'जैश'ला मदत करणाऱ्या २३ वर्षीय इंशा जानविरोधात आरोपपत्र

27 Aug 2020 14:06:08
Insha Jan _1  H
 
 
 
 
नवी दिल्ली : गतवर्षी पुलवामा दहशतवादी हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेला इंशा जान हिने मदत केल्याचा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे. दाखल केलेल्या आरोपपत्रात ही गंभीर बाब नमूद करण्यात आली आहे. २३ वर्षांची तरुणी इंशा जान ही पाकिस्तानी बॉम्ब तयार करणारा आणि हल्ल्याचा कट रचणारा प्रमुख दहशतवादी मोहम्मद उमर फारूख याची सहकारी होती. ती फोनद्वारे, तसेच इतर सोशल मीडियाद्वारे उमर फारूखच्या संपर्कात होती, अशी माहिती यात देण्यात आली आहे.
 
 
 
सोशल मीडियाद्वारे इंशाने केलेल्या चर्चेचा तपशील एनआयएने मिळवला. यातून ते एकमेकांच्या अतिशय जवळ असल्याचे स्पष्ट होत आहे. ही बाब एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. इंशा जानचे वडील तारीक पीर यालाही या प्रकरणाची सर्व माहिती होती. तारीक पीर याने कथित स्वरुपात पुलवामा आणि आसपासच्या परिसरात मोहम्मद उमर फारूख आणि त्याच्या दोन साथीदारांच्या हालचालींसाठी मदत केली.
 
 
 
इंशा जान ही नेहमीच भारतीय सुरक्षादलांच्या हालचालींबाबतची सर्व माहिती उमर फारूखला देत होती. उमर फारूख हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याचा भाचा होता, अशी माहिती एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. मसूद अजहरचे नाव देखील पुलवामा हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार म्हणून आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. उमर फारूखने दक्षिण काश्मीरला जात छोट्या-मोठ्या दहशतवादी घटनांमध्ये भाग घेण्यास सुरू केले होते. त्यानेच दहशतवाद्यांना सक्रिय केले होते.
 
 
 
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी इंशाच्या घरी एकदा दोन ते चार दिवसांसाठी सन २०१८ आणि सन २०१९ या दरम्यान राहिले होते, असा खुलासा एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. एनआयएच्या माहितीनुसार, पिता तारीक पीर आणि कन्या इंशा जान, दोघांनीही मोहम्मद उमर फारूख, समीर डार आणि आदिल अहमद डार यांना १५ हून अधिक वेळा जेवण, आसरा आणि इतर सुविधा दिल्या होत्या.
 
 
 
एनआयएने एकूण १९ लोकांना आरोपी बनवले आहे. या आरोपींपैकी ७ दहशतवादी हे एनआयएच्या कोठडीत आहेत, तर ७ मारले गेले आहेत. तर एकूण ५ दहशतवादी फरार आहेत. या दहशतवाद्यांपैकी ३ दहशतवादी पाकिस्तानात आहेत, तर दोघे भारतातच असल्याचे सांगितले जात आहेत. इंशा जान आणि शकीर बशीर यांच्या घरात बॉम्ब तयार करण्याचे काम होत होते, असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.






Powered By Sangraha 9.0