साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि सामाजिक चळवळ

    31-Aug-2020
Total Views |


Annabhau Sathe_1 &nb



ब्रिटिश भारतातून जात असताना ‘कोहिनूर’ हिरा आपल्यासोबत घेऊन गेले. पण, भारतमातेच्या कुशीत असे अनेक हिरे आणि नररत्न जन्मले, ज्यांनी आपल्या कार्याने, प्रतिभेने फक्त भारतवर्षच नाही, तर संपूर्ण जग तेजोमय केले. त्यापैकीच एक नररत्न म्हणजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे होय. जसे हिऱ्याला अनेक पैलू असतात, त्याचप्रमाणे अण्णा भाऊंच्या श्रीमंत व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. ते फक्त साहित्यिकच नव्हते, तर सक्षम सामाजिक कार्यकर्ते, संघटक, नेते, पत्रकार, अभिनेते आणि खेळाडू होते. त्यांच्या लेखणीने जात, भाषा, प्रांत, देशाच्या सीमा लीलया भेदल्या आणि भारतमातेची मान जगभरात उंच केली हे जगजाहीर आहेच, पण अण्णा भाऊंच्या कार्याची चिकित्सा करताना फक्त साहित्यिक म्हणून त्यांच्याकडे पाहून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची कक्षा सीमित न करता विविध सामाजिक चळवळीतील अण्णाभाऊंचे योगदान त्यांचे कार्य त्याच ताकदीने समाजासमोर येणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि सामाजिक चळवळींचा मागोवा या लेखातून घेतला आहे.

 
 

मुळात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंसमोर वीर फकिरा यांचा आदर्श होता. होय ‘वीर फकिरा मांग’ ज्यांच्या पूर्वजांना महाराजांनी तलवार इनाम दिली होती, तीच तलवार घेऊन गावासाठी वीर फकिरांचे वडील कपटी खोताविरूद्घ लढले होते आणि शहीद झाले. पुढे वीर फकिरा मांग तीच तलवार घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. अण्णा भाऊ म्हणत, “मी फकिराच्या लुटीच्या पैशातून गुटी प्यालेला कलावंत.” इंग्रजांचा थरकाप उडवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी पत्रीसरकार क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या क्रांतीचा अण्णा भाऊंवर प्रभाव होता. बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये १९४२ साली ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढल्या गेलेल्या ‘चले जाव’ आंदोलनात २२ वर्षांचे तरणेबांड अण्णा भाऊ सामील होते. १९४२ साली ब्रिटिश सरकारने अण्णा भाऊंविरोधात काढलेले ‘पकडवॉरंट’ अण्णा भाऊंच्या स्वातंत्र्यचळवळीतील सक्रिय सहभाग आणि व्याप्तीचा पुरावा आणि साक्ष देते.

 

धनवंतांनी अखंड पिळले ।
धर्मांधांनी तसेच छळले ।

मगराने जणू
माणिक गिळिले ।
चोर जाहले साव ॥

ठरवून आम्हा हीन कलंकित । जन्मोजन्मी करुनी अंकित ।

जिणे लादुनी वर अवमानित ।


निर्मून हा भेदभाव असे म्हणणारे अण्णा भाऊ हे कामगार चळवळ आणि अस्पृश्यता निवारण चळवळीमधील महत्त्वाचे दुवा होते. १९३५-३६ ला कष्टकरी कामगारांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प येथे अस्पृश्य समाजातील तरुणांना एकत्र करून त्यांना सामाजिक चळवळीत आणण्यासाठी ‘दलित युवक संघाची’ स्थापना केली होती. ‘बरबाद्या कंजारी’, ‘वळण’, ‘सापळा’ अशा अनेक कथांमधून अण्णा भाऊंनी सामाजिक विषमता, जातपंचायत, अस्पृश्यता, भेदभाव याविरोधात कोरडे ओढत जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अस्पृश्यता निवारण चळवळीला खऱ्या अर्थाने बळ दिले, या चळवळीत त्यांचे विचार हे समाजाला दिशा देणारे असल्यामुळेच त्यांना इ.स. १९५८ मध्ये मुंबईत पार पडलेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभले होते. संमेलनात आपल्या भाषणात त्यांनी, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे असे ऐतिहासिक विधान करत जागतिक अस्पृश्यता निवारण चळवळीला आत्मभान,आत्मबळ तसेच अधिष्ठान प्राप्त करून दिले.
 

