बिहारमध्ये ‘महागठबंधन’ आणि लालू परिवार संकटात?

    दिनांक  28-Aug-2020 22:00:43   
|
Bihar_1  H x W:


तेजस्वी यांचा अहमन्य स्वभाव आणि त्यांचे बंधू तेजप्रताप यादव यांचा बालिशपणा यामुळे आता राजदला घरघर लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तेजप्रताप यांच्या आचरटपणामुळे यादव कुटुंबातही कलह निर्माण झाला आहे. त्यामुळे महागठबंधन सांभाळायचे, आपला पक्ष सांभाळायचा की कुटुंब सांभाळायचे, अशी तीन आव्हाने सध्या तेजप्रताप यादव यांच्यासमोर आहेत.कोरोना काळात निवडणुका कशा घ्यायच्या, याविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे बिहार विधानसभेची निवडणूक नियोजित वेळी म्हणजे वर्षअखेरीस होणार, याविषयी आता शंका राहिलेली नाही. उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष जाऊन दाखल करणे, प्रचारफेर्‍या काढणे, घरोघरी जाऊन प्रचार करणे यावर आता मोठ्या प्रमाणावर बंधने आली आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना आता ऑनलाईन प्रचारावर भर द्यावा लागणार आहे. त्याची सुरूवात भारतीय जनता पक्षाने कधीच केली आहे आणि आता नितीश कुमारांच्या जनता दलानेही (युनायटेड) त्याला प्रारंभ केला आहे. अर्थात, अशाप्रकरे ऑनलाईन प्रचार हा सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक असेल यात शंका नाही. एकीकडे ऑनलाईन प्रचाराचे आव्हान असताना दुसरीकडे आघाड्यांमधील कुरबुरींचेही आव्हान सर्व पक्षांना असणार आहे. तूर्तास त्याबाबतीत जदयु-भाजपप्रणित युती नशिबवान ठरली आहे. मात्र, राजद-काँग्रेसप्रणित महागठबंधनला फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे नितीश कुमारांचा सामना महागठबंधन कसा करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


महागठबंधनला पहिले ग्रहण लावले आहे ते हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी. नितीश कुमारांनी साथ सोडल्यानंतर महागठबंधनमध्ये राजद आणि काँग्रेस हे मोठे पक्ष, तर जितनराम मांझी आणि उपेंद्रसिंह कुशवाह यांचे लहान पक्ष उरले होते. त्यात मांझी आणि कुशवाह हे कधीकाळी एनडीएमध्ये होते. मांझी यांनी महागठबंधन सोडताना राजदच्या तेजस्वी यादव यांच्यावर आगपाखड केली. तेजस्वी यादव यांचा स्वभाव अतिशय हट्टी आहे. अतिशय मनमानी पद्धतीने वागणारे तेजस्वी कोणाचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत काम करणे शक्य नाही. त्यामुळे महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचप्रमाणे महागठबंधनमध्ये निवडणुकीसाठी समन्वय समिती स्थापन करावी, ही मागणी आम्ही अनेक दिवसांपासून करीच आहोत. मात्र, काँग्रेस आणि राजदने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी आता महागठबंधनमध्ये राहण्यास काही अर्थ उरत नाही, असे कारण मांझी यांनी दिले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणते, मांझी यांची नाराजी काही आजची नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ते नाराज होते, तरीदेखील राजद आणि काँग्रेसला त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज भासली नाही. तेजस्वी यांचा स्वभाव पाहता ते अपेक्षितच होते. मात्र, काँग्रेसने तरी मांझी यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला हवे होते. कारण, समन्वय समिती स्थापन व्हावी, ही काही अवास्तव वगैरे मागणी नव्हती. पण, काँग्रेसमध्ये केंद्रीय नेतृत्वाला जशी मरगळ आली आहे, तशीच मरगळ राज्यांमधील काँग्रेसलाही आली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही, असा विचार मांझी यांनी केला असल्यास त्यात काही वावगे नाही.

