‘गणेश विसर्जन आपल्या दारी’ भाजपची अनोखी संकल्पना!

24 Aug 2020 14:45:51
prasad lad_1  H


आमदार प्रसाद लाड यांच्याहस्ते उपक्रमाचे उद्घाटन

मुंबई : कोरोनाच्या विघ्नाशी झुंज देत असताना विसर्जनासाठी दूर जावे लागू नये म्हणून भारतीय जनता पक्षाच्यावतीने 'गणेश विसर्जन आपल्या दारी' हा अनोखा उपक्रम राबवला गेला आहे. यामध्ये मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरते हौद-पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली जाणार आहे.


ज्यांना घरातील गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे आहे, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे हे फिरते वाहन संबंधित व्यक्तीच्या घराजवळ जाऊन तिथेच विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आमदार प्रसाद लाड यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. प्रदूषणमुक्त विसर्जन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन योग्य प्रकारे व्हावे या साठी "गणेश विसर्जन आपल्या दारी" ही संकल्पना राबविली जात असल्याचे, आमदार प्रसाद लाड यांनी म्हंटले.







सोशल डिस्टंसिंगच्या नियमामुळे भाविकांनी बाहेर पडून गर्दी न करता, शक्य तितकी काळजी घेत बाप्पाचे विसर्जन करावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दक्षिण मध्य मुंबईचे महामंत्री अजित सिंग यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ३६ ‘विसर्जन रथ’ भाजप कडून तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागात किमान एक रथ उपलब्ध असणार आहे. या ‘विसर्जन रथा’ला फुलांच्या माळांनी सजवले जाणार आहे.


कोरोना महामारीमुळे यंदा बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने आली आहेत. तसेच सार्वजिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी गणपती मूर्तींचे विसर्जन तलाव अथवा समुद्रात न करता आपल्या विभागातील कृत्रिम तलावांमध्ये करण्याला भाविकांनी अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे हा ‘विसर्जन रथ’ बाप्पाच्या भक्तांना आणखी सुरक्षित राहण्यास मदत करणार ठरणार आहे.






Powered By Sangraha 9.0