रामायण, महाभारत व वेदातील सरस्वती नदी

    दिनांक  27-Aug-2020 20:44:03
|

ved_1  H x W: 0


निलेश नीलकंठ ओक यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पी.एचडी पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी रामायण व महाभारतात दिलेली ग्रहस्थितीवर आधारित रामायण व महाभारत कालाचे निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘When did the Mahabharata War Happen?’ आणि ‘The Historic Rama - Indian Civilization at the end of Pleistocene’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आज त्यांच्या लेखाचा अनुवाद.जगात अनेक ठिकाणी असे दिसून येते की कैक नद्यांचे पात्र कालौघात बदलले. कित्येक नद्या ज्या पूर्वी खूप मोठ्या होत्या, त्यांच्या ठिकाणी आता लहानसा झरासुद्धा राहिला नाही. भूशास्त्रज्ञ अशा प्राचीन नद्यांच्या वाळलेल्या पात्रांतील मातीचा अभ्यास करून जुन्या नदीची किंवा नदीच्या जुन्या प्रवाहाची माहिती शोधू शकतात. भारतात अशी लुप्त झालेली नदी म्हणजे सरस्वती. लोकस्मृतीमध्ये तिचे जमिनीत गुप्त होणे लक्षात आहेच. पण, त्याहून विशेष असे आहे की साहित्यातून सरस्वतीच्या त्या त्या काळातील प्रवाहाची माहिती देखील मिळते. जगातील हे एकमेव उदाहरण असेल जिथे नदीच्या भूशास्त्रीय अभ्यासाला प्राचीन काळातील साक्ष मिळाली आहे.

भूशास्त्रीय अभ्यासातील सरस्वती

विविध भूशास्त्रीय अभ्यासातून जसे की - Mary Courty १९८६ , Frankfort १९९२ , Khonde २००७, Bhadra २००९ , Clift २०१२ , Sarkar २०१६ , Singh २०१७ , Dave २०१८ आणि इतर अनेकांनी सरस्वती नदीबद्दल सातत्याने एकच सांगितले आहे -

पहिला टप्पा -
सरस्वती नदी हिमालयात उंच पर्वतांमध्ये उगम पावून, दक्षिणेकडे वाहत सिंध सागराला मिळत होती. या काळात यमुना व सतलज नदी सरस्वती नदीला मिळत होत्या. या दोन मोठ्या उपनद्यांमुळे सरस्वती ही एक ‘महा’नदी होती.
 
दुसरा टप्पा - कालांतराने दोन्ही उपनद्यांची दिशा बदलली. सरस्वतीला मिळणारे उपनद्यांचे पाणी कमी झाले. सरस्वतीला उंच पर्वतातील मिळणारे पाणीसुद्धा कमी होत गेले. पण, त्याचवेळी पावसाचे प्रमाण वाढल्याने ते पाणी सरस्वतीला मिळू लागले व सरस्वती वाहती नदी राहिली. पण, सरस्वती आता ‘महान नदी’ न राहता, ‘लहान नदी’ झाली होती.

तिसरा टप्पा -
त्या नंतरच्या काळात जसे पावसाचे प्रमाण कमी होत गेले, तसे यथावकाश नदी पूर्ण कोरडी पडली.

ऋग्वेदातील सरस्वती

श्रीकांत तळेगिरी यांनी ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील भाषेचा अभ्यास करून त्यांच्या रचनेची क्रमवारी सांगितली आहे. त्यांच्यानुसार - मंडल सहा, तीन व सात ही सर्वात प्राचीन आहेत. त्यानंतर मंडल चार व दोन रचले गेले. त्यानंतर मंडल पाच, आठ व नऊची रचना करण्यात आली आणि सगळ्यात शेवटी दहावे मंडल रचले गेले. पहिल्या मंडलात मात्र सुरुवातीपासून शेवटच्या काळापर्यंत सूक्तांची रचना करणे चालू होते. ऋग्वेदातील सर्वात प्राचीन मंडलातील सूक्त सरस्वती नदीचे भरभरून वर्णन करतात. जसे - अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति ॥ २ .४१ .१६॥


सर्वोत्तम माता, सर्वोत्तम नदी, सर्वोत्तम देवी सरस्वती! अशी तिची स्तुती आहे. वेदातील सरस्वती नदी ही वाणी, वाचा, शब्द, भाषा, संगीत, गायन, काव्य, वेद ... एकूणच जे श्रोत्याकडून वक्त्याकडे वाहते अशा विद्येची देवता आहे. तसेच ही नदी हिमालयापासून सिंधुसागरापर्यंत वाहते असे वर्णन येते. खासच ही सूक्ते पहिल्या टप्प्यात लिहिली असणार. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नदी सूक्तात (१०.७५) गंगा, यमुना, सरस्वती आदि नद्यांची नावे येतात. पण, इथे सरस्वतीचा केवळ नाम्मोलेख येतो. स्तुती येत नाही. उलट सरस्वतीपेक्षा अधिक महत्त्व सिंधू नदीला दिलेले दिसते. त्यावरून हे सूक्त नंतरच्या टप्प्यात लिहिले गेले असणार असे कळते. ऋग्वेदातच सरस्वती नदीच्या प्रवासाची झलक दिसते. ऋग्वेदाच्या सुरुवातीला असलेली ‘महा’नदी ऋग्वेदाच्या शेवटच्या काळात एक लहानशी नदी झाली आहे.


