काळ आला, पण ‘वेळ’ आली नाही!

29 Aug 2020 14:41:27

Nashik_1  H x W



३८ मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत; अमरधाममधील गॅस शवदाहिनी बंद!


नाशिक : शेवटच्या प्रवासात सुद्धा मृतदेहाच्या आत्म्यास चिरशांती मिळण्यासाठी दोन दोन दिवस वाट पाहावी लागत असल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसून येत आहे. ही विदारक घटना आहे नाशिकच्या अमरधाम मधील. नाशिक महानगरपालिकेच्या अमरधाम मधील गॅस शवदाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. आधी डिझेलवर असलेली ही शव वहिनी कोरोनाच्या काळात गॅस वर करण्यात आली होती.


सध्या नाशिकच्या अमरधाम मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व मृतदेहांवर इथे अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने सदर गॅसवरील शवदाहिनी स्लाईडर पट्टा तुटल्याने दोन दिवसांपासून बंद पडली आहे. या व्यतिरिक्त असलेल्या विद्युत दाहिनीवर प्रचंड ताण आला आहे. परिणामी कोरोनामुळे मृत पावलेल्या मृतदेहांच्या अंतिम प्रवासातही यातना भोगण्याची वेळ येत आहे. सद्य:स्थितीत ३८ मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असून त्यांच्या नातेवाईकांना दोन दिवस प्रतिक्षाच करावी लागत आहे.


गॅस शव वाहिनीवर अंत्यसंस्कारासाठी एका मृतदेहाला दोन ते अडीच तास, तर विद्युतदाहिनीवर दीड तासाचा अवधी लागतो. त्यामुळे मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना अमरधाममध्ये ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या नातेवाईकांचा रोष अमरधाम मधील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. या प्रकाराबाबत नगरसेवक शाहू खैरे यांनी याबाबत प्रशासनाला निदर्शनास आणून दिली आहे.


दरम्यान या सर्व प्रकरणाबाबत महापौर सतीश कुलकर्णी यांना विचारणा केली असता बंद असलेली गॅस शववाहिनी त्वरित सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.
Powered By Sangraha 9.0