गणेशोत्सव आणि सामाजिक सलोखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2020   
Total Views |
Ganpati _1  H x
 
 
देशात कुठेही घडलेल्या जातीय तणावावर, दंगलीवर वारंवार लिहिले जाते असा अनुभव आहे. लोकांना माहिती मिळण्याच्या दृष्टीने ते गरजेचे असते हे खरेच, पण अशा दुर्दैवी घटना विविध कारणाने आणि विविध माध्यमांवर वर्षानुवर्षे उगाळल्या जाताना दिसतात. दुसरीकडे स्थानिक पातळीवर विशेष प्रख्यात नसलेल्या माणसांनी परस्पर सामंजस्याच्या केलेल्या विविध लहान-मोठ्या प्रयत्नांना पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि ते प्रयत्न स्मरणाआड होतात.आज अशा प्रयत्नांना एकत्रितपणे वाचकांसमोर आणणार आहे; जेणेकरून विद्वेषाच्या काळ्या बातम्यांच्या बरोबरीने या विधायक वास्तवाची जाणीव आपणा सगळ्यांनाच होऊ शकेल.
 
 
 
 
काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या दरम्यानची गोष्ट. जाफर खान नावाचे एक रेल्वे कर्मचारी होते. अत्यंत धार्मिक मुस्लीम. दर रमजानमध्ये रोजा पाळणारे. या जाफरभाईंचा आगळेपणा असा की, ते दरवर्षी नेमाने मालाड स्टेशनात गणपती बसवत असत. अनेक वर्षे त्यांचा हा नेम चुकला नाही. यथावकाश जाफरभाई निवृत्त झाले खरे, पण उत्सवातून निवृत्ती? नावच नको. ते निवृत्तीनंतरही या उत्सवात सहभागी होत राहिले.
 
 
मुंबईमधील एक हिर्‍यांचे व्यापारी रफिक बिलाखिया यांना पैलू पाडण्यापूर्वी असणार्‍या कच्च्या हिर्‍यात गणपतीच्या आकाराचा एक हिरा मिळाला. ते म्हणतात की, हा माझ्यासाठी एक शुभशकुन आहे. माझ्याकडे विघ्नहर्ता आपणहून आला आहे. मी आता हा खडा कोणालाही विकणार नाही. त्यांनी तो हिरा तसाच पैलू न पाडता १० ग्रॅम सोन्याच्या पेंडंटमध्ये स्वत:साठी बसवला आहे.
 
 
काही वर्षांपूर्वी पुण्यात खडकी येथे मोहरमची आरास आणि गणपतीची मूर्ती एकाच मांडवात विराजमान झाली होती. मधला बाजार मित्रमंडळ व पैलवान ताजिया अशी दोन मंडळे आजवर आपापले उत्सव स्वतंत्रपणे करत होती. पण, दोन वर्षांपूर्वी मोहरम व गणपती उत्सव एकत्र आल्यामुळे दोनही मंडळांनी हे उत्सव एकत्र साजरे करण्याचे ठरवले. दोनही उत्सवात दोनही धर्माची मंडळी उत्साहाने सहभागी झाली. अर्थात, पुणे शहराला ही गोष्ट नवीन नाही.
 
पुण्याच्या मानाच्या गणपतींपैकी गुरुजी तालीम या मंडळाच्या गणपती उत्सवाची स्थापना १३१ वर्षांपूर्वी झाली आणि संस्थापकांमध्ये भिकूजी शिंदे, नानासाहेब खासगीवाले यांच्या बरोबरीने शेख लालाभाई व रुस्तुमभाई नालबंद हेही होते. कोल्हापूरमध्ये बाबूजमाल दर्ग्यामध्ये १९५६ पासून गणपती उत्सव साजरा होत आहे. त्या वर्षीही मोहरम व गणपती उत्सव एकत्र आले होते. तेव्हापासून दरवर्षी गणेशोत्सव दर्ग्यात साजरा होत आहे.
 
