साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे पुरोगामित्व : एक मीमांसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2020
Total Views |

annabhau sathe_1 &nb



पुरोगामी लोकांमध्ये वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असते. पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतिवादी, सर्वसमावेशक विचार करणारे असतात. भारतात ज्या महामानवांनी पुरोगामित्वाचा प्रचार व प्रसार केला, त्यांच्यापैकी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे या जागतिक कीर्तीच्या साहित्यिकाने साहित्यातून, चळवळीतून, कलापथकातून समतावादी, सुधारणावादी, प्रयत्नवादी, प्रगतिवादी लेखन करून समाज प्रबोधन केले आहे. जागतिक कीर्तीचे साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांनी जीवन जाणिवेसह सामाजिक संवेदनातून जी साहित्यनिर्मिती केली, ती परिवर्तनवादी आहे. साहित्यातून वंचित, शोषित, दलित, पीडित, कष्टकरी समाज, जीवन त्यांनी चित्रित केले. गावकुसाबाहेरील माणसांना साहित्यात आणून त्यांचे वास्तव जीवन समाजासमोर मांडले. परिवर्तनवादी व मानवतावादी दृष्टिकोनातून लेखन करून उपेक्षित, वंचित, कष्टकर्यांना माणूसपण बहाल केले. समाजव्यवस्थेत आजपर्यंत दुय्यम दर्जा असणार्या स्त्री वर्गाचे संघर्षमय जीवन चित्रित करताना सकारात्मकता, आशावाद त्यांनी प्रकट केला आहे.



अण्णा भाऊ साठे यांच्या विविधांगी साहित्याचे अवलोकन केल्यास असे लक्षात येते की, नवक्रांतीसाठी, कालानुरूप वाटचालीसाठी लोकांना प्रवृत्त करण्यास त्यांनी साहित्यातून दिशा दिली. पारंपरिक तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर केले. नाटके, पोवाडे, कथा-कादंबर्या, प्रबोधनपर गीते ही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांशी निगडित असून पुरोगामित्व प्रदर्शित करणारे आहेत. अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील अग्रेसर साहित्यिक आहेत. त्यांनी सुधारणावादी, समतावादी, परिवर्तनवादी, सर्वसमावेशक विचारांनी लेखन केले आहे. भारतीय समाजामध्ये बदल झाला पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे, परंपरागत रूढी, परंपरा बदलून नव्या विचारांनी, विज्ञानवादी दृष्टिकोनातून सामाजिक बदल झाला पाहिजे, या उद्देशाने त्यांनी लेखन केले. अनेक कथांचे लेखन विज्ञानवादी दृष्टिकोनातून केलेले आहे. अनिष्ट रूढी-परंपरांचे दुष्परिणाम कथा-कादंबर्यांमध्ये प्रकट केले आहे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनवादी साहित्य आहे.



