आता घर घेणे होणार आणखी स्वस्त!

27 Aug 2020 10:49:49
Stamp duty_1  H

सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांची कपात!

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. गृहनिर्माण आणि रिअॅल्टी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. हे लक्षात घेता मंत्रिमंडळाने सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.


आता अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर १ सप्टेंबर २०२० पासून ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीकरिता ३ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्यानंतर १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीकरिता मुद्रांक शुल्क २ टक्क्यांनी घटवण्यात आले आहे. सध्या राज्याच्या विविध भागांत स्थानिक कर वगळता घर खरेदीच्या प्रक्रियेत आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क ५ टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांना ३%ची भरघोस सूट मिळाल्याने घर खरेदीत वाढ होण्याची आशा आहे.


यामुळे मंदावलेल्या रिअल इस्टेट मार्केटला चालना मिळण्याची शक्यता आहे. घर खरेदी करू इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांनाही हा मोठा दिलासा आहे. दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता देण्यासह इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.


सार्वजनिक आणि मालवाहतूक वाहनांना वाहन कर माफी देण्यात आली आहे. १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत वाहन कर भरण्यापासून १००% करमाफी म्हणजे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक कराच्या ५०% करमाफी मिळेल. ही करमाफी मालवाहतूक वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम वाहने, खासगी वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वाहनांना लागू राहील.



Powered By Sangraha 9.0