१९४२ची चळवळ आणि काँग्रेसेतर पक्षाची भूमिका

    दिनांक  29-Aug-2020 23:32:33
|

chale jaav_1  H


१९४२ची ‘चले जाव’ चळवळ, त्याचे फलित, त्या चळवळीतील हिंदू संघटनवादी हिंदू महासभा आणि फक्त आणि फक्त हिंदूहिताचा पर्यायाने राष्ट्रहिताचा विचार करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. मुंजे यांच्या भूमिकेवर भाष्य करणारी एक पोस्ट वाचनात आली. त्यावर माझ्या अल्प वाचनाने आणि बुद्धीने मला झालेले आकलन मांडण्याचा हा एक प्रयत्न

कुणी तरी त्याला आलेली समाजमाध्यमांवरील पोस्ट फॉरवर्ड करतो. बहुतेक वेळी अशा आलेल्या पोस्ट म्हणजे बिनकामाचा कचरा असे म्हणत, सहज नजर मारीत डिलीट करणं शहाणपणाचं असतं.कारण, आज आपल्या वर्तुळातील प्रत्येक जण कुठल्यातरी विचारधारेच्या कमी-अधिक प्रभावात असतो. त्यातही दिवसेंदिवस सर्वसाधारणपणे वाचन म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुक! त्यामुळे असेल कदाचित, पण, वाचन, चिंतन, मनन कमी आणि अभिनिवेश जास्त अशी स्थिती. आणि बहुतेक पोस्ट कुठल्यातरी पक्षीय विचारधारेच्या अभिनिवेशातूनच आलेल्या असतात. त्यामुळे संवेदनशील माणसाने फार विचार करावा असे त्यांचे महत्त्वही नसते. पण, समाजमनावर परिणाम करण्याची ताकद मात्र त्यात नक्कीच असते. त्यामुळे अनेकदा विशिष्ट उद्देशाने पेरल्या जाणार्‍या काही पोस्टचे सत्यान्वेषी विश्लेषण आवश्यक ठरते.


स्वातंत्र्य आंदोलनातील १९४२च्या चळवळीचाच असा सुटा विचार करता येईल काय? कारण, अगदी १८५७ पासून स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे, विविध प्रकारे, समाजाच्या विविध अंगांनी चाललेल्या जन आंदोलनाची एक कडी म्हणजे १९४२ची ’चले जाव’ चळवळ होय. अर्थात, तेवढाच विचार केला तर पाहिजे तसे निष्कर्ष काढणे सोपे असते. इतर विचारांना कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मिळू नये, असे पद्धतशीर प्रयत्न नंतर सत्ताधार्‍यांनी केले. वेगवेगळ्या विचारांचे लोकसमुह या स्वातंत्र्य आंदोलनात खांद्याला खांदा लावून, किंबहुना सर्वस्वाचा त्याग करून सहभागी होते. मात्र, ही माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचू दिली नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस. काँग्रेस पक्ष आणि स्वातंत्र्य आंदोलनातील काँग्रेस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे सामान्य लोकांना कळूच दिले गेले नाही. अर्थात, ‘स्वातंत्र्यानंतरचा काँग्रेस पक्ष आणि स्वातंत्र्याआधीची काँग्रेस एकच’ अशी सर्वसामान्यांची समजूत करून दिली गेली.


स्वयंसेवकांचा सुरक्षाव्यवस्थेत सहभाग


काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनातील विविध विचारधारा, संघटना, त्यांचे नेते यांचे अधिवेशन. मात्र, हे अनेकदा लक्षात घेतले जात नाही. नागपूर काँग्रेस अधिवेशनामध्ये व्यवस्था व सुरक्षा व्यवस्था संघाच्या स्वयंसेवकांनी केली होती, हे त्यामुळेच आजच्या घडीला अनेकांना माहित नसतं आणि पटतही नसतं. आजच्या सारखेच तेव्हाही वेगवेगळे मतप्रवाह, विचारधारा या देशात अस्तित्वात होत्या. आंदोलनाची पुढील रूपरेखा ठरविण्यासाठी हे सगळे एकत्र (काँग्रेस) येत असत. तेव्हा त्यांच्यामध्ये अनेक विषयांवर मतमतांतरे जोरकसपणे अस्तित्वात होती, हे लक्षात घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे ‘काँग्रेस म्हणजेच स्वातंत्र्य आंदोलन’ हा एक गैरसमज ठरतो. पुढे हा गैरसमज राज्यकर्त्यांनी अधिक दृढ केला. परंतु, अंतिम उद्दिष्ट एक असले तरी अनेक विषयांवर एकमेकांच्या विरोधात हे नेते व पक्ष सातत्याने भूमिका घेत असत, हे सत्य नाकारता येत नाही.


