क्रांतिवीर राजगुरू यांच्या संघर्षगाथेवर येणार मराठी वेबसिरीज

23 Aug 2020 15:03:40
Rajguru_1  H x
 
 
 
 
मुंबई : भारतीय स्वातंत्र्य युध्दातील 'क्रांतिवीर राजगुरू' यांच्या जीवनावर आधारित ‘क्रांतिसूर्य राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा’ ही मराठी वेबसिरीज लवकरच आता आपल्या भेटीला येणार आहे.आज २४ ऑगस्ट क्रांतिसूर्य शिवराम हरी राजगुरू यांच्या ११३ व्या जयंतीचे औचित्य साधत काव्या ड्रीम मुव्हीज अंतर्गत या वेबसिरीजच्या पोस्टरचे ऑनलाइन अनावरण होणार आहे, अशी माहिती क्रांतिवीर राजगुरू यांचे नातू सत्यशील व हर्षवर्धन राजगुरू यांनी दिली.
 
 
 
स्वातंत्र्ययुद्धात ज्या क्रांतिकारकांनी जीवावर उदार होऊन महान कार्य केले त्यामध्ये 'क्रांतिवीर राजगुरू' यांचे नाव अग्रस्थानी आहे. सध्याच्या तरुण पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा ऐतिहासिक दस्तावेज वेबसिरीजच्या माध्यमातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. ही वेबसिरीज म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत ज्या क्रांतिकारकांनी अनन्वित अत्याचार सहन करून हसत हसत बलिदान केले त्यांना आदरांजली अर्पण करणारी आहे.
 
 
 
पुणे जिल्ह्यातील खेड (आताचे राजगुरुनगर) येथे जन्मलेला शिवराम हरी राजगुरू नावाचा मुलगा क्रांतिकारक कसा झाला, याची कहाणी या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. या वेबसिरीजचे लेखन आशिष निनगुरकर करणार असून मूळ कल्पना विलास राजगुरू यांची आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलावंत व तंत्रज्ञ हे या वेबसिरीजमध्ये आपल्याला दिसणार असल्याची माहिती क्रिएटिव्ह दिग्दर्शक सिद्धेश राजगुरू यांनी दिली.
 
 
 
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी पायाखाली अंगार असतानासुद्धा स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन उन्मत्त इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. कीर्तीसाठी किंवा घरादारात गुंतून न पडता मातृभूमीसाठी या तिघांनी आपल्या आयुष्याचे अग्निकंकण केले. या त्रिमूर्तींनी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान हा स्वातंत्र्य चळवळीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. ‘इन्किलाब झिंदाबाद,’ चा नारा देत भारतमातेच्या या सुपुत्रांनी ब्रिटीशांच्या साम्राज्यशाही विरोधात लढा उभारला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करले.
 
 
 
घरादारावर तुळशीपत्र ठेऊन भारतमातेसाठी जे शहीद झाले ते अमरत्वाला प्राप्त ठरले. अशा महान तीन क्रांतिवीर देशभक्तांपैकी महाराष्ट्राची शान असणाऱ्या राजगुरू यांच्या आयुष्यावरील ही वेबसिरीज भव्यदिव्य असणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या, ऐन तारुण्यात हसत हसत फासावर जाणाऱ्या या क्रांतिकारकाच्या बलिदानाची कहाणी नेहमीच स्फूर्तिदायी, देशभक्तीची ऊर्जा निर्माण करणारी ही वेबसिरीज रसिकांना आवडेल, यात तिळमात्र शंका नाही. स्वातंत्र्याचे मोल अनमोल आहे.
 
 
 
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारांच्या बलिदानामुळे ते आपल्याला मिळाले आहे त्यामुळे त्याचे मोजमाप आपण शब्दांमध्ये करू शकत नाही. म्हणून या क्रांतिवीरांच्या विचारांचा मागोवा घेऊन वाटचाल करणे हीच शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना खरे अभिवादन ठरेल, अशा आशावाद शहीद भगतसिंग यांचे पुतणे अभेयसिंह संधू, प्रा. जगमोहनसिंह, राजगुरू यांचे पुतणे राम राजगुरू, नातू मिलिंद राजगुरू व पणतू शंतनू राजगुरू यांनी व्यक्त केला.


 
Powered By Sangraha 9.0