१९५०-१९६० संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णा भाऊंनी आपल्या लेखणीने मराठी जनमानसाच्या मनात क्रांतीच्या ठिणग्या पेटवल्या. अण्णा भाऊंच्या लेखणीचा आंदोलकांवरील प्रभाव कमी करण्यासाठी मोरारजी देसाई सरकारने ‘तमाशा’वर बंदी घातली, पण प्रतिभावान अण्णा भाऊंनी तमाशाचे रूपांतर अत्यंत चतुराईने लोकनाट्यात करून आपली लढाई चालूच ठेवली. मुंबईतील संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या शिवाजी पार्कवरील सभेत हजारो लोकांसमोर अण्णा भाऊंनी ‘माझी मुंबई’ हे लोकनाट्य सादर केले, याचा प्रभाव एवढा होता की, सभेवरून परतताना मराठी आंदोलकांना आंदोलनाचे घोषवाक्य भेटले. भिंतीला पाठ लावून लढायचे बळ महाराष्ट्रदेशाला अण्णा भाऊंनी दिले आणि अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची। परलच्या प्रल्याची। लालबागच्या लढायची। फौंटनच्या चढाईची.’ मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली पण बेळगाव, डांग, उंबरगावसारखा मराठी प्रदेश कर्नाटकला जोडला गेला. या विरोधात सर्वात अगोदर आपल्या संवेदना, निषेध आणि विरोध जर कोणी नोंदवला असेल, तर तो फक्त अण्णा भाऊंनी, आपल्या कवनात अण्णा भाऊ म्हणतात,

 

बेलगाव, कारवार, डांग, 
उंबरगावावर मालकी दुजांची ।
धोंड खंडनीची । कमाल दंडलीची ।
 

अण्णा भाऊ म्हणतात, “कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाहीत, मी जे जगलो, जे अनुभवलं, ते मी लिहितो. आपल्या मुंबईतील वास्तव्यात कष्टकरी, कामगारांचे शोषण, दुःख आणि संघर्ष हे अण्णा भाऊंनी आपल्या मार्मिक शब्दांत अचूक टिपले. १९३४च्या लालबावटा गिरणी कामगार युनियनच्या मुंबईतील ऐतिहासिक संपात अण्णा भाऊ स्वतः सहभागी होते, शिवडीच्या कामगार आणि पोलिसांच्यामध्ये उडालेल्या भडक्याचे ते साक्षीदार होते. १९४४ ला ‘लालबावटा कलापथका’ची स्थापना करून कामगार चळवळीत आपला आमूलाग्र ठसा अण्णा भाऊंनी उमटवला. १९४५ साली कम्युनिस्ट पार्टीची टिटवाळा येथील पहिली किसान विकास परिषद अण्णा भाऊंनी आपल्या सहकार्‍यांसह मुंबई, ठाणे, कुलाबा परिसरात मजूर, कामगार आणि शेतकर्‍यांमध्ये जंगी प्रचार करून यशस्वी केली होती. १९३८ ते १९४४ पर्यंत गिरणगावातील कामगारांच्या प्रत्येक लढ्यात, आंदोलनात, संघर्षात ते सामील होते. दरम्यान, अण्णा भाऊंच्या ‘अकलेची गोष्ट’ या लोकनाट्याने प्रसिद्धीचा उच्चांक गाठला होता. १९४३-१९४६ दरम्यान बंगालला भीषण दुष्काळ पडला अनेक मजूर, कामगार, शेतकरी त्यात होरपळून निघाले होते. १९४४ अण्णा भाऊंनी ‘बंगालची हाक’ हा पोवाडा रचला आणि त्याचे कार्यक्रम सादर करत दुष्काळग्रस्तांसाठी लाखोंचा निधी उभारला. हा पोवाडा बंगाली कलाकारांनी बंगाली भाषेत भाषांतरित केला. त्याचे एल. पी रेकॉर्डिंग केले. बंगाली कलाकारांनी या पोवाड्यावर लंडनमधील प्रसिद्ध रॉयल थिएटरमध्ये नृत्य सादर केले होते. १९४६ ला नाविकांचे बंड असेल, तेलंगण- मराठवाडा मधील शेतकर्‍यांचा निजामशाही आणि जमीनदारांविरोधात संघर्ष असेल, गोवा मुक्तीसंग्राम असेल या सर्व आंदोलनात अण्णा भाऊंनी आपला सहभाग नोंदवून आपली संवेदना व्यक्त केली. १९४६ ला पोलीस गोळीबारात अंमळनेरचे आंदोलक शेतकरी हुतात्मा झाले, तेव्हा स्वतः अंमळनेरला जाऊन सदर घटनेचा निषेध नोंदवत हुतात्म्यांना आपल्या लेखणीने श्रद्धांजली वाहणारा बहाद्दर कामगार नेता म्हणजे अण्णा भाऊ साठे!

