'त्या' कोकण कन्येची घेतली पंतप्रधान कार्यालयाने दखल !

26 Aug 2020 16:33:27
PM Modi _1  H x
 
 
 
  
 
नवी दिल्ली : मोबाईलमध्ये नेटवर्क येत नसल्याने आपल्या घरापासून दूर झोपडीत तयार करून ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या कोकणातील स्वप्नाली सुतार या मुलीची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाने थेट मदत करत स्वप्नालीला यापुढे मोबाईल इंटरनेटवर अवलंबून राहण्यासाठी झोपडीत जावे लागणार नाही, अशी चोख व्यवस्था केली आहे. स्वप्नालीच्या घरापर्यंत थेट इंटरनेट केबल पोहोचवण्यात आली आहे. यामुळे ऑनाईन शिक्षणात भविष्यात कुठला अडथळा येणार नाही.
 
 
 
महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात दरिस्ते गावातील स्वप्नालीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्थानिक प्रसारमाध्यमांसह आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही याबद्दलच्या बातम्या झळकल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची दखल घेत त्यांच्या कार्यालयाला या संदर्भात सूचना दिल्या. घरापासून दोन किमी दूरवर जाऊन झोपडीत नेटवर्क शोधणाऱ्या स्वप्नालीला आता घरातच वायफाय कनेक्शन मिळाले आहे.
 
 
 
१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर दिलेल्या भाषणात मोदींनी प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर इंटरनेट पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. स्वप्नालीने या बद्दल स्वप्नातही विचारल केला नसेल की, तिच्या घरी थेट वायफाय कनेक्शन कधी मिळेल. पंतप्रधान कार्यालय आणि माहिती प्रसारण केंद्राने तिचे स्वप्न पूर्ण केले असून आता शिक्षणात कुठलाही अडथळा येणार नाही.
 
 
 
कोरोना विषाणूमुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये स्वप्नाली आपल्या गावातच अडकून पडली. मुंबईतील वेटनरी महाविद्यालयात शिकत असलेल्या स्वप्नालीला शहरातील घरी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी घरापासून दूर एका डोंगरावर नेटवर्क मिळेल तिथे जाऊन एक झोपडी तयार केली होती. यात तिच्या भावांनी तिला मदत केली. काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी तिचे कौतूक केले होते.
 
 
 
पंतप्रधान कार्यालयाने या घटनेची दखल घेत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी-कर्मचारी स्वप्नालीच्या गावात पोहोचले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वप्नालीच्या घरापर्यंत थेट केबल टाकून देण्यात आली आणि वायफाय कनेक्शन जोडून देण्यात आले. अभ्यास करताना घरापासून दूर डोंगरावर जाणे स्वप्नालीला धोक्याचे वाटत होते. जंगली श्वापदे आणि मुसळधार पावसाने धाकधूक वाढवली होती.
 

 
 
गळक्या छतांमुळे मोबाईल आणि वह्या पुस्तके भिजण्याचीही चिंता होती. मात्र, थेट पंतप्रधान कार्यालयाने तिची समस्या सोडवल्याने आता अखंडीतपणे ती शिक्षण घेऊ शकते. स्वप्नालीने या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही मोदी आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे आभार मानले आहेत.




Powered By Sangraha 9.0