वैश्विक गणेश

    दिनांक  21-Aug-2020 21:41:39   
|

ganesha_1  H x


भारतीय वंशाचे लोक जगभरात विखुरलेले आहेत. त्यामुळे जगभरात गणेशोत्सव साजरा होत असतानाची छायाचित्रे आपण अलीकडल्या काळात पाहिली असतील. मात्र, जगाच्या पाठीवर मुख्यत्वे दक्षिण आशियाई देशात गणपती त्यांच्या त्यांच्या सांस्कृतिक संचिताचा भाग आहे. बुद्धकालीन लेण्यांमध्ये, जैन परंपरेत गणपतीचे अस्तित्व आढळते.


गणपती हे महाराष्ट्राचे लाडके दैवत. हिंदू धर्मात प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला गणपतीचे पूजन करण्याची पद्धत आहे. संपूर्ण भारतात या परंपरेचे पालन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. विशेषत: गणेश चतुर्थी तसेच माघ महिन्यातील गणेश जयंतीच्या दिवशी घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून उत्सव साजरा करतात. भारतीय वंशाचे लोक जगभरात विखुरलेले आहेत. त्यामुळे जगभरात गणेशोत्सव साजरा होत असतानाची छायाचित्रे आपण अलीकडल्या काळात पाहिली असतील. मात्र, जगाच्या पाठीवर मुख्यत्वे दक्षिण आशियाई देशात गणपती त्यांच्या त्यांच्या सांस्कृतिक संचिताचा भाग आहे. बुद्धकालीन लेण्यांमध्ये, जैन परंपरेत गणपतीचे अस्तित्व आढळते. गुप्तकाळातील बुद्ध लेण्यांमध्ये गणपतीची मूर्ती कोरलेली आढळते. अखंड भारताच्या उत्तर भागात तसेच नेपाळ, तिबेटमध्ये गणपतीचे अस्तित्व आहे. इंडोनेशियातील पाच प्रमुख शिल्पांतील सुखः याठिकाणी नृत्य करणारा गणेश आहे. महाराष्ट्रात गोंडस दिसणारा गणपती तिबेटमध्ये थोडासा उग्र झाल्याचे लक्षात येते. तिबेटियन तंत्रविद्येत गणपतीचा उल्लेख आहे. लाल रंगाचा ‘महारक्त’ गणपती तिबेटमध्ये आढळतो. बुद्ध विचारात सर्व बोधिसत्वांचे प्रतीक ‘अलोकितेश्वर’ आहे. गणपती म्हणजे ‘अलोकितेश्वर’च समजले जाते. ‘महारक्त’ गणपती म्हणजे एक विशालस्वरूप आहे. ‘महारक्त’ गणपतीला बारा हात असतात आणि त्यापैकी बहुतांश हातात शस्त्र आहेत. तसेच कवटी आणि रक्तही असते. त्यामुळे हा गणपती संरक्षक आहे. बुद्ध परंपरेत गणपती जपानमध्ये पोहोचल्याचे समजते. अभ्यासकांच्या मते, इ. स. ७७४ म्हणजेच कुकाई च्या काळापासून गणपती जपानमध्ये आहे. जपानमध्ये गणपतीच्या तीसपेक्षा जास्त प्रकारच्या मुद्रा आढळतात. गणेशपुराणात गणेशसहस्त्रनामात दुसर्‍या कडव्यात बुद्ध नामाचा उल्लेख आहे. त्यातून गणपती आणि बुद्ध यांचा अवतारसंबंध जोडण्याचा प्रयत्नही झालेला आहे. इंडोनेशियातील संगर अगुंग मंदिर येथे गणपतीची मूर्ती आहे. भारतातील गणपती आणि इंडोनेशिया येथील मूर्ती अगदी हुबेहूब आहे. अनेक चिनी समुदाय गणपतीपूजक होते. थायलंड, कंबोडिया येथेदेखील गणपतीचे अस्तित्व सापडते. थायलंड देशाच्या ‘फाईन आर्ट्स’ विभागाच्या बोधचिन्हात ‘गणपती’ आहे.


जैन साहित्यात गणपतीचा उल्लेख आढळतो. परंतु, हा संदर्भ बाराव्या शतकातील आहे. श्वेतांबर पंथातील साहित्यानुसार गणपतीदेखील विरक्त जीवन जगणारा आहे. तसे संदर्भ वर्धमानसुरीच्या ‘अकारदिनकरा’मध्ये सापडतात. प्रत्येक मंगल कार्याच्या आरंभी गणपतीचे पूजन होते. तसेच मोठ्या मोहिमेच्या आधी गणपतीचे पूजन करण्याची परंपरा श्वेतांबर पंथात आहे. उदयगिरी आणि खंडगिरी या दोन दिगंबर परंपरेतील पंथाच्या शिल्पांकलेत गणपतीची दोन शिल्पे कोरलेली आढळतात. मथुरेला जैन गणेश पुतळा आहे. त्यासोबत जैन यक्षी अंबिका म्हणजेच ‘गौरी’देखील आहे. राजस्थान, गुजरात येथील जैन मंदिरात गणपतीची चित्रे आहेत. १७८५च्या दरम्यान विलियम जॉन्सने ग्रीक देवता जेनस आणि द्विमुखी गणेश यांच्यात काही समबिंदू जोडले होते. द्विमुखी गणेश म्हणजे भारताचा जेनस असे उल्लेख त्याने केले आहेत. तसेच गणपती व जेनस या दोन्ही देवांतील समान तत्त्व, गुण असे दाखविण्याचा प्रयत्नही जेनसने केला आहे. गणपती भारतात पूजले जाणारे दैवत आहे. परंतु, संपूर्ण हिंदू समाजाला जोडणारे जे समान सांस्कृतिक धागे आहेत त्यापैकीच एक गणपतीदेखील आहे. तसेच हिंदू संस्कृतीचा प्रभाव ज्या-ज्या भागात होता त्या प्रत्येक ठिकाणी गणपतीचे पुरातत्त्वीय अस्तित्व आढळते. परंतु, भौगोलिक वैविध्यतेनुसार गणपतीची रूपे बदलत जातात. प्रत्येक परंपरेतील गणपतीचा स्वतंत्र आविष्कार आहे. त्यामुळे गणपतीचे आढळणारे अवशेष म्हणजे हिंदू आक्रमणाचे प्रमाण ठरत नाहीत. त्याउलट हिंदू संस्कृतीच्या वैविध्यपूर्ण एकतेचे ते पुरावे आहेत. त्यामागील कथा, पूजा-पद्धतीत त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक स्वत्वाची जाणीव आहे. वेगवेगळ्या स्वरूपातील गणपती म्हणजे सहिष्णुता, उदारमतवाद आणि स्वातंत्र्याचे दाखले आहेत. अशा सांस्कृतिक मूल्यांनी विणलेला हिंदू समाज म्हणून नामशेष होऊ शकला नाही. कारण, त्यात प्रत्येक हिंदू हा स्वतंत्रपणे धर्माचा उद्गाता, अधिकारी ठरतो. म्हणून शेवटचा हिंदू जीवंत असेपर्यंत हिंदुत्व कालबाह्य होणार नाही. म्हणून समाजाच्या बांधणीसाठी या समान धाग्यांना अधिक मजबूत करणे काळाची गरज आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.