परिसंवाद : अण्णा भाऊंच्या विचारांनी समरस विचारांची प्रेरणा दिली

    दिनांक  31-Aug-2020 15:24:17
|


Kailas Kanase_1 &nbs

 


अण्णा भाऊंच्या साहित्याने, विचारांनी मला काय दिले? हा विचार करताना आयुष्यातल्या अनेक घटना आठवतात. त्या घटनांमधून मार्ग काढताना अण्णा भाऊंच्या साहित्यातली जाणिवा माझे प्रेरणास्थान होत्या. त्यांच्या कादंबरीतले नायक कायमच माझे प्रेरणास्थान राहिले आहेत. प्रशासकीय सेवेत आणि वैयक्तिक आयुष्यातही समरस आणि नैतिक आयुष्याची संवेदनशील अनुभूती मला अण्णा भाऊंच्या विचारांनीच दिली.


‘बार्टी’चा महासंचालक म्हणून काम करताना ५९ जातीसमूहांचा विचार करतो. समाजशास्त्राचा अभ्यास करताना, प्रत्यक्ष काम करताना विविध समाजगटांची ओळख झालेलीच. पण ती ओळख एक अलिखित मर्यादेतली. सर्व समाजाशी संवाद साधताना, त्यांच्या प्रश्नांची विण समजून घेताना मला अण्णा भाऊंचे साहित्य दीपस्तंभासारखे मार्ग दाखवत आहेत. अण्णा भाऊंचे ‘माकडीचा माळ’ आणि ‘बरबाद्या कंजारी’, ‘चिराग नगरची भूते’ वाचून समाजाचे आरसपाणी दर्शन आणि ओळख झाली. समाजघटकांची मानसिकता कशी आहे, आणि ती का आहे, याचा विचार करावा लागतो. तो विचार अण्णा भाऊंनी मला दिला. कारण, त्यांच्या साहित्यातून समाजाचे प्रश्न सत्य स्वरूपात मांडलेले आहेत. त्यात कोणतेही रंजन किंवा अति काल्पनिकता नाही. ‘माकडीचा माळ’ कादंबरी वाचताना समाजाचे प्रश्न अतिशय विदारकपणे समोर येतात. आज समाजात सकारात्मक बदल झालेला आहे. आयुष्यात सकारात्मक यश मिळवावे, कोणत्याही स्तरावर अन्याय मुळी सहन करायचा नाही, ही जाणीव, जिद्द निर्माण झाली. हे कारण काय असावे?

 

मला काही वर्षांपूर्वीची घटना आठवते. त्यावेळी मी पोलीस प्रशासनात अधिकारी होतो. पोलीस स्थानकामध्ये एक केस आली. घरगुती वाद झाला होता. एक युवती नातेवाईकांच्या विरोधातच पोलिसात तक्रार द्यायला आली होती. त्या व्यक्तीने कुणा महिलेवर अत्याचार केला होता. तिच्या अशा कृत्याने तिचे सासर-माहेर तुटणार होते. पण, त्या युवतीचे म्हणणे, “मी कचरा वेचेन, दहा घरची धुणीभांडी करीन, पण बाईमाणसावर होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही. मांगाची लेक हायं मी. अन्याय करू देणार नाय. मग मेले तरी चालनं.” ही जिद्द ही नैतिकता अण्णा भाऊंच्या साहित्याचे जीवंत रूप होते. अशीच एक घटना. तो युवक होता. गावात काहीतरी वाद-तंटे झाले म्हणून त्याला पोलीस स्थानकामध्ये आणले होते. स्थानिक पोलीस अधिकारी त्या तरुणाचा जबाब नोंदवत होते. त्याला विचारले, “तू हे का केलेस?” तो म्हणाला, “जग बदल घाव घालूनी सांगूनी गेलं भीमराव, असं माझं अण्णा भाऊ सांगून गेल्यात. मी अजिबात अन्याय सहन करणार नाय. मरण पण जुलमा समोर झुकणार नाय.”

 

सामाजिक क्षेत्रात काम करताना मला अशा कित्येक व्यक्ती भेटल्या, ज्या अण्णा भाऊंच्या स्वाभिमानाची चाड बाळगून समाजशील संघर्ष करत होते. पुढे अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीनेही माझ्या विचारांवर गारूड केले. त्यातला तो संघर्षशील नायक, प्रत्येक प्रसंगात उमद्या माणसाने कसे वागावे, याचे धडेच देतो. ‘फकिरा’ कादंबरीतील विष्णुपंत ही व्यक्तिरेखा समरस समाजाचे वास्तव मांडते. वरवरून कितीही भेद असले तरी समाजात जगताना प्रत्येकाला एका पातळीवर माणूस म्हणूनच जगावे लागते, हा विचार मला अण्णा भाऊंच्या साहित्याने दिला.

 

‘बार्टी’मध्ये ५९ समाजातील गुणवंत आणि इच्छुक युवकांना एमपीएसी, युपीएसीचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये गुणवत्ता चाचणीनुसार प्रवेश दिला जातो. मातंग समाजातील गुणवान विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकारी बनावे, यासाठी कार्यरत असणार्‍या अनेक संस्था आणि व्यक्तीही आहेत. या संस्था आणि व्यक्तींच्या सहयोगाने ‘बार्टी’ समाजामध्ये एमपीएसी, युपीएसीसंदर्भात उपक्रम राबवते. सांगायला आनंद वाटतो की, ५९ समाजामध्ये याबाबत जागृती निर्माण झाली आहे. यामध्ये खारीचा वाटा उचलताना मला अण्णा भाऊंच्या विचारांनी समरस विचारांची प्रेरणा दिली.

 

- कैलास कणसे

(लेखक ‘बार्टी’ या संस्थेचे महासंचालक आहेत.)

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.