राज्यातील कृषी खातं झोपलं आहे का ? : बच्चू कडू

23 Aug 2020 15:10:03

bachhu kadu_1  



अमरावती :
“राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय”, असा सवाल उपस्थित करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र सध्या सोयाबीन पीक संकटात सापडले आहे. सोयाबीनची शेती करणाऱ्यांना बोगस बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले आहेत.


यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील कृषी विभागाला लक्ष्य केले. 'सोयाबीन पिकवणारा शेतकरी यंदा पूर्णपणे घायाळ करून टाकला आहे. पेरलं तेव्हा निघालं नाही आणि पीक हातात आलं तेव्हा मारून टाकलं. राज्यातलं कृषी खातं झोपलंय की काय ? अशी स्थिती आहे. जेव्हा बियाणांचं प्रमाणीकरण होतं, त्यावेळी काही बदमाशी होते का, असा प्रश्न मला पडतो. महाबीजने बाजारातलं बियाणं घेतलं असा माझा स्पष्ट आरोप आहे. बाजारातून सर्वात निकृष्ट बियाणं २-३ हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करून ८ हजार रुपये क्विंटल दराने विकलं,' असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.यावेळी त्यांनी बियाणं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांना थेट इशारा दिला. 'दरवर्षी अशीच स्थिती आहे. ५० वर्षांत परिस्थिती जराही बदलेली नाही. बियाणं चांगलं मिळालं असं एक वर्षही जात नाही. या प्रकरणात जो आरोपी आहे, कंपनीचा मालक आहे, त्याला धरून चोपले पाहिजे. त्याच्याशिवाय यात सुधारणा होणार नाही,' अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारीदेखील उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0