राष्ट्रहित अन् मतभेद

काँग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांच्या काळात हे मतभेद नियंत्रित राहिले. पण, गांधीयुगात ते तसे राहिले नाही. याला कारण म्हणजे, गांधीजींचा दुराग्रही स्वभाव. गांधीजींच्या मताचा विरोध करणार्‍या लोकांना, संघटनांना ते अपमानास्पद वागणूक देणे, अनुल्लेखाने मारणे, दुर्लक्ष करणे अशा पद्धतींचा वापर करीत दूर करीत असत. शिष्ट नेत्याचा स्वभाव अनेकदा राष्ट्रहिताच्या आड येतो, हे इतिहासाने सिद्ध केलेले आहेच. त्याचवेळी विरोधकांचा राष्ट्रहितासाठी निश्चितच उपयोग होऊ शकतो, हे पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होते.

१ ) रशियात लेनिनने ट्रोटस्कीशी पक्षीय मतभेद असतानाही जुळवून घेत राष्ट्रहितासाठी वापर करून घेतला.
२ ) लखनौ कराराला अगदी सभामंडपात व बाहेरही कडाडून विरोध करणार्‍या डॉ. मुंजे यांना लोकमान्य टिळकांनी दूर न लोटता कायम आदराने आपलेपणानेच वागविले.
३ ) अलीकडच्या काळात पंतप्रधान नरसिंहराव यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा राष्ट्रहितासाठी जबाबदारी देऊन आपलेपणाने वापर केला. पण, गांधीजींच्या मताचा विरोध करणार्‍या पंडित मदनमोहन मालवीय, सुभाषचंद्र बोस, डॉ. मुंजे, डॉ. ना. भा. खरे अशा अनेक नेत्यांना फक्त हिंदूहिताचा विचार करतात म्हणून गांधीजींनी दूर केले, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. हे सर्व हिंदूहिताचा विचार करणारे नेते काँग्रेसमधून खड्यासारखे वगळले गेल्यानंतरदेखील राजकीय जीवनात कार्यरत होतेच. आता हिंदू संघटन म्हणून ते काँग्रेसच्या मुस्लीम अनुनयाचा खुलेपणाने विरोध करत होते.


हिंदूहित म्हणजेच राष्ट्रहित


हिंदूहित म्हणजेच व्यापक अर्थाने राष्ट्रहित या दृष्टिकोनातून ते विविध चळवळी हातात घेतच होते.लोकमान्य टिळकांच्या काळात सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणार्‍या कार्यकर्त्यांची काँग्रेस पाठराखण करीत होती. तीच काँग्रेस गांधीजींच्या काळात क्रांतिकारकांना ’वाट चूकलेले देशभक्त’ म्हणून त्यांची हेटाळणी करीत होती. १९३०नंतर स्वातंत्र्य अगदी दाराशी आलेले आहे, हे राष्ट्रीय नेत्यांना चांगलेच जाणवत होते. गोलमेज परिषदेने त्यावर शिक्कामोर्तब केले. १९३५मध्ये ’Freedom of India Act'ने जवळजवळ सगळी संरचनादेखील स्पष्ट झाली होती. खरं तर दुसर्‍या महायुद्धाने ते म्हणजे स्वातंत्र्य थोडे दूर गेले, असेच म्हणावे लागते.हिंदू महासभेच्या दृष्ट्या नेतृत्वाला देखील याची निश्चित जाणीव झाली होती. या अनायासे मिळालेल्या काळात देशाच्या संरक्षण व कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोण आणि कशी घेणार, याकडे काँग्रेस लक्ष देण्यास तयार नव्हती. (सैन्य आणि पोलीस या दोन्हीही सरकारी यंत्रणांमध्ये मुसलमानांची संख्या लक्षणीयरितीने वाढताना दिसत होती आणि हा असमतोल मुसलमानांच्या बाजूने होता.) गांधींजी आपल्याच अहिंसा आणि मुस्लीम अनुनयाच्या तत्त्वात चुर होते. काँग्रेसचे इतर नेते आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचा अनुनय करण्यात मग्न झाले होते. अशा वेळी महायुद्धाच्या भडक्याचा फायदा घेऊन हिंदूंनी युद्धकला शिकणं देशाच्या फायद्याचे ठरले असते.

(पुढे देशाच्या फाळणीच्या वेळी सावरकर, मुंजे यांची ही भूमिका बरोबर होती, हे सिद्धही झाले आणि ही भूमिकाच फायद्याची ठरली.


