मुंबई : धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे शुल्क दरवाढ कमी करण्याची मागणी घेऊन गेलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर आणि विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. विद्यार्थ्यांवरील झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करत असून या प्रकरणी सरकारविरोधात भाजपतर्फे आवाज उठवणार असल्याचेही ते म्हणाले.
कोरोना काळात अवाजवी परीक्षा शुल्क आकारणी सरकारने रद्द करावी या मागणीसाठी गेलेल्या अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळ दिलीच नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्याचा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली पोलीसांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. परिक्षा शुल्क रद्द करावे, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी अशी वागणूक दिल्याने राज्यभरातून या प्रकाराचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
दरेकर म्हणाले, "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर ज्या प्रकारे लाठीहल्ला केला हे निश्चित निषेधार्ह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी घेऊन आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेने विद्यार्थी गेले होते. मात्र, उलट त्यांना वेळ दिली नाहीच. आपल्या मागण्यांसाठी रास्ता रोको करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे हल्ला केला हा निषेधार्ह आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार ठाकरे सरकारने सुरू ठेवला आहे." याबद्दल सरकारला अधिवेशनात जाब विचारू, विद्यार्थ्यांच्या पाठीमागे कायम उभे राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.