अण्णाभाऊ साठे यांनी १९४९मध्ये कादंबरी लेखन प्रारंभ केले, तेव्हा फडके, खांडेकर, माडखोलकर या प्रस्थापित लेखकांच्या लेखनावर महाराष्ट्रातील जनता बेहद खूश होती. परंतु, अण्णा भाऊ साठे या सिद्धहस्त लेखकाने नव्या विचारांसोबत उपेक्षितांचे नवे अवकाश साहित्याद्वारे मोकळे केले. या साहित्यातील पुरोगामित्वाची झळाळी पाहून जगामधील रसिकांनी साहित्याचा स्वीकार केला. अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून नैतिकता, देशाभिमान, मानवता याला महत्त्व दिले. स्त्रीने झुरत, कुढत जगणे अण्णा भाऊ साठे यांना मान्य नाही. म्हणूनच ‘सक्षमता’ व ‘सबलता’ या शब्दांना व्यापकपणे अर्थरूप देताना स्त्री साहित्यात स्त्रीला स्वातंत्र्य बहाल करून नवविचारांची व नववर्तनाची मोकळीक दिली आहे. स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान असतानाही स्त्री समस्या मांडून त्याची उकल ही स्त्रियाच कशी करतात, हे चित्रित करून स्त्रियांची बलस्थाने अधोरेखित करताना पुरोगामित्वाची मांडणी केली. अण्णा भाऊ साठे साहित्यातून समता, व्यक्तिस्वातंत्र्य, परिवर्तन हेच पुरोगामित्वाचे आयाम आहेत, असे अधोरेखित करताना दिसतात. तसेच मानवी जीवनाचे वास्तव दर्शन घडविताना कालानुरूप पुरोगामी विचारांची मांडणी करताना दिसतात. सामाजिक क्रांती व्हावी, जातीअंताची चळवळ वाढावी, देश सुरक्षित व सुखी व्हावा, देशात समता नांदावी, स्त्रीचारित्र्याचे संरक्षण व्हावे, देशाचे नंदनवन व्हावे, या सहेतुकपणे अण्णा भाऊंनी दर्जेदार, वैविध्यपूर्ण लेखन केले, ते पुरोगामी विचारसरणीतूनच. त्यांनी आंतरराष्ट्रीय विषयांवर तीन पोवाडे रचले व पहाडी आवाजात सादरीकरणही केले. शिवाजी महाराजांवर रचलेला पोवाडा त्यांनी रशियन जनतेसमोर सादर केला व मराठी भाषेत भाषण केले. १९६१ मध्ये महाराष्ट्रातील या जगद्विख्यात साहित्यिकाने रशियात मराठीत भाषण करून रशियन जनतेला मंत्रमुग्ध केले, ही बाब आम्हा मराठी जनांसाठी अभिमानाची आहे. ‘मला लढणे मान्य आहे रडणे मान्य नाही’ हे अण्णा भाऊंनी विशद केलेले तत्त्व, त्यास अनुसरून साहित्यातील नायक-नायिका आपले जीवन यशस्वीपणे जगताना दिसतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून श्रमाला महत्त्व देणारे नायक व नायिका भारतीय समाजाला दिशादर्शक ठरतात. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य परंपरागत विचारांना पुष्टी देणारे नसून समता, सुधारणा, परिवर्तन, आधुनिक, विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणारे आहे आणि नावीन्य पूर्णतेने सजलेले आहे. साहित्यातील नवे विषय, विचारांमधील वेगळेपण, मानवतावादी दृष्टिकोन यातून केलेले लेखन स्त्रियांना बहाल केलेलं स्वतंत्रपण असे पुरोगामी विचारवंत अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे.




सन १९५६ मध्ये पहिले दलित साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष अण्णा भाऊ साठे होते. अध्यक्षीय भाषणात पुरोगामी विचारातून एक महत्त्वपूर्ण तत्त्व त्यांनी विशद केले. अण्णा भाऊ म्हणाले, “ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.” परंपरागत विचारांना भेदून हा शब्दरुपी बाण परंपरागत प्रस्थापितांचे मस्तक पटल छेदून जागतिक पटलावर विराजमान झाला. श्रमिकांच्या श्रमाला प्रतिष्ठा आहे. त्यांना तुच्छ मानू नका. त्यांच्या श्रमाचे मोती तयार होऊन सुंदर जग निर्माण झाले आहे. कष्टकर्यांच्या श्रमाने पृथ्वीवरील सर्व व्यवहार सुस्थिर आहेत. केवढा मोठा विचार आणि प्रगल्भता आहे! पृथ्वीवरील वास्तवता शब्दसामर्थ्याने दर्शवून एका तत्त्वाची मांडणी अण्णा भाऊ साठे यांनी केली आहे. ‘श्रमप्रतिष्ठा’ या मूल्याचा प्रचार व प्रसार आपल्या वाणीतून करत असताना पुरोगामित्व जोपासताना अण्णा भाऊ साठे दिसतात.अण्णा भाऊंनी प्रतिकूल परिस्थितीतही आपली तत्त्वे अबाधित ठेवली. त्यांचा प्रसार केला. पुरोगामित्वाचा प्रचार व प्रसार लेखनातून जागृत ठेवला. पुरोगामित्वाचे विचार प्रसवणारे अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मराठी साहित्यसृष्टीच्या इतिहासातील सुवर्ण अलंकृत यशोधन आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या या साहित्यिकाने साहित्यक्षेत्रात समतेचे लढे उभे केले. स्त्रीप्रधान कथा-कादंबर्या, नायकप्रधान कथा-कादंबर्या यांची निर्मिती केली. स्त्रीचे नवे रूप स्पष्ट करताना नव्या युगातील नवी स्त्री अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी उभी केली. देशाचे स्वातंत्र्य स्त्रीचे चारित्र्य व पुरुषांचा स्वाभिमान या उद्देशाने प्रेरित साहित्य निर्माण केले.वर्षानुवर्षे बाद केलेली माणसे साहित्यातच नव्हे, तर जीवनाच्या प्रांगणात सन्मानित केली.





