला तोडण्याचे आवाहन त्यांच्या साहित्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातली समाजाचा उत्कर्ष करणारी क्रांती त्यांना लढण्याची प्रेरणा देत होती. घाव घालून जग बदलण्याचे तत्त्वज्ञान त्यांनी या महामानवाकडून घेतले होते. देशातील धनदांडग्यांनी, जातदांडग्यांनी व धर्मदांडग्यांनी ज्यांचे शोषण केले, त्या दलितांच्या बाजूने ते ठामपणे उभे होते. शोषकांवर व त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर त्यांची लेखणी आघात करते. कामगारांच्या लढ्यात तिने प्रेरकाचे काम केले. कामगारांच्या लढ्याने त्यांच्या मनात विश्वबंधुत्वाची भावना निर्माण केली होती.

 

जग बदल घालुनी घाव ।

सांगून गेले मला भीमराव ।

 

अण्णा भाऊंनी पोवाड्यांबरोबर लावण्याही लिहिल्या. त्यांच्या पोवाड्यात वीररस जसा प्रचूर आहे, तसा शृंगाररस त्यांच्या लावण्यांमध्ये विपुल प्रमाणात आहे. पोवाडे असोत अथवा लावण्या, त्यांमध्ये दलित, पीडित व कष्टकऱ्यांचे प्रतिबिंब हमखास आढळेल. कामगारवर्गाविषयीची कणव व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची चीड त्यांच्या शब्दांतून तीव्रतेने व्यक्त झाली आहे. वीर व शृंगाररसांबरोबर करुणरसही त्यांमध्ये झिरपत असताना दिसतो. अण्णा भाऊ स्वतः कामगार होते. झोपडपट्टीत ते राहात होते. दारिद्य्राने ते वेढले गेले होते. मुंबईतील कामगार वस्त्यांना दारिद्य्राने विळखा घातला होता. गावकुसाबाहेरील अस्पृश्य जातींच्या वाट्याला जे भोग आले होते, ते त्यांनी स्वत: भोगले होते. ‘मुक्ति कोण पथे?’ या प्रश्नाचे उत्तर त्यांनी कामगार चळवळीत शोधले होते. जगातील समदु:खी कामगारांशी त्यांनी स्वत:ची नाळ जोडली. मांग जातीत जन्मल्यामुळे अस्पृश्यतेचे चटके त्यांनी सोसले होतेच. वाटेगावच्या अण्णा भाऊंनी मुंबईची वाट धरली. जीवाची मुंबई करण्यासाठी नव्हे तर भाकरीसाठी. गिरणगावातील विद्यापीठात ते शिकले.

 

कामगार चळवळीने अण्णा भाऊंच्या मनात आशावाद फुलवला होता. ही पृथ्वी शेषाच्या फण्यावर नव्हे, तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे, या शब्दांतून त्यांचा दुर्दम्य आशावाद व्यक्त झाला आहे. या एकाच वाक्यात त्यांचे श्रमोपनिषद व्यक्त झाले आहे. अण्णा भाऊंचे समग्र साहित्य क्रांतिप्रवण आहे. क्रांतिप्रवण साहित्यात-मग ते कुठल्याही भाषेत असो-नैराश्यवाद असू शकत नाही. अण्णा भाऊंनी आपला लढाऊ बाणा लपवून ठेवला नाही. ध्येयवादाला वैफल्याचा पुसटसाही स्पर्श नाही. ते हाडाचे शाहीर व साहित्यिक होते, याकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्या लिखाणात मोठ्या प्रमाणात वाङ्मयीन मूल्यांचा आविष्कार झालेला आहे. अण्णा भाऊंना सौंदर्यदृष्टी होती.

 

प्रत्येक लेखकाला स्वत:ची भूमिका असतेच. रंजनवाद हीदेखील एक प्रकाराची भूमिकाच आहे. लेखकाची जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्याच्या साहित्यात व्यक्त होतेच. अण्णा भाऊ साठे हे फार शिकलेले लेखक नव्हते. अल्पशा अक्षरओळखीतून त्यांनी शब्दप्रपंच केला. त्यांच्या लेखणीतून ‘अक्षर’साहित्य निर्माण झाले आणि तेही विपुल प्रमाणात, हे लक्षात घेतले पाहिजे. गुन्हेगारीची परंपरा असलेल्या वारणेच्या खोऱ्यात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी सारस्वताच्या खोऱ्यात प्रवेशून एक वेगळ्या प्रकारचा गुन्हा केला. वाङ्मयाला ते तिसरा डोळा मानीत. दलित वर्गाशी ते एकनिष्ठ होते. त्याच्या न्यायी संघर्षावर व त्याच्या अंतिम विजयावर त्यांचा ठाम विश्वास होता. कष्टकरी व कामकऱ्यांच्या श्रमातूनच राष्ट्राची संपत्ती निर्माण होते. अण्णा भाऊंच्या अनेक कथा व कादंबऱ्या गाजल्या. त्यांच्या ‘फकिरा या कादंबरीला वि. स. खांडेकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. तीत ते अण्णा भाऊंविषयी लिहितात, “या लेखकाला प्रतिभेचं देणं आहे, जीवनात आग ओकणाऱ्या हरेक तर्‍हेच्या गोष्टींचा अनुभव आहे. त्याच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे आणि अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा तो पूजक आहे!” अण्णा भाऊंची प्रतिभा लावण्याची होती. त्यांची प्रज्ञा कारुण्याने भिजलेली होती.

