कला ही कला असते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2020
Total Views |

o henrry_1  H x




कला ही कलाकाराकडून काय वाटेल ते करून घेते. कलेसाठी काहीही केलं तरी कलाकाराला त्याचे श्रम जाणवत नाही. कारण, कला ही कला असते. जो लॅराबी नावाच्या मुलाने वयाच्या सहाव्या वर्षी एक चित्र काढलं. त्याचं कौतुक झालं. वयाच्या विसाव्या वर्षी तो मोठा चित्रकार होण्यासाठी पाठीवरच्या सॅकमध्ये जरुरीपुरते कपडे, इतर सामान आणि साठवलेले पैसे घेऊन न्यूयॉर्कला आला. डेलियाचा आवाज लहानपणापासून गोड होता. गायिका होण्यासाठी ती देखील साठवलेली पुंजी घेऊन न्यूयॉर्कला आली. जो आणि डेलियाची एका संमेलनात भेट झाली. ओळख झाली. दोघांना वाटलं की आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि आपण एकमेकांना अनुरूप आहोत. म्हणून त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर जोच्या घरात दोघे राहू लागले. मॅजिस्टर नावाच्या ज्येष्ठ चित्रकाराकडे जो शिकायला जाऊ लागला. रोझेनस्टाक नावाच्या ज्येष्ठ संगीतविशारदाकडे डेलिया पियानोवादन शिकायला जाऊ लागली.


काही दिवसांनी त्यांची पुंजी संपत आली. पण, एकमेकांवरचं किंवा कलेवरचं - कोणतंही प्रेम संपत आलं नाही. डेलियाने पियानोवादनाचा वर्ग सोडला. इकडे तिकडे चौकशी केली आणि जनरल पिंकने नावाच्या लष्करी अधिकार्‍याची तरुण मुलगी क्लेमेंटिना हिला संगीताचे धडे द्यायला जाऊ लागली. जोने चित्रकलेचा वर्ग सोडला आणि बागेत बसून जलरंगात निसर्गचित्रे काढून ती रस्त्यावर विकायचा निश्चय केला. जो सकाळी ७ वाजता निघायचा. डेलिया त्याला जेवणाचा डबा, शुभेच्छा आणि निरोपाचे हळवे चुंबन द्यायची. मग घरकाम करून दुपारी क्लेमेंटिनाला शिकवणी देण्यासाठी जायची. दोघे संध्याकाळी ७ वाजता घरी दमून आले की दिवसभराच्या हकिकती सांगत. क्लेमेंटिना अतिशय ‘ढ’ विद्यार्थिनी होती. तिच्या गळ्यातून सूर काढता काढता डेलियाला नाकी नऊ येत. पण, कलेसाठी राबताना कलाकाराला कधीच कंटाळा येत नाही. जोला पिऑरियाहून आलेला एक चोखंदळ व धनाढ्य ग्राहक भेटला होता. त्याच्या सूचनेबरहुकूम जोने एक चित्र काढायला घेतलं होतं. शनिवारपर्यंत ते पूर्ण झालं की तो ग्राहक चित्र घेऊन आपल्या गावी जाईल. सोमवारी परत येईल, तेव्हा नव्या चित्राला सुरुवात करता येईल.


बघता बघता एक आठवडा गेला. संध्याकाळी दोघे ७ वाजता घरी आले तेव्हा थकलेले होते. पण, दोघांच्या चित्तवृत्ती उल्हासित होत्या. आधी जोने खिशातून पाकीट काढलं आणि त्यातले ३५ डॉलर्स डेलियाला दाखवले. अखेरीस तो ग्राहक आपले चित्र घेऊन गेला होता! डेलियाला देखील संगीत शिकवणीचे २५ डॉलर्स मिळाले होते. दोघांनी ती रात्र आणि रविवारची सुट्टी चैनीत आणि खुशीत व्यतीत केली. सोमवारपासून पुन्हा कामाला सुरुवात.


असे काही आठवडे गेले. घरात भरपूर पैसे येत होते. त्यामुळे असं नाही, पण दोघांचा संसार सुखाने चालला होता.


एका शनिवारी संध्याकाळी जो घरी आला आणि वॉशरूममध्ये जाऊन त्याने हाताला लागलेला तैलरंग स्वच्छ धुवून काढला. तोवर डेलिया आली. आज तिच्या हाताला काहीतरी जखम झाली होती. जोने विचारल्यावर ती सांगू लागली, “आज शिकवणी संपल्यानंतर कॉफी घ्यायची होती. पण, नेमके घरातले नोकर बाहेर गेले होते. क्लेमेंटिनासाठी आणि माझ्यासाठी अशी दोघींसाठी मी कॉफी बनवली. पण, ती ओतताना चुकून माझ्या हातावर सांडली आणि हात भाजला.”
घरगुती बँडेज गुंडाळलेला तिचा हात जोने हलकेच हातात घेतला. तिने ‘स्स’ केलं.

“साधारण किती वाजताची गोष्ट आहे ही?”

“६ वाजता, मी घरी निघते तेव्हाची. का? काय झालं?”
 
उत्तरादाखल जोने तिच्या खांद्यावर हात ठेवून हलकेच दाबला. मग तो म्हणाला, “मला तुझ्यापाशी काही कबुली द्यायची आहे. मी तुला इतके दिवस खोटं सांगितलं. मी एकही चित्र विकलं नाही. तो पिऑरियाहून आलेला ग्राहक काल्पनिक होता. मी एका लाँड्रीमध्ये धुलाई यंत्र चालवण्याचे आणि त्याची निगा राखण्याचे काम करतो. दर शनिवारी मला ४० डॉलर्स मिळतात. त्यातले ५ डॉलर्स इकडेतिकडे खर्च होतात आणि 35 डॉलर्स मी घरी आणतो. आज संध्याकाळी ६च्या सुमारास एक यंत्र दुरुस्त करीत असताना वरच्या मजल्यावरच्या इस्त्रीच्या विभागात काम करणारी कोणीतरी जखमी झाल्याचं समजलं. म्हणून प्रथमोपचार पेटीतलं औषध, कापसाचा बोळा आणि बँडेज वर पाठवलं होतं. तुझ्या हातावरची मलमपट्टी मी लगेच ओळखली.”


ऐकता ऐकता डेलियाचे देखील डोळे भरून आले होते. हसण्याचा प्रयत्न करीत ती म्हणाली, “गरम इस्त्रीला स्पर्श झाल्याने माझा हात भाजला होता. जसा तुझा पिऑरियाहून आलेला ग्राहक मिथ्या, तशीच माझी क्लेमेंटिना मिथ्या!”


मग दोघे भरल्या गळ्याने मनापासून हसले. दोघांनी एकमेकांना सांगितलेल्या हकीकती मिथ्या असल्या तरी त्यांचं प्रेम सत्य होतं. त्यामुळे ते नंतरही सुखाने संसार करीत राहिले. प्रेमात एकमेकांना खुश करण्यासाठी खोटं बोलणं ही देखील कला असते. आणि कला ही शेवटी कला असते.


- विजय तरवडे

(ओ हेन्रीच्या - SERVICE OF LOVE या कथेवर आधारित)
@@AUTHORINFO_V1@@