रिकामे घट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2020   
Total Views |

congress_1  H x



आपली वैचारिक ‘स्पेस’ नेमकी कुठे आहे, हे काँग्रेसच्या नेत्यांना शोधता आले पाहिजे. हे डोक्याचे काम आहे आणि प्रतिभेचे काम आहे. लोकमान्य टिळकांकडे ती होती, महात्मा गांधींकडे ती होती, इंदिरा गांधींकडे काही प्रमाणात होती, आज घट रिकामे झालेले आहेत, हीच काँग्रेसची सर्वात मोठी समस्या आहे.



फ्रेंच क्रांतीनंतर (१७८९) बोर्नबॉन राजघराण्याचे अनेक लोक विदेशात गेले. १८१४ ला जवळजवळ २५वर्षांनंतर ते पुन्हा फ्रान्समध्ये आले. अठरावा लुई गादीवर आला होता. या २५वर्षांमध्ये इतिहासातून ते काही शिकले नाहीत आणि काही विसरले नाहीत. त्यावेळचा मुत्सद्दी टॅलिरॅण्ड म्हणाला, They had learned nothing and forgotten nothing. हे वाक्य राजकारणात अतिशय प्रसिद्ध झालेले आहे. जे काही शिकत नाहीत आणि विसरतही नाहीत, त्यांना हे वाक्य तंतोतंत लागू पडते. काँग्रेसमधील गांधी घराण्यातील लोकांना आणि त्यांचे निष्ठावंत इतिहासातून काही शिकत नाहीत आणि विसरतही नाहीत. नजीकच्या काँग्रेसचा इतिहास त्यांना खूप शिकवणारा आहे. २०१४ साली काँग्रेसचे फक्त 44 खासदार निवडून आले, मावळत्या लोकसभेत त्यांचे २०० खासदार होते. याचविषयाची पुनरावृत्ती २०१९ साली झाली. २००चे ४४कसे झाले? हा खूप शिकण्याचा विषय आहे. ज्यांनी काही शिकण्याचे नाकारले आहे, ते काही शिकत नाहीत. आपल्याला सर्व काही कळतं, असे समजणारे अनेकजण व्यवहारिक जगात असतात. ते थपडा खात बसतात. काँग्रेसची स्थितीदेखील थपडा खाण्याची झाली आहे. काँग्रेसची मंडळी इतिहास विसरत नाहीत. त्यांचा इतिहास देशावर अनेक वर्षे राज्य करण्याचा आहे. सत्ता भोगण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे, असे नेहरु-गांधी घराण्यातील लोकांना वाटते. त्यामुळे सत्ता नसतानाही आपणच देश चालवितो, अशा गुर्मीत ते जगत असतात. फ्रान्समध्ये बोर्नबॉन घराणे सात-आठशे वर्षे राज्य करीत होते. फ्रेंच क्रांतीत सोळावा लुई आणि त्याची पत्नी यांचे डोके उडविले गेले. हे घराणे राज्य करण्यास लायक नाही, अशी जनतेची भावना झाली. नेपोलियनचा वॉटर्लु येथे पराभव झाला आणि दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समध्ये पुन्हा बोर्नबॉन राजघराण्याची सत्ता आणली. अठरावा लुई पहिल्या राजासारखा वागू लागला. कालांतराने त्याची हाकालपट्टी झाली. इतिहासातून काही शिकायचे नाही आणि इतिहास विसरायचा नाही, हेच खरे.




काँग्रेसमधील २३ नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले, चर्चेची मागणी केली, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सभासदांची निवडणूक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस वर्किंग कमिटीची १७ ऑगस्टला बैठक झाली. या बैठकीत पूर्णवेळ अध्यक्ष कोण असावा, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सभासदांची निवडणूक व्हावी की नेमणूक व्हावी अशा मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी असे पत्र लिहिण्याचे धाडस तुम्हाला कसे झाले यावरच सहा ते सात तास खडाजंगी झाली. मूळ प्रश्न बाजूला राहिला. पत्र लिहिणार्‍यांनी भाजपला मदत केली असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले, ही काँग्रेसमधील लोकशाही आहे. सार्वजनिक व्यासपीठावर हेच काँग्रेसचे नेते लोकशाही धोक्यात असल्याची वल्गना करीत राहतात. पक्षांतर्गत मात्र कुणालाही आपले स्वतंत्र मत मांडण्याचे स्वातंत्र्य नसते. ‘सीडब्ल्यूसी’च्या बैठकीची एकच विषयसूची होती - तुम्ही गांधी परिवाराबरोबर आहात की परिवाराविरोधात आहात. शेवटी परिवारवाद्यांचा विजय झाला. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून कायम झाल्या. काँग्रेसअंतर्गत या वादाने सत्तासंघर्षात काही पैलू समोर आले आहेत.