आता मांझी पुन्हा एकदा एनडीएच्या गोटात जाण्याची तयारी करीत आहे. मांझी एनडीएमध्ये आल्यास दलित समुदायातील मतदारांचा एकमुखी पाठिंबा नितीश कुमारांना मिळू शकतो. कारण, रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाकडे त्यांची एकगठ्ठा मते आहेत, त्यात मांझी यांच्यामुळे महादलित समुदायही एनडीएकडे आकर्षित होऊ शकतो. अर्थात, गुरूवारीच नितीश कुमारांची भेट घेतली असली तरी अद्याप मांझी यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, एनडीएमध्ये जाण्याशिवाय अन्य पर्याय त्यांच्याकडे नाही. कारण, सध्या तरी नितीश कुमारांचे पारडे बिहारमध्ये जड आहे. त्यामुळेच एरवी प्रादेशिक पक्षांना लहान भाऊ म्हणून वागविण्याचे धोरण असलेल्या भाजपनेही नितीश कुमारांचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यामुळे दलित समुदायातील मतदार गमाविण्याचा धोका महागठबंधनने स्वत:हूनच पत्करला आहे.


महागठबंधनमधला एक प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रादेशिक नेतेही तेजस्वी यादव यांच्या विचित्र स्वभावाला कंटाळले आहे. तेजस्वी यांच्यासोबत काम करण्यापेक्षा स्वतंत्र लढलेले काय वाईट, असा स्पष्ट संदेश त्यांनी हायकमांडपर्यंत पोहोचविला आहे. मात्र, स्वतंत्र लढण्याचा धोका पत्करण्याच्या स्थितीत हायकमांड नाही. कारण, सत्ता नाही तरी बिहारमध्ये बरे म्हणावे असे यश मिळविण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहे. तसे झाले तर राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाध्यक्षपदाचा अभिषेक करता येणार आहे. त्यामुळे स्वतंत्र लढून राहुल गांधी यांना अपशकून करण्याच्या मनस्थितीत काँग्रेस पक्ष नाही. त्यामुळे काहीही झाले तरी तेजस्वी यांच्यासोबत जुळवून घेण्याचेच धोरण काँग्रेसला घ्यावे लागणार आहे. दुसरीकडे अल्पसंख्य मुस्लीम समाजाला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील एकेकाळचे शक्तिशाली नेते समजल्या जाणार्‍या शकील अहमद यांचे निलंबन रद्द केले आहे. यापूर्वीच तारिक अन्वर यांनीदेखील पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शकिल अहमद आणि तारिक अन्वर यांच्याद्वारे बिहारमध्ये पाय पसरण्यास तयार असलेल्या एआयएमआयएम आणि ओवेसी यांना आव्हान देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अर्थात, याचा फार उपयोग होईल असे वाटत नाही. कारण, सध्या तरी काँग्रेसचे संघटन राज्यात मजबूत नाही. त्यात मुस्लीम मतांचा मोठा वाटा काँग्रेसकडे जात असले तर तेजस्वी यादव शांत बसणार नाहीत.


महागठबंधनला संकटात टाकण्यात तेजस्वी यादव हेच कारणीभूत असल्याचे अन्य सहकारी पक्षांच्या नाराजीतून पुढे येत आहे. नितीश कुमारांना सोबत घेत मोठा गाजावाजा करून स्थापन झालेल्या महागठबंधनमध्ये जास्त जागा जिंकूनही लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांना दिले होते आणि तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रिपदासह अन्य महत्त्वाची खाती मिळविली होती. त्यामागे आपल्या मुलांची राजकीय ‘सोय लावण्याचा’ लालू यांचा हेतू होता. मात्र, नितीश कुमार वेळीच महागठबंधनमधून बाहेर पडले, दरम्यानच्या काळात लालू यादव तुरुंगात गेले आणि पक्षाची सूत्रे तेजस्वी यांच्याकडे आली. तेजस्वी यांचा अहमन्य स्वभाव आणि त्यांचे बंधू तेजप्रताप यादव यांचा बालिशपणा यामुळे आता राजदला घरघर लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तेजप्रताप यांच्या आचरटपणामुळे यादव कुटुंबातही कलह निर्माण झाला आहे. त्यात तेजप्रताप यांची पत्नी ऐश्वर्या राय या तेजप्रताप यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महागठबंधन सांभाळायचे, आपला पक्ष सांभाळायचा की कुटुंब सांभाळायचे, अशी तीन आव्हाने सध्या तेजस्वी यादव यांच्यासमोर आहेत. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणूक महागठबंधनसह यादव कुटुंबांच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.