क्रांतिपर्व अण्णा भाऊ साठेंचे स्मरण करताना...

    दिनांक  30-Aug-2020 22:12:06   
|


annabhau sathe_1 &nb


दै. मुंबई तरुण भारतच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त क्रांतिपर्व अण्णा भाऊ साठेहा विशेषांक वाचकांसमोर आणताना विशेष आनंद होतो आहे.अण्णा भाऊ साठेंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेताना त्यांचे जीवन
, त्यांचे साहित्य, त्यांचे विचार आणि त्यांचा प्रत्यक्ष चळवळीतला सहभाग आपल्याला नव्याने विचार करायला लावतो. अण्णा भाऊ साठे एक क्रांतिपर्वच आहेत. त्यामुळेच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तक्रांतिपर्व अण्णा भाऊ साठे’ हा विशेषांक वाचकांसमोर आणताना विशेष आनंद होतो आहे. विशेषांक निर्मितीसाठी लेखक कोण असावेत, हा प्रश्न आला असता, संपादक किरण शेलार यांचे म्हणणे होते की, “कोण म्हणजे? समाजातलेच लेखक हवेत. भले ते प्रस्थापित नसतील, नव्याने लिहिते असतील, पण समाज आणि अण्णा भाऊंच्या विचारांवर त्यांची निर्विवाद श्रद्धा हवी.”या निकषात असलेले लेखक कोण
, याचा मागोवा घेताना मला जाणवले की, समाजात विविध पातळीवर साहित्यसेवा करणारे अगणिक आहेत. महाराष्ट्रभरात एक मोठा तरूण वर्ग अण्णा भाऊ साठेंच्या विचारांनी प्रेरित होऊन लिहीत आहे. त्यामुळे ‘क्रांतिपर्व अण्णा भाऊ साठेया विशेषांकामध्ये विविध शहरांतील आणि विविध क्षेत्रांतील व्यक्ती लेखक म्हणून आपल्यासमोर येतात. या विशेषांकामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, सातारा ते उस्मानाबाद अशा विविध शहरांतून लेखकांनी आपले विचार मांडले आहेत. समाजाचे प्रश्न, समाजाची स्थिती आणि अण्णा भाऊंच्या जीवंत विचारांची प्रेरणा घेऊन हे सारे लेखक ‘क्रांतिपर्व अण्णा भाऊ साठे’ या विशेषांकाद्वारे आपल्या भेटीला आले आहेत.‘वैजयंता’ कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णा भाऊ साठे आपले मनोगत व्यक्त करतात, “जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच कदर जनता करते, हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर नि तिच्या संघर्षांवर अढळ विश्वास आहे.” लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे आपल्या शब्दांशी आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणे म्हणजे काटेरी वाट आणि अग्नीची साथच. पण, अण्णा भाऊ आपल्या विचारांशी नेहमीच प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले. समाज एकसंध राहावा, समाजातल्या अनिष्ट रूढीरितीरिवाजाचा अंधार नष्ट व्हावा, यासाठी अण्णा भाऊंचे शब्द क्रांतीची मशाल झाले.
२१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबर्‍याही त्यांनी लिहिल्या. त्यापैकी सात कादंबर्‍यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाचा ‘उत्कृष्ट कादंबरी’चा पुरस्कारही मिळाला. त्यांच्या साहित्याची ज्यांना ओळख आहे, त्यांच्या हृदयातून आपसूकच अण्णा भाऊंसाठी ‘साहित्यसम्राट’ ही उपाधी निर्माण होते. साहित्यातून समाजाची मानवी मूल्यांवर बांधणी करत असताना, अण्णा भाऊ यांचे विचार निखळ मानवी संवेदनशीलता जपतात. समाजातील अन्याय-अत्याचार उघड करताना त्यांची लेखणी आगपाखड करते. पण, ही आगपाखड त्या व्यक्तीच्या दुष्कृत्यांवर आहे, दुर्गुणांवर आहे, ती व्यक्ती ज्या जातीत जन्मली त्यावर नाही. अण्णा भाऊ साठेंच्या या क्रांतिक्रारी आणि त्याचवेळी समन्वय साधणार्‍या साहित्याचा कलारसास्वाद या विशेषांकामध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे आपल्याकडे म्हणतात. अण्णा भाऊंचे जीवन हे त्यांच्या शब्दांची कृती करणारे व्यासपीठच होते. त्यांनी अन्यायाविरोधात शब्द लिहिते केेले. तसेच ख
र्‍या आयुष्यातही त्यांनी सामाजिक, आर्थिक स्तरावरच्या अन्यायाविरोधात रणशिंग फुंकले. त्यांच्या साहित्यातला नायक इंग्रजांच्या विरोधात बंड करतो. जमीनदार, ठेकेदार यांच्या शोषणाला आव्हान देतो, तर नायिकाही अन्यायकारक रूढी आणि परंपरांविरोधात आवाज उठवतात. चौकट मोडून नवीन न्यायाची स्थापना करतात. हे नायक या नायिका अण्णा भाऊंच्या वैचारिकतेतल्या जाणिवाच होत्या. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू दे की गोवामुक्ती संग्राम असू दे, अण्णा भाऊ अन्यायाविरोधात आवाज उठवतात. साहित्यविचार आणि प्रत्यक्ष कृती करतात. अण्णा भाऊ साठेंच्या या सामाजिक चळवळींबद्दल ‘क्रांतिपर्व अण्णा भाऊ साठेया विशेषांकामध्ये आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णा भाऊ विचारवंत होते. माणूस हा त्यांच्या विचारांचा पाया आणि तर्क दोन्ही होते. त्यांच्या या विचारांशी इतर पाश्चात्त्य विचारवंतांची तुलनाही या विशेषांकामध्ये करण्यात आली आहे. सर्वार्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या अण्णा भाऊ साठेंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून ‘क्रांतिपर्व अण्णा भाऊ साठे’ हा विशेषांक प्रकाशित करताना विशेष आनंद होत आहे. आशा आहे, वाचक या नव्या दमाच्या समाज लेखकांच्या विचारांना आणि साहित्यसेवेला भरभरून आशीर्वाद आणि समर्थन देतील.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.