पहिला पैलू गांधी घराण्याचा वारस कोण हा ठरविण्याचा आहे. एकूण चित्र असे दिसते की, सोनिया गांधी यांना राहुल गांधींना वारस करायचे आहे. २०१९च्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होते. पराभवानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांना पुन्हा अध्यक्ष करावे, अशी राहुल गांधी दरबारी मंडळीची इच्छा आहे. अध्यक्ष पदाची दुसरी दावेदार आहे, प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा. प्रियांका गांधी राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत. त्यांना उत्तर प्रदेशातच राहुल गांधी गटाने स्थानबद्ध करून ठेवले आहे. प्रियांका गांधी यांना नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवायची होती. राहुल गांधी गटाने त्याला पाठिंबा दिला नाही. प्रियांका गांधी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध उभ्या राहिल्या असत्या तर मिडियाने देशभर त्यांचा प्रचार नेला असता. राहुल गांधी यांना प्रतिस्पर्धी उभा राहिला असता. सार्वजनिक व्यासपीठावर किंवा पक्षाच्या व्यासपीठावर बहीण-भाऊ एकमेकांच्या विरोधात बोलत नाही, याचा अर्थ काहीही गडबड नाही असे नाही. सत्तेच्या राजकारणातील ते काही राम-भरत नाहीत किंवा वाजपेयी-अडवाणी नाहीत. त्यासाठी रामायणाचे संस्कार मनावर व्हावे लागतात. रॉबर्ट पत्नी प्रियांका आणि सोनिया-मायनोपुत्र राहुल यांच्यावर रामायणाचे संस्कार होण्याचे काही कारण नाही. दुसरा पैलू काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि तरुण नेते यांच्यातील संघर्षाचा आहे. जुन्यांचे नेतृत्व सोनिया गांधी करतात आणि नव्यांचे नेतृत्व राहुल गांधी करतात. सोनिया गांधी यांचा प्रभाव म्हणजे वयोवृद्ध नेत्यांचा प्रभाव. यामुळे राजस्थानात गेहलोत मुख्यमंत्री आहेत आणि मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री होते. एखाद्या घरात जेव्हा वडील आपल्या मुलांना स्वतंत्र निर्णय करु देत नाहीत किंवा त्यांच्यावर जबाबदार्‍या टाकीत नाहीत, तेव्हा ती मुले बंड करून आपली वेगळी चूल मांडतात. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांनी बंड करून हा सनातन नियम सिद्ध केला आहे. सचिन पायलट यांचे बंड काही काळासाठी शमले आहे, योग्य संधी येताच ते पुन्हा बंड करतील. म्हातार्‍यांना सत्ता सोडायची नाही आणि तरुणांना म्हातार्‍यांच्या वर्चस्वाखाली राहायचे नाही, असा हा काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष आहे.


काँग्रेसमधील पुढचा महत्त्वाचा विषय काँग्रेस कशासाठी, हा आहे. राजकीय पक्षाला विचारधारा असावी लागते. काँग्रेसचा मुख्य संघर्ष भाजपच्या विचारधारेशी आहे. भाजपची विचारधारा संघातून उदयाला आलेली आहे. या विचारधारेशी संघर्ष करण्यासाठी तशी सशक्त विचारधारा काँग्रेसची असायला पाहिजे. ही विचारधारा नेहरु विचारधारा ठेवली तर निवडणुकीतील पराभव पाचवीला पूजलेला आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. नेहरु विचारधारा आर्थिकदृष्ट्या अपयशी, परराष्ट्र धोरणाबाबत अपयशी, मुस्लीम प्रश्नांच्या बाबतीत अपयशी, दलित प्रश्नांच्या बाबतीत अपयशी, चीनबाबत अपयशी, काश्मीरबाबत अपयशी आहे. तिचे नाव घेऊन मते मागण्याचे दिवस संपले. आता मते नाही धोटे मिळण्याचा कालखंड सुरु झाला आहे. राजीव गांधी यांना कोणतीही विचारधारा प्रसवता आलेली नाही. राम मंदिराचे टाळे उघडून हिंदूंना खूश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, शहाबानो प्रकरणात कायदा बदलला, दोन्ही दरडीवर जो पाय ठेवतो तो आपटतो. राजीव गांधींचे तसे झाले. आज राहुल गांधी सेक्युलॅरिझम, डेमोक्रसी, कॉनस्टीट्युशन वगैरेच्या बाता मारत फिरत असतात. त्यांचे शिक्षण काय झाले हे आपल्याला माहीत नाही. वर दिलेले तिन्ही शब्द सैद्धांतिक आहेत आणि व्यावहारिक राजकारणाचे आहेत. नेहरु निदान सैद्धांतिक भाषण करु शकत होते, लिहू शकत होते. त्यांचा पणतू केवळ शब्द उच्चारतो. त्यातून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे कळत नाही. सांगणार्‍याला जिथे काही समजत नाही, तेथे दुसर्‍याला ते कसे कळणार?


काळ झपाट्याने बदलला आहे. हिंदू समाजाला शिव्या घालून आणि हिंदूंना सांप्रदायिक म्हणून अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्याचे राजकारण खपवून घेण्याच्या मनःस्थितीत आता हिंदू समाज नाही. हिंदू समाजात आता दिवसेंदिवस राजकीय जागृती मोठ्या प्रमाणात होत चालली आहे. ‘३७० कलम’ रद्द करणे, रामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन, विदेशी मुसलमानांना नागरिकत्व नाकारणे, पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकविणे हे सर्व हिंदू आस्थेचे विषय आहेत. राहुल गांधी या विषयांवर सातत्याने उलटसुलट बोलत असतात. हा नेता आपल्या कल्याणाचा नाही, असा संदेश हिंदू समाजाकडे जातो. या प्रश्नांवर काँग्रेसला आपल्या वैचारिक भूमिका निश्चित कराव्या लागतील. या भूमिका जर भाजपप्रमाणे घेतल्या तर काँग्रेसच्या वेगळ्या अस्तित्वाला अर्थ राहत नाही आणि विरोधी घेतल्या तर अनर्थकारी होतील. म्हणून आपली वैचारिक स्पेस नेमकी कुठे आहे, हे काँग्रेसच्या नेत्यांना शोधता आले पाहिजे. हे डोक्याचे काम आहे आणि प्रतिभेचे काम आहे. लोकमान्य टिळकांकडे ती होती, महात्मा गांधींकडे ती होती, इंदिरा गांधींकडे काही प्रमाणात होती, आज घट रिकामे झालेले आहेत, हीच काँग्रेसची सर्वात मोठी समस्या आहे.
@@AUTHORINFO_V1@@