 
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कुरुंदवाड शहरात तर पाच मशिदीमध्ये गणपतीची मूर्ती स्थापन करून गणेशोत्सव साजरा होत आहे. मुंबई जवळील रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे 1961 मध्ये बाजारपेठेतल्या सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात झाली. हिंदू-मुस्लीम व्यापार्‍यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उत्सवात पापाभाई पठाण हे ज्येष्ठ कार्यकर्ते अग्रणी होते.
 
 
 
परस्परांच्या सणांना एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात, सणांच्या-उत्सवाच्या काळात आनंदाचे क्षण एकत्र साजरे करावेत, असा मित्रत्वाचा व बंधुभावाचा मंत्र अनेक जण जपताना आजही दिसत आहेत. असाच एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका लेखकाने इंटरनेटवरील एका संकेतस्थळावर ‘शेअर’ केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात नसीम नावाची महिला अचानकपणे त्याच्या घरी आली. “मी दर्शनासाठी येऊ शकते का?” अशी विचारणा शेजार्‍यांकरवी तिने केली होती. घरी येताच तिने केलेला बदामाचा शिरा प्रसाद म्हणून पूजेसमोर ठेवला. तिने सांगितले की, ती मुंबईत सायन कोळीवाड्यात राहत असताना लहानपणी गणेशोत्सवात सहभागी होत असे.
 
 
मुंबईमध्ये कुलाबा भागात काही वर्षांपूर्वी रमझान ईद आणि गणपती उत्सव एकत्र आले होते. तेव्हा ईदच्या नमाजासाठी जेव्हा शेजारच्या मशिदीत व परिसरात जागा कमी पडू लागली तेव्हा जवळच्या सेवा मंडळ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नमाजासाठी गणपतीच्या मांडवात येण्याचे आमंत्रण दिले आणि ईदचा नमाज पार पडला. २०१५ मध्ये घडलेली गोष्ट तर लोकांनी जपलेल्या बंधुत्वाच्या भावनेचा आदर्श आहे. मुंबईमधील वडाळा भागात पहाटे ४.३० च्या सुमारास गणपती मंदिराच्या बाहेर बसलेल्या स्त्री-पुरुषांनी टॅक्सीमधून उतरून घाबरा झालेला एक माणूस मदत मागताना दिसला.
 
 
चौकशी केल्यावर कळले की, त्याची पत्नी नूरजहांला प्रसुतिवेदना सुरु झाल्या आहेत आणि आता इस्पितळापर्यंत पोहोचणे शक्य नाही. प्रसंगावधान दाखवत तेथील महिलांनी नूरजहांला मंदिरात नेले. तिथे साड्या, चादरी वगैरेंचा उपयोग करत आडोसा तयार केला व एका ज्येष्ठ व अनुभवी महिलेच्या मदतीने प्रसुती पार पडली. बाळ रडण्याचा आवाज आडोशा मागून येताच पती इल्याज शेखचे डोळे पाणावले. नूरजहां म्हणाली, गणपतीच्या कृपेमुळे आज मी व माझे बाळ वाचले. मी या मुलाचे नाव गणेश ठेवणार आहे.
 
