परिसंवाद : अण्णा भाऊंचा ‘फकिरा’ माझ्या आयुष्याचे प्रेरणास्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |


 Shankar Patole_1 &n

 


अण्णा भाऊ साठे समाजाचे मानबिंदू आहेत. आज समाजाला उत्कर्षाच्या मार्गावर आणण्यासाठी त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. अण्णा भाऊंच्या साहित्याने मला काय दिले? हा विचार केला तर उत्तर येते, माणसासाठी माणूस म्हणून जगण्याचे बळ दिले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर न्यायप्रिय राहण्याची सद्बुद्धी दिली, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची ताकद दिली.


असेन तेव्हा चौथी-पाचवीला. गावात आमच्या वस्तीमध्ये अण्णा भाऊ साठेंची जयंती साजरी होत होती. त्यावेळी अण्णा भाऊ कोण? असे विचारल्यावर वस्तीतल्या थोरामोठ्यांनी उत्तर दिले, “अरे आपल्या समाजाचे आनबान शान आहेत. त्यांनी आपल्याला मानानं जगायला शिकवलयं. जगात आपल्या समाजाचं नाव उंचावलं. त्यावेळी काही कळलं नाही.” पण, ती आजची अण्णा भाऊंची जयंती वेगळी ठरली. मी चौथी-पाचवीत असलो तरी गरिबी, भूक आणि त्यातही आईबाबांनी २४ तास उपसलेले कष्ट हे मनाला चटका लावत होते. त्या दिवशी जयंतीनिमित्त आम्ही सगळे पोरंटोरं मंडपात जमलो. शाहीर आले त्यांनी नमन करून सुरुवात केली, “ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. सन्मान द्या कष्टकर्‍यांना, श्रमिकांना.. सांगून गेले अण्णाभाऊ...”

 

इथे पहिल्यांदा मला अण्णा भाऊंच्या विचारांशी ओळख झाली. आमचे कुटुंब गरीब होते, श्रमिक होते, पण म्हणून आम्ही लाचार नाही, तर आमच्या श्रमाला आणि आम्हालाही किंमत आहे, हे त्या नकळत्या वयात माझ्या मनावर बिंबले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेताना गरिबीचे अपार चटके सहन केले, नव्हे त्यातून येणाऱ्या सगळ्या समस्यांना तोंड दिले ते केवळ अण्णाभाऊंच्या विचारांनानीच!

 

अण्णा भाऊ दीड दिवसांची शाळा शिकले, हे मी बालपणी ऐकायचो, पण त्याचवेळी ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ असे बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्यही सातत्याने कानी पडायचे. मला प्रश्न पडायचा की, शिकायचे की शिकायचे नाही? पण, पुढे किशोरवयात अण्णा भाऊंचे साहित्य वाचले आणि मनात एक पक्के झाले की, बहुजन समाजाचे जिणे इतके दु:खीकष्टी का आहे? तर शिक्षण आणि अर्थार्जनाच्या संधी नसल्यामुळे. त्यांच्या साहित्यातून वर्णन केलेल्या लोकांचे आणि आमच्या वस्तीवरील लोकांचे जगणे अजिबात वेगळे नव्हते. हे जगणे कसे टळेल तर शिक्षणाने. त्यामुळे अण्णा भाऊंच्या साहित्यातून मला आयुष्याचा स्तर बदलण्याची ऊर्मी मिळाली.

 

पुढच्या काळात प्रशासकीय सेवेत रूजू झालो. त्यावेळी अण्णा भाऊ साठेंचा ‘फकिरा’, ‘वारणेचा वाघ’ माझ्या मनात घुमत होता. ‘फकिरा’सारखे जगणे शक्यच नव्हते. पण, ज्या क्षेत्रात जाईन तीथे गोरगरीबांना मदत करेन, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करेन, असे मनात पक्के ठरवले. ‘फकिरा’ ब्रिटिशांच्या जोर जुलमांविरूद्ध आव्हान देतो. तो निर्भय, निर्मळ आणि नि:स्वार्थी आहे. ब्रिटिश त्याला पकडू शकत नाहीत, तेव्हा ते संबंध गावाला बंधक बनवतात. गावाला वाचवण्यासाठी ‘फकिरा’ स्वत: आत्मसर्पण करतो आणि हसत हसत फासावर जातो. अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’चा हा ध्येयवाद माझ्या एकंदर जीवनाची प्रेरणा आहे. ती प्रेरणा मला नेहमी सत्कार्य आणि सतविचार करण्यास भाग पाडते.

 

ठाणे शहर सहआयुक्त म्हणून काम करताना ‘फकिरा’ माझ्या मनात आणि विचारात असतो. त्यामुळेच कुण्याही गरजू-गरिबांच्या न्याय तक्रारीचे तत्काळ निवारण व्हावे, यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्नशील असतो. आज समाजासमोर अनेक प्रश्न आहेत, निरक्षरता, अज्ञान आणि अंधश्रद्धाही. या सगळ्यांना उत्तर आहे, अण्णा भाऊंचे विचार. जे विचार प्रत्येक अन्यायाविरोधात आवाज उठवायला शिकवते. मात्र, त्याचवेळी समाजाला एकसंध ठेवते. देशाशी निष्ठा राखतात. अण्णा भाऊ साठेंची शाहिरी ही अद्भुत बाब आहे. ‘माकडीचा माळ’ लिहिणारे अण्णा भाऊ सर्वसमाज समावेशकतेचे पुजारी होते. आज जी कोणी व्यक्ती समाजासाठी देशासाठी नि:स्वार्थीपणे कार्य करते, न्याय हक्कांसाठी नीडरपणे आवाज उठवते ती संस्था, ती व्यक्ती अण्णा भाऊंचे कार्य पुढे चालवत आहेत, असे मला वाटते. अण्णा भाऊंचे विचार साऱ्या देशाची संस्कृती जपतात, समाजाला तारतात. त्यांच्या विचारांना, स्मृतीला विनम्र अभिवादन...!

 

- शंकर पाटोळे

(लेखक ठाणे महानगरपालिकेत सह आयुक्त आहेत.)

 
@@AUTHORINFO_V1@@