प्रमुख पाश्चात्य राजकीय विचारवंत आणि अण्णा भाऊ साठे : वैचारिक साम्य आणि भेद

30 Aug 2020 22:30:43

political thinker western


साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या वाङ्मयीन, सामाजिक, राजकीय जीवनांचे मूल्यमापन करणारे लिखाण अलीकडे होऊ लागलेले आहे. त्यांच्या सर्व साहित्यकृती अजोड आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्याच्या आधारे विशद केलेले तत्वज्ञान, रेखाटलेले विचार हे नुसतेच आधुनिक विचारांशी सुसंगत नव्हते, तर पाश्चात्य आणि भारतीय विचारवंतांनी मांडलेल्या विचारांच्या पुढच्या पल्ल्याकडे मार्गक्रमण करणारे होते. त्यामुळे अण्णा भाऊंचे विचार कालसापेक्ष न ठरता ते कालानुरूप जी स्थित्यंतरे घडून येतात, त्यावर प्रभाव पाडून त्यानुरूप मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणा देणारे अमूर्त दीपस्तंभ ठरतात.


प्लेटोचा संकुचित साम्यवाद आणि अण्णा भाऊंचा व्यापक साम्यवाद


‘जिथे शासनकर्ते अज्ञानी व स्वार्थी असतात, तिथे जनतेला दुःख व दारिद्य्र भोगावे लागते’ असे प्लेटोने प्रतिवादित केले आहे. राज्याची सर्वश्रेष्ठ सत्ता ज्या पालकवर्गाकडे हाती असते, तो वर्ग भ्रष्ट व सत्तापिपासू होऊ नये म्हणून त्यांना तसे होण्यास प्रवृत्त करणार्या कारणांचा तो शोध घेतो. मानवी मन प्रभावकेंद्री असते, त्याला कनक-कामिनी यांचा मोह असतो. या मोहपाशाला हा वर्ग अडकल्यास आपल्या ध्येयापासून तो विचलित होईल, या भीतीपोटी प्लेटोने संपत्ती व स्त्रियांच्या साम्यवादाची क्रांतिकारक कल्पना मांडली. मात्र, राजकर्त्यांकडे विशेष अवधान केंद्रीत करणारा प्लेटो मात्र भांडवलदार सत्ता संपन्न त्याच्या साहित्यात व सत्तेवर प्रभाव पाडणार्या वर्गाला विसरतो. मात्र, अण्णा भाऊ म्हणतात, “ज्याप्रमाणे दुसर्याकडे अपार जमीन असल्याने माझी जमीनदारी चालू शकत नाही, त्याप्रमाणे दुसर्याकडे हत्यार असल्याने तुझी बंडखोरीही शक्य नाही! म्हणून मी म्हणतो, जसे दुसर्यांच्या दारिद्य्रात माझे ऐश्वर्य उठून दिसू शकते, म्हणजेच प्रस्थापित भांडवलदार वर्ग येथील दारिद्य्रात खितपत पडलेला गरीब मजदूर, शेतकरी वर्ग तसाच राहावा या विचारांशी नेहमी जवळीकता साधतो,” असा वास्तववादी व क्रांती निर्माण करणारा विचार अण्णा भाऊ मांडतात.


अॅरिस्टॉटलचा परंपरावादी राजकीय विचार आणि अण्णा भाऊंची सर्वसमावेशक संकल्पना


अॅरिस्टॉटलने राज्यशास्त्राला प्लेटोच्या आदर्शवादाकडून वास्तववादाकडे वळविले. राज्य आणि मानवी जीवनासाठी मौल्यवान विचार मांडणारा ‘द लॉज’ या महान ग्रंथाचा रचियता अॅरिस्टॉटल ‘गुलामगिरी’ या प्रथेचे समर्थन करतो. राज्याचे नागरिकत्व काही विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादित ठेवतो. कारण, राज्यकारभार ही कला असल्यामुळेच सर्वांकडे ती गुणवत्ता नाही, असा विचार मांडून तो असमानतेचे समर्थन करतो. उपेक्षितांची, वंचितांची जणू जत्राचं साहित्यविश्वात भरविणारे अण्णा भाऊ साठे सन १९५८च्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात म्हणतात की, “दलितांविषयी लिहिणार्यांनी प्रथम त्यांच्याशी प्रामाणिक, एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या हातावर आहे, याची जाणीव करून घ्यावी. त्यांचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी सदैव आपल्या जनतेबरोबर असावे. जगातील सर्व श्रेष्ठ कलावंतानी वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे, जनतेबरोबर असणे जरूरी आहे.” अण्णा भाऊ जनतेचे सार्वभौमत्व स्वीकारतात आणि समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार समर्थपणे करताना दिसून येतात.


