साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

    दिनांक  30-Aug-2020 22:26:31
|

annabhau sathe_1 &nbसाहित्यरत्न थोर लेखक अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राच्या पावनभूमीतील व मराठी वाङ्मय जगतातील जागतिक कीर्तीचा एक तेजस्वी ध्रुवतारा आहे. प्रतिभेच्या जोरावर ज्ञानार्जन करून साहित्यसेवेद्वारे देशप्रेम, देशसेवा, राष्ट्रप्रेम महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक काळापासून ते सद्यकालीन काळापर्यंत अचूक विश्लेषणात्मक मांडणी करणारे अण्णा भाऊ साठे एक अद्वितीय नाव होय. “वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा आहे,” असे १९५८च्या पहिल्या भारतीय दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणातून प्रतिपादन करणारे अण्णा भाऊ सामाजिक परिवर्तनातून सक्षम भारत निर्मिती या सात्विक ज्ञानाच्या अधिष्ठानावर साहित्य निर्मिती करतात. असे हे अण्णा भाऊ साठे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते.“माझा माझ्या देशावर, जनतेवर, नीतीच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी आणि समृद्ध व्हावा. इथे समानता नांदावी. या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे, जी मला रोज स्वप्ने पडत असतात ती मंगल स्वप्ने पाहत मी लिहीत असतो,” अशी आपली वैचारिक साहित्यिक भूमिका अण्णा भाऊ साठे मांडतात. अण्णा भाऊंच्या साहित्याचे वैचारिक अधिष्ठान हा भारतीय राष्ट्रीयत्वाच्या जाणिवांना वृद्धिंगत करून अखंड भारताच्या वैभवशाली परंपरेचा चिरंतन वाहणारा झरा होय. प्रस्थापित साहित्य विचार, मापदंड व समीक्षामूल्य सतत बदलत असतात. गेली आठ दशके अण्णा भाऊंचे अभिजात साहित्य, त्यांची उपयोगिता व समर्पकता दिवसेंदिवस वाढत आहे हे सिद्ध करत आहे.वाङ्मयीन सामाजिक प्रबोधनकार, कथाकार, तत्त्वज्ञ, सामाजिक व मानवी कल्याणाच्या चळवळीचे अण्णा भाऊ एक अग्रणी होते. त्याचबरोबर ‘शिवशाहीर’ म्हणूनही त्यांची ख्याती होती. समाजक्रांतीचे खरे समाजशास्त्रज्ञ आणि मराठी प्रतिभेचा महामेरू म्हणून अण्णा भाऊ साठे यांच्याकडे पाहिले जाते. १९४९ ते १९६९ या २० वर्षांच्या कालावधीत अण्णा भाऊंनी ३०० कथांचे लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याचे हिंदी, सिंधी, बंगाली, मल्याळी, गुजराती त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय भाषेत जर्मन, इंग्रजी, पोलीश, रशियन इत्यादी भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. अण्णा भाऊंच्या साहित्याचे भाष्यकार डॉ. बाबुराव गुरव लिहितात, “अण्णा भाऊंची कथा सातासमुद्रापार जाऊन जात, पंथ, धर्म, देश, काल, सीमा आणि भाषा या सर्वांना छेदणारे महान साहित्य आहे. मराठी साहित्याला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून देणारे विश्वरत्न म्हणजे अण्णा भाऊ साठे होत.” अण्णांचे साहित्य यामध्ये तोचतोचपणा आपल्याला पाहावयास मिळत नाही. याउलट विषय वैविध्यता, आशय संपन्नता, अनुभव समृद्धता व संघर्षशीलता याने ओतप्रोत भरलेले समीक्षकांनी भरभरून लिहिले गेलेले, अभ्यासले गेलेले साहित्यिक म्हणजे अण्णा भाऊ आहेत. पारंपरिक आकृतीबंधातून मुक्त असून ही मानवी जीवनाचे वास्तव कधी विद्रोही तर कधी सामंजस्य पद्धतीने मराठी किंवा दलित साहित्यापलीकडे जाऊन लढणाऱ्या माणसांच्या विश्वाची निर्मिती करणारे साहित्यिक म्हणजे अण्णा भाऊ आहेत. नैतिकता, विश्वबंधुता, जागतिक मानवतावादाचा पुरस्कार व राष्ट्राभिमान, त्याचबरोबर देशाचे स्वातंत्र्य, स्त्रीचे शील, पुरुषाचा स्वाभिमान आणि मानवाची प्रतिष्ठाही अण्णा भाऊंच्या साहित्याची मूलभूत मूल्यं होत. समाज प्रबोधन व लोकजागृती हे अण्णा भाऊंचा लेखनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.


साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे हे दुर्मीळ बहुआयामी जागतिक व्यक्तिमत्त्व होते. कामगार, कवी, लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, लोकनाट्याचे जनक, अभिनेते, उत्तम नट, आणि माणसांवर, मानवी जीवनावर उत्कट प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व असे विविध पैलू असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आहेत. ‘तमाशा’ या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे राष्ट्रीय कार्य अण्णा भाऊंनी केले. अण्णा भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र रशियात जाऊन पोवाड्यांच्या माध्यमातून मांडले ज्यांचे रशियन भाषांतरही झाले आहे. अशा प्रकारे अण्णा भाऊ आंतरराष्ट्रीय शिवचरित्रकार बनले.‘फकिरा’ही १९६१सालची अजरामर कादंबरी, जीची आता ५४वी आवृत्ती चालू आहे. ती कादंबरी लिहून त्यावर आधारित चित्रपटात ‘फकिरा’ची प्रमुख भूमिका अण्णा भाऊंनी साकारली. या चित्रपटाची पटकथा-संवाद लेखनही अण्णा भाऊंनी स्वतः केले होते. “अण्णा भाऊंच्या अभिनयाच्या अनेक लकबी व युक्त्या मी शिकलो आहे,” असे प्रसिद्ध कलावंत दादा कोंडके व अशोक सराफ यांनी नमूद केले आहे. मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपट क्षेत्रातही अण्णांचा दबदबा होता. ‘परदेसी’ या हिंदी चित्रपटात अण्णा भाऊंनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. Indian People's Theatre Association (IPTA) १९४३ या चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वात जुन्या संघटनेचे एकमेव मराठी अध्यक्ष म्हणजे अण्णा भाऊ साठे होते. ‘चार दिल चार राहे है ’ या शम्मी कपूर, राज कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात ख्वाजा अहमद यांच्या सोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही अण्णा भाऊंनी काम केले आहे.


