मुंबईकरांच्या बेपर्वाईमुळे कोरोना पुन्हा थैमान घालण्याची शक्यता

    दिनांक  30-Aug-2020 16:04:56
|
Dadar_1  H x W:
 

(काही दिवसांपूर्वी गणेश चतुर्थीनिमित्त खरेदीसाठी गजबजून गेलेले दादर मार्केट)

 
मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अनलॉक सुरू होताच मुंबई कोरोना प्रतिबंधासाठी असलेल्या प्राथमिक नियमानच तिलांजली दिली जात आहे. लोक मास्कशिवाय फिरत आहेत, तर सोशल डिस्टनसिंगचाही फज्जा उडत आहे.मुंबईत आत्तापर्यंत एकूण १ लाख ४३ हजार ३८९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ हजार ५९६ जणांचा मृत्यू झाला. इतर कारणांमुळे ३२२ जणांचे प्राण गेले आहेत. तर आता १९ हजार ९७१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
 
कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजिनक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक आहे. मास्क न वापरणा-यांवर नियमानुसार कारवाईचे आदेश प्रशासनाचे आहेत. मात्र मुंबईत सध्या अनेक ठिकाणी मास्क न घालता बेजबाबदारपणे फिरणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मुंबई महापालिकेने मास्क न घालणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला, मात्र सध्या ही कारवाईच थंडावली आहे. त्यामुळे कोरोनाला निमंत्रण मिळून संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. 
 
 
 
कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि कोरानापासून बचाव होण्यासाठी मास्क अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. काही भागात मास्क न घालता फिरणे तसेच सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याने अशा परिसरात कोरोनाची संख्या वाढली होती. याची दखल पालिका प्रशासनाने घेतली. या पार्श्वभूमीवर मास्क न घालणार्‍यांना एक हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे.
 
 
 
यानुसार मास्क न वापरणा-यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाते. सुरुवातीला मास्कशिवाय फिरणा-यांना पालिकेने दणका द्यायला सुरुवात केली. एफ -उत्तर विभागात तसेच कुर्ला, दहिसर आदी भागात प्रशासनाने कारवाईही केली. कोरोना रोखण्यासाठी ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. मात्र सुरुवातीला धडाक्यात सुरु झालेली ही कारवाई आता थंडावल्याचे चित्र आहे. 
 
 
 
कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, अंधेरी, वांद्रे, वडाळा, दादर, माहिम आदी ठिकाणी बेजबाबदारपणे मास्कविना अनेकजण फिरताना दिसत आहेत. गोवंडी, मानखुर्द, दादर, कुर्ला येथे सोशल डिस्टनसिंग न ठेवता बाजार गजबजलेले दिसत आहेत. अशांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने कोरोनाला निमंत्रण मिळण्याची शक्य़ता आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकने कंबर कसली आहे. 
 
 
 
प्रभावी उपाययोजनांमुळे सद्यास्थितीत कोरोना नियंत्रणात आहे. मात्र मास्कविना फिरणा-यांवर सध्या कारवाई होताना दिसत नसल्याने नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणा-यांवर प्रशासनाकडून दुर्लक्ष का केले जाते आहे, असा सवाल विचारला जातो आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.