यथार्थवादी निकोलो मॅकिव्हली यांचे जीवन आणि विचारांशी साम्य


इटलीमधील प्लोरेन्स या शहरात सन १४६९मध्ये जन्मलेले निकोलो मॅकिव्हली आधुनिक राज्यशास्त्राचे जनक मानले जातात, तर अण्णा भाऊ हे लोकनाट्याचे जनक आहेत. मॅकिव्हलींवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांची रवानगी तुरूंगात झाली. योगायोगे अण्णा भाऊंनासुद्धा बर्याच वेळा तुरूंगवारी करावी लागली. बंदिवासातून सुटका झाल्यावर मॅकिव्हली यांनी एन्सियानो नावाच्या गावी राहून लेखनकार्य केले. या काळात त्यांनी ‘डिस्कोर्सेस’ आणि ‘दि प्रिन्स’ हे जगतविख्यात ग्रंथ लिहिले. त्यापैकी ‘दि प्रिन्स’ हा ग्रंथ त्याने मेडिसी वंशाच्या राजाला अर्पण केला. त्यामुळे ‘राजवंशीय’ आणि गणराज्यशासक यांनी त्यांच्याकडे संशयाने पाहिले. वयाच्या 58व्या वर्षी अत्यंत सामान्य व उपेक्षित माणसासारखा त्यांचा मृत्यू झाला. अण्णा भाऊंचे काही जीवनप्रसंग याबाबत समानता दर्शवितात. मॅकिव्हली म्हणतात, “मानवी जीवनाला प्रभावित करणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘भीती’ होय. म्हणून माणासाकडून कोणतेही कार्य करवून घ्यावयाचे असल्यास प्रेमापेक्षा भीतीचा वापर करावा,” तर अण्णा भाऊंचा ‘फकिरा’ म्हणतो, “पर मी भीत न्हायं आणि कवाबी येऊ दे, त्येनं नुसती फडी जरी वर केली, तरी मी त्येला चेचून काढील.” अशी बंडखोरीची, क्रांतीची भाषा, क्रांतीचा विचार अण्णा भाऊ मांडतात.


थॉमस हॉब्ज आणि अण्णा भाऊ दोन भिन्न मतप्रवाह


थॉमस हॉब्ज हे राजकीय, सामाजिक तत्त्वज्ञानावर बहुव्यापक लेखन करणारे इंग्लंडमधील पहिले विचारवंत. त्यांनी ‘डी कार्पोर (DeCorpore), १६४० ‘डी सेव्ह, (DeCive), १६४२ एलिमेंट्स ऑफ लॉ, (Elements of Law), १६५० ‘लेविएथन’ (Leviathan), १६५१ आणि ‘ए डॉयलॉग ऑन दि सिव्हील वार्स’ (A dialogue on the Civil Wars), १६७९ असे बहुआयामी स्वरूपाचे विपुल ग्रंथलेखन केले.
थॉमस हॉब्ज असे म्हणतात की, “जसे विश्व अणुपासून बनले व ते गतिशील आहे, तद्वतच पृथ्वीवरील माणसे गतिशील असल्याने त्यांचा आपापसात संघर्ष होतो.” मात्र, अण्णा भाऊ या उलटपक्षी विचार मांडतात.
ही अवनी आदिवाशांची । कोळी भिल्लांची । मांग रामोशांची कैक जातींची प्राणाहुनी प्यार ।
पुढे अण्णा भाऊ म्हणतात,
आम्हाला चिड दास्यांची । जुलूमी सत्तेची ।
परचकांची । इतिहास साक्ष देत याला ।
करूनी आम्ही जबरदस्त हल्ला । अन्यायाचा कडेलोट केला ॥
असा प्रतिकार करण्याचा क्रांतिकारक आणि बंडखोरीचा विचार अण्णा भाऊ मांडतात.