अनेक साहित्य प्रकार हाताळताना नवीन विषयांचे भांडार निर्माण केले. मराठी साहित्याचे केंद्र अण्णा भाऊंनी नागरी मध्यम वर्गापासून ग्रामीण जनतेकडे तसेच दलित भटक्या कष्टकरी आदिवासी समाजाकडे वळवले. कथा-कादंबरी यातील नायक-नायिकांच्या व्यथा -वेदनांचे, अपेक्षा-आकांक्षांचे व त्यातील अविरत चालणार्या संघर्षाचे रेखाटन केले आहे. म्हणूनच त्यांच्या साहित्याची दिशा परिवर्तन सन्मुख व समाजाभिमुख आहे, याची खात्री पटते. अण्णा भाऊ साठे यांनी कामगार, मजूर, दुर्बल घटक यांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले. जगण्यासाठी लढणारी माणसं त्यांनी पाहिली. त्यामुळे समाजातील विषमतेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध बंड करण्याची त्यांची वृत्ती बनली. जुलूम-जबरदस्तीला विरोध करणारी व भयग्रस्त स्थितीत जगणारी अशी दोन्ही प्रकारची माणसे त्यांनी पाहिली. त्याप्रमाणे आपल्या साहित्यामध्ये झुंजार, लढाऊ, निर्भय वृत्तीच्या नायिका-नायक साकारले. ‘बरबाद्या कंजारी’ या कथेतील बरबाद्या व त्याची मुलगी निलू जात पंचायती विरुद्ध बंड पुकारून परिवर्तनाच्या प्रवाहात स्वतःला झोकून देतात. ‘चंदन’ कादंबरी येथील चंदन ही एक लढाऊ कामगार स्त्री प्रतिकूल परिस्थितीत एकटी सक्षमपणे जीवन जगते. कितीही संकटे आली तरी सावधपणे त्यावर मात करत जगण्यासाठी संघर्ष करते. ‘फकिरा’ कादंबरीतील फकिरा हा नायक इंग्रजांविरुद्ध लढत असताना एके ठिकाणी म्हणतो, “एकेक माणूस दहादा गोळ्या खाऊ, उद्या म् मरायचं ते आज मरू, शेळी होऊन शंभर वर्षे जगण्यापरीस वाघ होऊन एक दिवस जगू.” अन्यायाविरोधात लढण्यासाठी अण्णा भाऊ समाजाला नवापरिवर्तनवाद सांगून गेले.

माणसावाणी हिमतीनं दुष्काळात गावच्या लोकांना जगवण्यासाठी इंग्रजांच्या धान्याच्या गोडाऊनवर हल्ला करताना एका बंद खोलीत त्या गोडाऊनच्या रखवालाची मुलगी व बायको असते. त्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर दोघीही थरथर कापतात. विनवणी करतात तेव्हा फकिरा म्हणतो “आई थांब! मी खजिना नेणार हाय, तुम्हास्नी ओर- बडाय आलो नाय. कारण, अब्रू खाऊन उपाशी माणसं जगत नसतात.” आपल्या घरात बसा. अत्यंत आगळ्यावेगळ्या हृदयाचा नीतिवंत फकिरा येथे अण्णा भाऊ साठे यांनी साकारलेला आहे. नैतिकता जोपासणार्या परिवर्तनवादी विचारांच्या फकिराचा आदर्श आजच्या तरुण पिढीला बोधप्रद आहे. तमाशा कलावंत वैजंयता, लढाऊ कामगार चंदन, भटक्या जमातीतील दुर्गा, मुरळी प्रथेमधील सीता, चित्रा आवडी या नाही का प्रतिकूल परिस्थितीतही चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या आहेत. मानवतावाद अंगीकृत करून, मूल्यांचे संवर्धन करीत, समृद्ध जीवन जगण्याचा पुरोगामी विचार अण्णा भाऊ साठे साहित्यातून देतात. एकंदरीत अण्णा भाऊ साठे विज्ञानवादी, परिवर्तनवादी, प्रगतिवादी, सकारात्मकता व आधुनिकता यांची साहित्यातून पखरण करीत पुरोगामित्व प्रसारित करणारे मानवतावादी, प्रतिभासंपन्न, सिद्धहस्त, जागतिक कीर्तीचे साहित्यिक आहेत.


- डॉ. उज्ज्वला हातागळे
9921512782


@@AUTHORINFO_V1@@