 

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा, चळवळीचा प्रभाव अण्णा भाऊंच्या संवेदनेत जाणवतो. फाळणी होऊन पंजाब-दिल्लीमध्ये भडकलेले दंगे याची दखल अण्णा भाऊ घेतात आणि शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. १९३६ ला स्पेनमधील ‘फॅसिझम’च्या विरोधात ‘स्पेनचा पोवाडा’ रचतात, तर हुकूमशहा हिटलरने सोव्हिएत रशियावर आक्रमण केल्यावर लाल सेनेने दिलेल्या रोमहर्षक झुंजीचे वर्णन ते आपल्या १९४२ ला रचलेल्या स्टॅलिनग्राडच्या पोवाड्यात’ करतात. या पोवाड्यावर आधारित ‘स्टॅलिनग्राडचा पोवाडा’ ही छोटी पुस्तिका कामगारांमध्ये वितरीत करण्यात आली होती. अण्णा भाऊंचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगार विश्वातील प्रभाव पाहूनच त्यांची १९४९ ला ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ या नाट्य संस्थेवर अध्यक्ष म्हणून वर्णी लागली होती. साहित्यासोबतच समाजाचीही सेवा करणारे अण्णा भाऊ कृतिशिल साहित्यिक होते. अण्णा भाऊंचे शब्द जे बोलत तेच त्यांच्या कृतीत उतरे. अशा महान साहित्यकास, क्रांतिकारकास मानाचा मुजरा.

 

महाराष्ट्राचे नंदनवन व्हावे हे स्वप्न बघत लिहणाऱ्या या महापुरुषाने आपल्या हयातीत कधी ब्रिटिश तर कधी तत्कालीन सत्ताधारी, तर कधी तत्कालीन व्यवस्थेच्या रोषाला, दडपशाहीला तोंड दिले. तत्कालीन व्यवस्थेने अण्णा भाऊंना साफ दुर्लक्षित केले. अण्णा भाऊ प्रसिद्ध झाले आणि ते भारतीयांना कळाले याचे श्रेय हे व्यासंगी, कलासक्त विदेशी लोकांनाच जाते. त्यांच्या अनेक कलाकृतींचे जवळपास २७ परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले. १९६१ ला सोव्हिएत रशियात अण्णा भाऊंना इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीने रशियाला आमंत्रित करून त्यांचे गुणगौरव व आदरतिथ्य केले. मुळात १९६१ अगोदरच अण्णा भाऊंची ‘सुलतान’ आणि ‘चित्रा’ ही कादंबरी रशियात रशियन भाषेत रुपांतरित होऊन प्रचंड गाजली होती. जर परदेशी लोकांनी अण्णा भाऊंना डोक्यावर घेतले नसते, तर येथील कर्मठ व्यवस्थेने अण्णा भाऊंचे कार्य आणि इतिहास कधीच उजेडात येऊ दिला नसता. अण्णा भाऊंच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांचे व्यक्तित्व फक्त साहित्यिक म्हणून संकुचित करण्यात येत आहे. त्यांचा स्वातंत्र्य चळवळ, दलित चळवळ, कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवामुक्ती संग्राम तसेच इतर सामाजिक चळवळीतील सहभाग आणि कार्य यावर भरीव संशोधन होणे गरजेचे आहे.

 
 

- अजित सकटे

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.