यासाठीच सैनिकी शाळेची निर्मिती
 
हिंदू महासभा व हिंदू संघटनवादी, हिंदू तरूणांनी सैन्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करत होते, प्रयत्न करत होते. यासाठीच डॉ. मुंजेंनी १९३४-३५ मध्ये नाशिकमध्ये भारतातील पहिली सैनिकी शाळा सुरु केली. डॉ. मुंजेंनी आपलं उर्वरित आयुष्य फक्त सैनिकी शिक्षणासाठी वेचलं. या काळातच सावरकरांनी भारतीयांचे सैनिकीकरण करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. हिंदू संघटनवादी देशापुढील स्वातंत्र्योत्तर काळात देशासमोर उभ्या राहणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयारी करू लागले. दरम्यान, क्रीप्स योजना, वेगवेगळ्या कारणांसाठी, मुस्लीम लीग, काँग्रेस आणि हिंदू महासभा अशा सगळ्यांनीच नाकारली. सविनय कायदेभंगाने काहीही घडत नाही, उलट ती चळवळ अयशस्वी होते आहे, हे गांधीजींच्या व अर्थातच काँग्रेसच्या लक्षात आले होते. तेव्हा कोणतीही योग्य तयारी न करता, गांधीजींनी व त्यांच्या मागून फरफटत जाणार्‍या काँग्रेसने ‘चले जाव’ हा नारा देत १९४२ची चळवळ सुरू केली. ब्रिटिशांनी या देशातून निघून जावे, पण त्यांचे सैन्य मात्र इथे राहील, अशा अव्यवहार्य पायावर गांधीजी ही चळवळ रेटू पाहात होते. तेज बहादुर सप्रुंसारख्या माणसांनी देखील ४० कोटी लोकांना वार्‍यावर सोडता येणार नाही, अशी चेतावणी दिली होती. पण, गांधीजींच्या हे कुठे गावीही नव्हते. आधी कधीही काँग्रेसने इतर कुणाच्याही चळवळीला पाठिंबा दिलेला नसताना देखील हिंदू महासभा तीन अटींवर पाठिंबा देण्यास तयार होती.

पाठिंब्याच्या अटी

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घातलेल्या या अटी म्हणजे -
१ . भारताच्या एकता व अविभाज्यता यांच्याशी निरपवादपणे काँग्रेसने एकनिष्ठ राहण्याची हमी द्यावी.
२ . मुस्लीम लीगशी कोणतीही तडजोड वा करार करू नये.
३. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य करावी. परंतु, या अटींवर विचार करण्याची देखील गांधीजींनी तयारी दर्शवली नाही, हे नमूद करावेसे वाटते.
गांधीजी आणि काँग्रेस यांच्या आपल्या तत्त्वावर आणि धोरणांवर ठाम राहण्याच्या अधिकाराइतकाच अधिकार स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. मुंजे, हिंदू महासभा, हिंदू संघटनवादी या सगळ्यांना तेव्हाही होता आणि आजही आहे, हे मान्य करायलाच हवे. काँग्रेसने देखील स्वातंत्र्य आंदोलनात संयुक्त आघाडी करण्याची तयारी वा वृत्ती कधीही कोठेही दाखवली नाही (मुस्लीम लीग हा एकमेव अपवाद) हे ही येथे नमूद करावेच लागते. भागानगर, भागलपूर (१९३८-३९) च्या हिंदू संघटनवाद्यांनी चालवलेल्या लढ्यात गांधीजी व काँग्रेसने सहभाग वा पाठिंबा नोंदवला नव्हता. हिंदू संघटनवाद्यांनी चालवलेल्या कोणत्याही लढ्यात काँग्रेसने कधीही सहभाग नोंदविला नाही, हे ही सत्यच आहे. स्वातंत्र्य नजरेला दिसत असताना, त्याला टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना अकारण, पुरेशी तयारी न करता १९४२ ची चळवळ सुरू केली गेली आणि धारातिर्थी पडली. हिंदू संघटनवादी सशर्त सहभागी होण्यास तयार होते, पण गांधीजी आणि काँग्रेसलाच हा सहभाग नको होता, असे म्हणावे लागते. वास्तविक पाहता, एका हाताने १९३७-३८नंतर भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे अनेक नेत्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीची काँग्रेसी चळवळ होती, तर दुसर्‍या हाताने देश आणि हिंदू समाजाला केंद्रस्थानी ठेवून येणार्‍या स्वातंत्र्यासाठी अधिक रचनात्मक पायाभरणी करण्याची हिंदू संघटनवादी चळवळ होती, असेच म्हणावे लागते.

- विवेक राजे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.