जॉन लॉक आणि अण्णा भाऊ साठे- वैचारिक समरूपता


ब्रिटिश राजकीय तत्त्वज्ञानात थॉमस हॉब्जनंतर सर्वोच्च स्थान जॉन लॉक यांना प्राप्त झालेले आहे. सामाजिक कराराचा तो दुसरा प्रमुख प्रवर्तक. लॉक यांना राजद्रोहाच्या आरोपामुळे इंग्लंड सोडावे लागले. त्यांनी विपुल लेखन केलेले असून पाश्चात्य विचारसरणीत त्यांचे मालाचे योगदान आहे. लॉक असे म्हणतात की, “जन्मतः सर्व माणसे समान आहेत. माणूस हा नैतिक व विवेकी असल्यामुळे तो नैसर्गिक कायदा जाणून त्यानुसार वर्तन करणे आपले कर्तव्य समजतो. सुखाची इच्छा ही मानवी कार्याची प्रेरणा असते.” जॉन लॉक यांच्या विचाराशी ऐक्य दर्शविणारे विचार अण्णा भाऊ मांडतात. “एका झाडाखाली तीन दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून कुटुंब जगविणारा गरीब वरवर कंगाल दिसत असला तरी मात्र शासनकर्त्यांनी, साहित्यिकांनी त्यांचे निरीक्षण करून त्यामागची कारण परंपरा शोधावी.” त्यापुढे जाऊन अण्णा भाऊ क्रांतिकारी संदेश जनमानसांना, कष्टकर्यांना प्रेषित करतात. “तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या हातावर आहे,” असा प्रेरणादायी व ज्वलनशील विचार ते भारतीयांना देतात.


रूसोचे विद्रोही विचार आणि अण्णा भाऊ


जीन जॅक्स रूसो हा महान आणि जागतिक कीर्तीचा विद्रोही विचारवंत आणि आधुनिक मूलभूत घटनात्मक कायद्याचा उद्गाता आणि ‘मूल हे पापसंभव असते’ या ख्रिस्ती धर्मविचाराला मूठमाती देणारा तसेच फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. कदाचित विचारवंत आणि अस्थिरता यांची वैश्विक स्वरूपाची छुपी व अघोषित युती असावी. अण्णा भाऊंच्या जीवनाचा संपूर्ण प्रवाससुद्धा वादळाच्या सोबतीने ठिकठिकाणी भगदाड पडलेल्या नौकेतून झालेला आहे. हा रूसो सन १७४९ला ‘डिजोन अकादमी’ने आयोजित निबंध स्पर्धेत निबंधाच्या माध्यमातून विचार मांडतात. जेवढ्या मोठ्या प्रमाणात शास्त्रकलेत वृद्धी होत गेली, त्याच प्रमाणात मानवी मन भ्रष्ट झाले. मनुष्याच्या अनैतिकतेचे कारण समाज आहे. मनुष्य स्वाभाविकतः चांगला आहे. परंतु, सामाजिक संस्थांच्या संपर्काने त्यास दुष्ट बनविले.


समाजाकडून ज्यांच्यावर अन्याय त्यांच्याकडून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. एक प्रतिक्रिया ही ‘खून का बदला खून’ या स्वरूपाची, तर दुसरी अन्यायाची कारणे शोधून ती नष्ट करणे या स्वरूपाची असते. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकडे वाटचाल करणे त्यात अभिप्रेत असते. अण्णा भाऊंचे विचाराचे अश्व याच मार्गाने संतुलित वेगाने धावताना दिसतात. 'Self Improvement is the best way of revenge' हे अण्णा भाऊंना अभिप्रेत होते. शोषितांनी शिक्षण अथवा तत्सम दिशेने मार्गक्रमण करून सबल व्हावे, असाच संदेश त्यांच्या साहित्यातून वारंवार प्रेषित होतो. वैयक्तिक संपत्तीच्या हव्यासापोटी आर्थिक विषमता निर्माण झाल्याचे रूसो प्रतिपादित करतात, तर अण्णा भाऊ म्हणतात की, “आक्रमक वृत्ती ही सर्व प्राण्यांत असते, पण त्याचबरोबर पराजय पदरी घेण्याचा, कबूल करण्याचा किंवा माघार घेण्याचा प्रामाणिकपणाही त्यांच्यात असतो. परंतु, दोनच जाती अशा आहेत की, त्या पराजय कबूल करत नाही की, माघारही घेत नाही. त्या म्हणजे माणसात स्पर्धेनं पिसाट झालेले भांडवलदार आणि पशुत: उन्मत झालेले रेडे. त्यांना पराजय मान्य नसतो, माघार कबूल नसते. निःपातच मान्य असतो.” अण्णा भाऊंचा हा विचार कालजयी ठरतो.