 
मध्य प्रदेशातील रतलाम शहरात नित्य चिंताहरण गणेश मंदिर नावाचे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. दरवर्षी तिथे गणपती उत्सव साजरा होतो. विशेष गोष्ट म्हणजे दरवर्षी एक दिवस स्थानिक मुस्लीम समाजातर्फे आरती केली जाते आणि त्या दिवशीचा प्रसाद मुस्लीम समाजाच्यावतीने वाटण्यात येतो. धार्मिक सामंजस्याचे असे अनेकविध प्रयास स्थानिक पातळीवर उत्सवादरम्यान होत असतात. माध्यमांनी, पत्रकारांनी, समाजधुरिणांनी व इंटरनेट, ई-मेल व फेसबुकसारख्या समाज-माध्यमातून अभिव्यक्त होणार्‍या युवकांनी अशा प्रयत्नांना प्रसिद्धी देऊन धार्मिक सलोखा राखण्यासाठी विधायक प्रयत्न करणार्‍या मंडळींचा उत्साह वाढवायला हवा. विशेषतः धार्मिक तेढ निर्माण होणार्‍या दुर्दैवी घटना दिवस दिवस दाखवत बसणार्‍या वृत्तवाहिन्यांनी अशा सकारात्मक प्रयत्नांनादेखील यथोचित व वारंवार प्रसिद्धी दिली पाहिजे.
 
 
हा लेख गणेशोत्सवाच्या निमित्ताने लिहिला असल्यामुळे यात मुख्यत: गणेशोत्सवाच्या संबंधातील अशा बातम्या इथे उद्धृत केल्या आहेत. पण, अशीच उदाहरणे मुसलमानांच्या रमजान या पवित्र महिन्यांच्या संदर्भातदेखील सांगता येतील. उदा: उत्तर प्रदेशमध्ये मथुरा शहरात बनवारी लाल आणि त्यांचे कुटुंबीय हिंदू असून रमजान महिन्यात रोजे पाळतात व त्या पद्धतीचा उपवास करतात. हा क्रम गेली १५ हून अधिक वर्षे सुरु आहे. अजून एक माझ्या ओळखीचे उदाहरण सांगतो. मुंबई विद्यापीठाचे एक माजी हिंदू कुलगुरू गेली अनेक वर्षे पूर्ण रमजान महिन्यात रोजे पाळत आहेत. कधीतरी त्यांच्या मुस्लीम सहकार्‍याच्या साथीने त्यांनी एक वर्ष रोजे पाळले. नंतर असे रोजे पाळणे त्यांचा दरवर्षीचा क्रम झाला.
 
 
 
असे सामंजस्यपूर्ण व दुसर्‍यांच्या सण-उत्सवांच्या बद्दल सहभागाचे वर्तन करणे म्हणजे कोणाचे अनुनय करणे नव्हे. शहरातील गुंडगिरी, अतिक्रमणे, बेकायदा धंदे, विविध जाती-धर्माच्या विरोधात द्वेष पसरवणारे लेखन व वर्तन असल्या गोष्टींच्या कडे राज्यकर्ते, प्रशासन काहीवेळा कानाडोळा करते. अशा गुन्ह्यांच्या विरोधातील कारवाईमध्ये पक्षीय हितसंबंधांचा विचार करत हस्तक्षेप करणे, व्होटबँकेचे राजकारण करत जाती-धर्मांत फूट पाडणे अशा सर्व गैरगोष्टींच्या विरोधात स्पष्टपणे बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे.
 
 
प्रसंगी समाजात फूट पाडणार्‍या शक्तींच्या विरोधात राजकीय संघर्षही केला पाहिजे. पण हे करत असताना सामान्य नागरिक म्हणून परस्पर सामंजस्याच्या, सामाजिक देवाणघेवाणीच्या संधींची दारे बंद करून कसे चालेल? विविध सणांच्या, उत्सवांच्या निमित्ताने असे सामाजिक, सांस्कृतिक सौहार्दाचे प्रयत्न करायला हवेत. चालणार्‍या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायला हवे व त्या प्रयत्नांत सहभागी व्हायला हवे. तसे होण्यातच भेदभावमुक्त व सामंजस्यपूर्ण अशा भारताचे हित सामावले आहे आणि सभोवतीच्या लोकांशी-समाजाशी असलेले सामंजस्यपूर्ण वर्तन हीच लोकांच्या हितरक्षणाची हमी आहे. केवळ कायदे आणि पोलीस अशा हितरक्षणासाठी पुरे पडणार नाहीत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@