साताऱ्यातून जिवंत खवले मांजराची तस्करी उघड: पुण्यातील चार तरुणांना अटक

    दिनांक  30-Aug-2020 18:17:01
|

pangolin_1  H x


कारवाईदरम्यान वन आणि पोलीस अधिकारी जखमी 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सातारा वन विभागातील वनाधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री जिवंत खवले मांजराची तस्करी उघडकीस आणली. या प्रकरणात वनाधिकाऱ्यांनी खवले मांजर खरेदीसाठी स्वत: ग्राहक बनून चार तरुणांच्या पुणे-बंगळूरू राज्य महामार्गावरुन मुसक्या आवळल्या. या कारवाईदरम्यान आरोपींसोबत झालेल्या झटापटीत एक वन आणि पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. 

pangolin_1  H x
 


राज्यातून खवले मांजर तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. भारतीय 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत खवले मांजराला प्रथम श्रेणीचे संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्याची शिकारी किंवा तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा परिस्थितीतही राज्यातील विविध भागांमधून खवले मांजर खरेदी-व्रिक्री करण्याची प्रकरणे उघडकीस येत असतात. अशाच एका प्रकरणाचा छडा शनिवारी सातारा वन विभागातील अधिकाऱ्यांनी लावला. पुण्यातील काही तरुण मंडळी खवले मांजर विकत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनीच बनावट ग्राहक बनून आरोपींबरोबर खवले मांजर विक्रीचा व्यवहार केला. पुणे-बंगळूरू राज्य महामार्गावरील वाई तालुक्यामधील हाॅटेल शिवकेैलासजवळ आरोपींना बोलावून अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री सापळा लावला. आरोपी त्याठिकाणी पोहोचल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी पोलीसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपींकडे तरटाच्या पोत्यामध्ये बांधलेले जिवंत खवले मांजर सापडले. 
 
 

pangolin_1  H x
 
या कारवाईत आकाश धडस (वय- १९, खंडाळा), लक्ष्मण धायगुडे (वय-२४, खंडाळा), मेहबूब विजापूरकर (वय-२२,पुणे), निखिल खांडेकर (वय-२३, वारजे) या चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती साताऱ्याच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मुलनचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांनी दिली. आरोपींविरोधात 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे, डोंबाळे यांनी सांगितले. या कारवाईदरम्यान आरोपींसोबत झालेल्या झटापटतीत डोंबाळे आणि पोलीस हवालदार राजेश वीरकर जखमी झाले. 
 
 
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी मेहबूब विजापूरकर हा सर्परक्षक असून त्याच्याकडे 'पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन' या संस्थेचे ओळखपत्र सापडल्याचे साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक आणि 'वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो'चे रोहन भाटे यांनी सांगितले. त्यामुळे अशा संस्थांची नोंदणी त्वरित रद्द करुन अनेक जिल्ह्यात सर्पमित्र म्हणून बेकायदेशीरपणे दिलेले ओळखपत्रही काढून घेण्याची मागणी भाटे यांनी केली आहे. 
 
 
 
 
 
खवले मांजर या प्राण्याबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. त्यातूनच सामान्य लोकांकडून या प्राण्याला मांसासाठी किंवा जादूटोण्यासारख्या अंधश्रद्धेसाठी पकडण्यात येते. परंतु, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वन्यप्राणी पकडणे, बंदिवासात ठेवणे, विक्री करणे, शिकार आणि वाहतूक करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी ३ ते ७ वर्षांपर्यंत कैद आणि रोख रक्कमेच्या दंडाची तरतूद आहे. तरी नागरिकांना मांसाच्या किंवा पैसाच्या लोभापायी अशा गंभीर गु्न्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये. वन्यप्राण्यांच्या शिकारीबाबत माहिती मिळाल्यास स्थानिक वन विभाग किंवा १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. 
 
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.