 

अण्णा भाऊंच्या सर्वच कथा-कादंबऱ्यांचे नायक त्यांच्या भाग्यशाली ‘उद्याकडे जातात आणि तो भाग्यशाली उद्या त्यांच्याकडे येतो.’ साहित्यिक म्हणून अण्णा भाऊंचे मोठेपण मराठी समीक्षकांना लवकर उमगले नाही, हे खेदाने सांगितले पाहिजे. अण्णा भाऊ साठे हे खऱ्या अर्थाने लोकलेखक होते. ‘फकिरा’ ही कादंबरी वाङ्मयीन मूल्यांच्या कसोटीवर उतरणारी आहे. तिची वाचनीयता अतिशय प्रत्ययकारी आहे. वाचकांची उत्कंठा ती वाढवते. वारणा खोऱ्यातील बोलीभाषा त्यांनी अतिशय कौशल्याने वापरली आहे. उपमा लाजवाब आहेत. म्हणींचा उपयोगही त्यांनी अतिशय कल्पकतेने केला आहे. त्यामुळे कथेला रंजकता प्राप्त झाली आहे. ती प्रचारकी नाही. सामाजिक वास्तव हाच तिचा आशय आहे आणि त्या वास्तवाची अभिव्यक्ती कलात्मक आहे. ‘वाङ्मयीन आविष्कार’ म्हणतात ते यालाच! अण्णा भाऊंचे साहित्य प्रादेशिक, ग्रामीण आणि दलित या तिन्ही साहित्य प्रकारांमध्ये मोडते. या तिन्हींचे गुणविशेष त्यात प्रचूर प्रमाणात आहेत.

 

खरेतर लेखक हा समकालीन वाचकांसाठी लिहितो. समकालीन वाचक हे समकालीन वास्तवाचे चांगल्या प्रकारे आकलन करू शकतात. कारण, समकालीन वास्तव त्यांनी अनुभवलेले असते. साहित्याला प्राप्त होणारे आशयद्रव्य मुख्यत: समकालीन समाजाचे अंग असते. अण्णा भाऊंनी वाटेगाव, त्याचा परिसर आणि वारणा खोरे यातील सामाजिक वास्तवाला ‘फकिरा’ या कादंबरीत वस्तुनिष्ठपणे कलात्मक रूप दिले आहे. अतिशय संवेदनशील मनाने लिहिलेली ही कादंबरी आहे. या कादंबरीतील व्यक्तिचित्रे अप्रतिम आहेत. विशेषत: राणोजी मांग, शंकरराव पाटील, विष्णुपंत कुलकर्णी आणि रावसाहेब खोत यांची व्यक्तिमत्त्वे त्यांच्या कंगोऱ्यांसहित उभी केलेली आहेत. वाटेगाव व शिरगाव या दोन गावांनाही त्यांनी व्यक्तिमत्त्वे दिलेली आहेत. ज्या प्रदेशात ही गावे वसलेली आहेत त्या प्रदेशाचे त्यांनी संवेदनशील मनाने मानुषीकरण ‘Tale of Two Cities’ केले आहे.

 

विषमताग्रस्त समाजात दलित-पददलितांवर पदोपदी अन्याय होतो आणि म्हणून त्यांना संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा अण्णा भाऊंच्या साहित्याचा प्राणबिंदू आहे. संघर्ष कशासाठी? कुणासाठी व कुणाविरुद्ध हे प्रश्न ओघाने आलेच. अण्णा भाऊंच्या कथा-कादंबऱ्यांमधला संघर्ष शोषण आणि व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. तो दलित-पीडित-शोषित-वंचितांसाठी आहे. तो त्यांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी आहे. जागे झालेले अन्यायग्रस्त लोक हे संघर्षरत असतात. अन्यायग्रस्त समाजघटक नाईलाजाने गुन्हेगारीत सापडलेले असतात. परिस्थितीने निर्माण केलेल्या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी प्रसंगी त्यांना मिळेल ते शस्त्र हाती घ्यावे लागते. तो व्यूह फोडून बाहेर पडण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. जगण्याच्या धडपडीतून त्यांच्या हातून गुन्हे घडतात. ते अटळ असतात. संघर्ष हा अण्णा भाऊंच्या नायक-नायिकांचा प्राणवायू आहे. त्यांच्या एका कादंबरीचे नावच ‘संघर्ष’ आहे. अण्णा भाऊंच्या कथा आणि कादंबऱ्या संघर्षाचे विज्ञान विशद करतात. संघर्ष हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भागच असतो. संघर्षाशिवाय समाजजीवनाला गती मिळत नाही. आणि गती मिळाल्याशिवाय त्याला स्वत:ची लय सापडत नाही. संघर्षाशिवाय समाजपरिवर्तन होऊ शकत नाही. अण्णा भाऊंच्या साहित्यात हा संघर्ष विविध पातळ्यांवर दिसून येतो.

 

- ईश्वर सावळे

 
@@AUTHORINFO_V1@@