जपानचे पंतप्रधान शिंजो अबे राजीनामा देण्याच्या तयारीत

28 Aug 2020 12:54:45

japan pm_1  H x



टोकियो:
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा देणार आहेत. शिंजो अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळेच अबे पंतप्रधान पदावरून पायउतार होणार आहेत. त्यांच्याकडून लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, शिंजो आबे औपचारिकरित्या यासंदर्भात घोषणा करू शकतात. दरम्यान, जपानचे पंतप्रधान असणाऱ्या शिंजो अबे यांना गेल्या आठवड्यात दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



जपानमधील एनएचके टेलिव्हिजन आणि इतर मीडिया रिपोर्टनुसार, जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी आपल्या आरोग्याच्या अस्वास्थामुळे पंतप्रधान पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.अबे यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात बोलताना सांगितले की, 'अद्याप या रिपोर्टवर कोणतेच अधिकृत मत व्यक्त केले जाऊ शकत नाही. परंतु, असे मानले जाते आहे की, आबे पार्टी मुख्यालयातील उच्च अधिकाऱ्यांना भेटत होते. दरम्यान, शिंजो आबे यांनी २००७ मध्येही आपल्या आजारपणामुळे आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता.



अबे ८ वर्षांपासून पंतप्रधानपदी आहेत. सर्वाधिक काळ जपानचं नेतृत्त्व करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नीट हाताळता न आल्याने जपानमध्ये अबे यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यांच्या पक्षावर घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत. ६५ वर्षांच्या अबे यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचे आश्वासन दिले होते. चीनपासून असलेला धोका लक्षात घेता अबे यांच्याकडून सैन्याला सुसज्ज ठेवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0