जॉन स्टुअर्ट मिल यांचे स्त्री स्वातंत्र्य विषयक विचार आणि अण्णा भाऊ


उपयुक्तवादाचे स्वरूपच बदलविणारा हा ब्रिटिश विचारवंत. स्त्रीविषयक मिलची मते उदार स्वरूपाची होती. स्त्री-पुरूषांमध्ये बौद्धिक स्वरूपाचे भेद नाहीत, स्त्रीला संधी मिळाली, तर ती पुरूषांच्या बरोबरीने योग्यता सिद्ध करू शकेल, असा विचार उघडपणे व्यक्त करणारा प्रथम आधुनिक विचारवंत. भारतीय साहित्य विश्वात स्त्रीच्या भावनांना विशेषतः सामान्य गृहिणी ते भटके विमुक्त जीवन जगणार्या समाजातील स्त्रिया, वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रिया, मोलमजुरी करणार्या स्त्रिया, त्यांचे जीवन, जीवनमूल्ये, जीवनविषयक दृष्टी, त्यांचे हक्क-अधिकार, स्वाभिमान, स्वातंत्र्य यांचा पुरस्कार व पूर्ण ताकदीने लेखन अण्णा भाऊंनी केले. अण्णा भाऊ साठे नुसते साहित्यिकच नव्हते, तर विभिन्न राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच वैश्विक स्वरूपाचे प्रश्न, त्यांची सोडवणूक करणारे, विचार मांडणारे सशक्त व प्रतिभासंपन्न तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र थोर विचारवंत होते. मात्र, ‘साम्यवादी’ शिक्का लागलेल्या या समाजनायकाला ना आंबेडकरवाद्यांनी स्वीकारले ना, लोकशाहीचा टेंभा मिरविणार्या तत्कालीन शासनकर्त्यांनी. एवढ्या विशाल साहित्यिकाला ना ‘महाराष्ट्रभूषण’ मिळाला ना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्राप्त झाला.


कार्ल मार्क्सचा शास्त्रीय समाजवाद आणि अण्णा भाऊ - साम्य आणि भेद


अण्णा भाऊंच्या जीवनकार्याचा आढावा घेतल्यावर जाणवते की, अण्णा भाऊ मार्क्सवादी असावेत, नव्हे एक काळ होता की ते कार्ल मार्क्स यांचे एकलव्यच ठरतात. मात्र, कार्ल मार्क्स हे भौतिक विचारांना व विशेषतः आर्थिक बाजूंचा विचार मांडतात. याबाबत अण्णा भाऊंचे वेगळेपण प्रकर्षाने दिसून येते. त्यांच्या बुद्धीत जरी साम्यवाद दिसत असला तरी त्यांच्या हृदयात आदर्शवादाचे, मानवतावादाचे, उपयुक्ततावादाचे झरे नि:स्पृहपणे वाहत असल्याची साक्ष त्यांचे लेखनकार्य, जीवनातील विविध प्रसंग त्यांनी आविष्कृत केलेल्या कथा, कादंबर्यांत पदोपदी मिळते. मार्क्स सत्तेसाठी शस्त्र हातात घेण्याची भाषा करतात. मात्र, अण्णा भाऊंची क्रांती ही हिंसेकडे वळत नाही तर ती शाश्वत मानवी मूल्यांची पाठराखण करते. सामाजिक एकता आणि माणूसपणावर विश्वास ठेवते. सत्तासंपादनासाठी रक्तरंजित मार्ग स्वीकारणे, असंवेदनशील होणे, हे अण्णा भाऊंच्या विचारांमध्ये नव्हते.


- प्रा. राहुल एस. हिवराडे
८८०५९१७९२१
Powered By Sangraha 9.0