वंचितांचा आवाज पत्रकार अण्णा भाऊ साठे

ज्येष्ठ विचारवंत, ख्यातनाम लेखक, पत्रकार अशी बहुश्रुत ओळख असलेले अण्णा भाऊ साठे हे एक देशातील जनसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे व अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे निर्भीड पत्रकार होते. ज्ञानसंपन्न अण्णा भाऊंनी लोककेंद्रित पत्रकारिता करताना ‘युगांतर’ नावाच्या वर्तमानपत्रात तथा नियतकालिकात एक प्रभावी पत्रकार म्हणून वाटचाल केली. भारतीय स्वातंत्र्य, ब्रिटिश सत्ता आणि भारतीयांचे शोषण, महागाई, महाराष्ट्रधर्म, संस्कृती, मुंबईतील मानवी जीवनाचे विविध पैलू, वाढत जाणारा भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था हे विषय अण्णा भाऊंनी पत्रकार या भूमिकेतून चपखलपणे हाताळले होते. १६ जुलै, १९४४ला ‘लोकयुद्ध’मधून अण्णा भाऊंचा प्रसिद्ध झालेला ‘दलितांचे मरणासन्न जीवन’ हा लेख सर्वश्रुतआहे. अण्णा भाऊंच्या साहित्यातील वैचारिक सैद्धांतिक प्रभाव मानवी जीवनाचा लढा व सांस्कृतिक परिघाबाहेरच्या मानवाच्या जीवनाचे चित्रण अण्णा भाऊंच्या साहित्यामध्ये प्रगल्भतेने पाहायला मिळते. रंजनवाद, कल्पनावाद यांच्या पलीकडे जाऊन वास्तववादात रमणारे अण्णा भाऊंचे साहित्य विशाल अर्थाने मानवतावादी बनते. अण्णा भाऊंच्या सुरुवातीच्या साहित्यावर साम्यवादाचा प्रभाव दिसत असला तरी अण्णा भाऊ आंधळे साम्यवादी नव्हते, तर ते डोळसपणाने लिखाण करणारे साहित्यिक होते. जाती व्यवस्थेने क्षीण झालेल्या भारतीय व्यवस्थेतील परिघात परिवर्तनवादी जीवन दर्शन देणारे अण्णा भाऊ साम्यवादापासून वेगळे विचार मांडणारे ठरतात. अण्णा भाऊंच्या साहित्यावर व त्यांच्या आयुष्याचा मधल्या टप्प्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वविचारांची छाप दिसून येते.


जागतिक मानवतावादी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे


अण्णा भाऊंची पत्रकारिता सत्याची सचोटी आणि स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहण्याचे नैतिक धैर्य देणारी पत्रकारिता आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व ‘चले जाव’ आंदोलनाच्या काळात अण्णा भाऊ स्वतः त्यात दाखल झाले होते व ‘युगांतर’, ‘लोकयुद्ध’, ‘लोकसाहित्य’ या नियतकालिकांमधून नियमित लेखन केले व ‘चले जाव’ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीला धार देण्याचे अजोड कार्य केले आहे. माणूस हाच मानवी जीवनाचा शिल्पकार आहे, मानवी जीवन हे संपूर्ण पणे मानवाच्या हातांमध्ये आहे आणि मानवी जीवनाचे मूल्य हीच अंतिम मूल्य आहेत, असा मानवतावादाचा प्रखर विचार आहे. खरे-खोटे, सत्य-असत्य, नीति-अनीति, पवित्र-अपवित्र, योग्य-अयोग्य या आणि अशा प्रकारच्या अनेक मापदंडाचा निर्माता हा मनुष्य आहे. हे तत्त्वज्ञान किंवा या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन केलेले लिखाण म्हणजे खर्या अर्थाने मानवतावाद या विचारसरणीचे समर्थन होय. युरोपमधून पंधराव्या शतकातून सुरू झालेल्या या मानवतावादी विचारांचा गडद पगडा अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर दिसतो. नैतिक जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान, निसर्गाप्रति, देशाप्रति, मानवाप्रति अत्युच्च प्रेम, धर्म सहिष्णुता यांनी मिळून बनलेलं जागतिक मानवतावादी तत्त्वज्ञान इत्यंभूतपणे आपल्याला अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात पाहायला मिळते. जागतिक क्षेत्रातील इत्यंभूत माहिती, त्या देशांमधील सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे व त्याचा होणारा चांगला वाईट परिणाम याची सांगोपांग मांडणी अण्णांच्या साहित्यात पाहावयास मिळते. भारतातील अनेक प्रादेशिक व जवळजवळ 27 आंतरराष्ट्रीय भाषेत भाषांतरे होणारा पहिला मराठी लेखक म्हणजे केवळ अण्णा भाऊ होते ही सर्व महाराष्ट्रीय लोकांसाठी व भारतीयांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.


- प्रा. डॉ. बळीराम गायकवाड
9820724369
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.