रामायणातील सरस्वती


रामायणात दशरथाच्या मृत्यूच्या वेळी भरत व शत्रुघ्न आजोळी होते. त्यांना अयोध्येतून आलेल्या दुतांकडून निरोप मिळताच ते आजोळहून म्हणजे केकय इथून अयोध्येला परत निघाले. हा परतीचा प्रवास भरताने एकसारखा आठ दिवस केला. वाल्मिकी रामायण सांगते की, या प्रवासात त्याने सतलज, सरस्वती, यमुना, गंगा व गोमती नदी ओलांडली. या वर्णनातून सरस्वती नदीचे ठिकाण कळते (यमुना व सतलजच्या मध्ये). तसेच सतलज नदी पश्चिमेला वाहत होती हेदेखील कळते.


महाभारतातील सरस्वती

रामायणाच्या नंतर घडलेल्या महाभारतात, सरस्वतीचे त्या नंतरचे रूप कळते. महाभारतात १०० हून अधिक ठिकाणी सरस्वतीचे उल्लेख व माहिती आली आहे. तिच्या प्रवाहात अनेक ठिकाणी तळ्यांची निर्मिती झाली होती. काही ठिकाणी नदीला पुष्कळ पाणी होते, तर काही ठिकाणी ती वाळूच्या खाली अदृश्य झाली होती. विनाशन या ठिकाणी सरस्वती लुप्त झाली होती असा उल्लेख येतो. तसेच कुरुक्षेत्र हे सरस्वती व दृषद्वती या नद्यांच्या मध्ये होते, हेदेखील सांगितले आहे. सरस्वतीच्या काठाने अनेक तीर्थक्षेत्र असून महाभारताच्या वेळीसुद्धा या तीर्थक्षेत्रांशी अनेक पौराणिक कथा जडल्या होत्या. मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सरस्वतीच्या काठावर घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती देतात. लोमश ऋषी असे सांगतात की, तिच्या प्रवाहात सरस्वती नदी अनेक ठिकाणी लुप्त होते व अनेक ठिकाणी प्रगट होते. महाभारतीय युद्धाच्या दरम्यान बलराम तीर्थयात्रेला गेला होता. त्याने सरस्वती नदीच्या काठाने हा प्रवास केला. तो सांगतो - उदापना या ठिकाणी सरस्वती लुप्त झाली होती, मात्र मातीतील ओलाव्याने सरस्वतीचे तेथील अस्तित्व कळत होते, तर आणखी एका ठिकाणी सरस्वतीचे पाण्याने भरलेले मोठे पात्र पाहून आश्चर्यचकित झाल्याचे नमूद केले आहे. सहजच कळते की, महाभारताच्या आधी सरस्वती एक महान नदी होती. तिच्याभोवती अनेक पौराणिक कथा गुंफल्या गेल्या होत्या. महाभारत काळात ती काही ठिकाणी लुप्त झाली असली तरी इतर ठिकाणी वाहती नदी होती.


निष्कर्ष

भूशास्त्रीय अभ्यासनुसार - फार पूर्वी यमुना व सतलज नदी सरस्वती नदीला मिळत होत्या. इ.स. पूर्व 47 हजार (आजपासून साधारण 50 हजार वर्षांपूर्वी) यमुना नदीचा प्रवाह पूर्वेला सरकू लागला. कालांतराने यमुना गंगेला मिळाली. तसेच 15 हजार वर्षांपूर्वी सतलज नदीसुद्धा पश्चिमेला वळून सिंधू नदीला मिळाली. सरस्वतीच्या या दोन उपनद्या तिला सोडून गेल्यावर सरस्वती ‘महा’नदी नाही राहिली. ऋग्वेदात प्राचीन ‘महा’सरस्वती चे वर्णन आले आहे. रामायणात सतलज पश्चिमेला वळली आहे. यमुना गंगेला मिळाली आहे आणि महाभारतात ‘सरस्वती’ ठिकठिकाणी लुप्त झाली आहे. भूशास्त्रीय अभ्यास व साहित्यिक टिप्पणी एकत्र करून ऋग्वेद, रामायण व महाभारताच्या काळाचा अंदाज बांधता येतो.
७० हजार वर्षांपूर्वी - महा सरस्वती
५० हजार वर्षांपूर्वी - यमुना गंगेकडे वळते
२४ हजार वर्षांपूर्वी - सरस्वती ‘लहान’ नदी होते
१५ हजार वर्षांपूर्वी - सतलज सिंधुकडे वळते
४ हजार वर्षांपूर्वी - सरस्वती लुप्त होते
मी रामायण व महाभारतातील खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरून काळ काढला आहे. हा काळ नदीच्या भूशास्त्रीय निष्कर्षांशी मिळता जुळता आहे -
२४ हजार वर्षांपूर्वी - च्या आधी ऋग्वेदाच्या रचनेला सुरुवात.
१४ हजार वर्षांपूर्वी - रामायण
७.५ हजार वर्षांपूर्वी - महाभारत
आपण खरोखर भाग्यशाली आहोत की, भारतीय संस्कृतीची खोलवर पोहोचलेली मुळे आपण प्राचीन साहित्यातून शोधू शकतो. प्राचीन भारतीय साहित्यातून मिळणारी माहिती केवळ नदीच्या प्रवाहाशी संबंधित नाही, तर इतरही अनेक अंगांची माहिती देते. जसे - जलविज्ञान, खगोलशास्त्र, कृषिविद्या, अनुवंशशास्त्र, भाषाशास्त्र, औषधशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान आदी विस्तार आहे.


- निलेश नीलकंठ ओक
(अनुवाद : दीपाली पाटवदकर)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.