रत्नागिरीत बिबट्याची नखे काढून मृतदेह पुरला; तिघांना अटक

25 Aug 2020 17:39:22
leopard _1  H x


स्थानिक ग्रामस्थांचे कृत्य

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नैसर्गिक मृत्यू झालेल्या बिबट्याची नखे काढून त्याला पुरल्याबद्दल मंगळवारी वन विभागाने रत्नागिरीतील लांज्यामधून तीघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात सादर केले असता त्यांना २७ आॅगस्ट पर्यंत कोठडी देण्यात आली आहे. हे तिन्ही आरोपी वेरवली गावाचे ग्रामस्थ असून लालसेपोटी त्यांनी मृत पावलेल्या बिबट्याची नखे काढली. 
 
 

leopard _1  H x
 
 
लांज्यामधील वेरवली गावातील पवारवाडीत बिबट्या पुरल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. येथील जयश्री साळसकर यांच्या जमिनीमध्ये पुरलेल्या एका अज्ञात प्राण्याची शेपटी खड्ड्याबाहेर दिसून येत होती. शिवाय यापरिसरात प्रचंड वासही पसरलेला होता. यासंबंधी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रत्नागिरी वनाधिकाऱ्यांनी पवारवाडीत जाऊन जमिनीची पाहणी केली. यावेळी त्यांना याठिकाणी बिबट्या पुरल्याचे निदर्शनास आले. बिबट्याच्या कुजलेल्या अवशेषांमधून नखे गहाळ झाल्याचे वनाधिकाऱ्यांना आढळले. या घटनेची चौकशी वन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी वेरवली गावातून ग्रामस्थ दिनेश पवार (वय २८), रमेश साळसकर (वय ५५) आणि शंकर देवळेकर (वय ५७) यांना ताब्यात घेतले. 
 
 
 
 
या तिन्ही आरोपींची सखोल चौकशी केला असता त्यांच्याकडून बिबट्याची तीन नखे मिळाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका लगड यांनी दिली. या बिबट्याचा दोन ते तीन दिवसांपूर्वी नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय तपासणीतून समोर आल्याचे त्यांनी सांगितले. मृत बिबट्या आढळल्यानंतर त्यासंबंधीची माहिती वन विभागाला न कळवता आरोपींनी त्याला पुरले. महत्त्वाचे म्हणजे पुरण्यापूर्वी आरोपींनी बिबट्याची नखे काढून घेतली. त्यामुळे त्यांच्यावर 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना २७ आॅगस्ट पर्यंत कोठडी सुनाविण्यात आली आहे. ही कारवाई रत्नागिरीचे विभागीय वन अधिकारी र.शी.भवर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी लगड, वनपाल लांजा सागर पाताडे, वनरक्षक लांजा विक्रम कुंभार, वनरक्षक राजापूर सागर गोसावी आणि संजय रणधिर यांनी केली. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0