क्रीडा क्षेत्रातील ‘द्रोणाचार्य’

30 Aug 2020 21:23:51

dronacharya awardee_1&nbs
क्रीडा क्षेत्रातील चारही मानाचे पुरस्कार मिळवणारे राज्यातील एकमेव क्रीडापटू व प्रशिक्षक विजय मुनिश्वर यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रवासावर एक नजर...
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार-२०२०’चे वितरण करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर माजी पॅरालिम्पिकपटू व ज्येष्ठ क्रीडा संघटक विजय मुनिश्वर यांच्या पॅरा पॉवरलिफ्टिंगमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानाच्या ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. गेल्या १४ वर्षांत त्यांची तब्बल ११ वेळा पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. मात्र, उशिरा का होईना त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली. २००६ मध्ये प्रशिक्षक या गटातून त्यांना पुरस्काराची अपेक्षा होती. पुरस्कार प्राप्तीनंतर ते म्हणतात, “मी मागील २५ वर्षांमध्ये प्रशिक्षक म्हणून केलेल्या मेहनतीचे फळ आहे. रामाप्रमाणेच माझाही पुरस्काररुपी वनवास संपला.” या पुरस्कारामुळे आणखी नव्या जोमाने व ऊर्जेने काम करणार असल्याची भावना त्यांनी पुरस्कार मिळाल्यांनतर व्यक्त केली.

ज्या खेळामध्ये सामान्यांपेक्षा जास्त शारीरिक क्षमतेची गरज असते त्या खेळामध्ये दिव्यांग असतानाही देशासाठी अनेक पदके जिंकणारे आणि त्याच क्षमतेचे इतर अनेक खेळाडू घडवणारे विजय मुनिश्वर. खेळाडू म्हणून 'शिवछत्रपती' आणि ‘अर्जुन पुरस्कार’, त्यानंतर प्रशिक्षक म्हणून 'दादोजी कोंडदेव' आणि आता ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ जिंकणार्‍या विजय मुनिश्वर यांचा उत्तम पॅरापॉवरलिफ्टर बनण्याचा प्रवासही प्रेरणादायी आहे. विजय मुनिश्वर अवघे 11 महिन्यांचे असताना त्यांना पोलिओने ग्रासले होते. त्यामुळे त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला होता. मात्र, सत्याचा स्वीकार करत विजय मुनिश्वर यांच्या आईने त्यांच्या उपचाराकरता खूप मेहनत घेतली. त्यामुळे हळूहळू विजय मुनिश्वर यांना उभे राहता येणे शक्य झाले. मात्र, तरीही त्यांच्या डाव्या पायाला कायमचे अपंगत्व आले. बालवयातच आलेले अपंगत्व, लोकांचे टोमणे आणि बोल यांनी मुनिश्वर यांच्या मनात खोलवर घाव घातला आणि त्यातून भरारी घेत घडला तो आजचा क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य. बालवयातच त्यांनी शारीरिक क्षमता वाढवत कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बॉक्सिंग, आर्म रेसलिंगनंतर ते पॅरापॉवरलिफ्टिंगकडे वळाले. आर्म रेसलिंगमध्ये जागतिक स्तरावर दुसर्‍या क्रमांकापर्यंत त्यांनी मजल मारली. पॅरापॉवरलिफ्लटिंग क्रीडा प्रकारात सहा पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. तब्बल ३१ देशांमधील स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला.


विजय मुनिश्वर यांनी खेळाडू म्हणून एक दशकापेक्षा अधिक काळात महाराष्ट्र व देशासाठी असंख्य पदके जिंकलीत. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी ५४ सुवर्णपदके जिंकली, तर विविध देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी तीन सुवर्णांसह नऊ पदकांची कमाई केली. खेळाडू म्हणून यशाची शिखरे गाठत असतानाच त्यांनी आपल्यासारखे दिव्यांग खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठीची तयारीही सुरु केली. दिव्यांग खेळाडूंना ही चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, चांगल्या सोयी मिळाव्या यासाठी विजय मुनिश्वर यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी खास जिम तयार केली आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे, विजय मुनिश्वर यांनी शिकवलेल्या अनेक खेळाडूंनी आजवर ‘शिवछत्रपती’ आणि ‘अर्जुन पुरस्कारा’सारखे मानाचे सन्मान पदरात पाडले आहे. यात पॅरालिम्पिकपटू राजेंद्रसिंग राहेलू, फरमान बाशा, सचिन चौधरी आशियाई पदकविजेती नागपूरची लतिका माने या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या ‘अर्जुन’, ‘छत्रपती’ व ‘एकलव्य पुरस्कार’विजेत्या खेळाडूंनी आशिया, वर्ल्ड, कॉमनवेल्थ व पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये ३५च्या वर आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. त्यांचे १२५पेक्षा जास्त शिष्य क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर आज विविध शासकीय नोकर्‍यांवर आहेत. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच व तांत्रिक अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. मुनिश्वर यांनी खेळासह सामाजिक बांधिलकीही जपली आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल १०९वेळा रक्तदान केले आहे. बालवयात आलेल्या अपंगत्वाने हार न मानता स्वतःला शारीरिक व मानसिक पातळीवर खंबीर बनवत यशाचे उंच शिखर गाठले. अपंगत्वाचा बाऊ किंवा कमीपणा न मानता अनेक दिव्यांगांना प्रशिक्षण देत खर्‍या अर्थाने ‘द्रोणाचार्या’ची भूमिका पार पाडली आहे. अशा या आपल्या महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्यांचा सन्मान होणे ही महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब आहे.

Powered By Sangraha 9.0