’स्वर’राज !!

    दिनांक  21-Aug-2020 22:25:17
|

pt. jasraj_1  Hहिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची ध्वजा गेली सात दशके डौलानं फडकती ठेवणार्‍या पंडित जसराज यांचं १७ ऑगस्ट रोजी निधन झालं. पंडितजींच्या गाण्यात चैतन्याचा सुवास होता. गुरूंच्या अनन्य भक्तीची आर्जव होती. स्वर परमात्म्याचं राजस-लोभस अस्तित्व होतं आणि सर्व रसिक श्रोत्यांना शरीराच्या अस्तित्वासह त्या स्वर परमात्मात तादात्म्य पावण्यासाठी लागणारी दैवी ऊर्जा होती. पंडित जसराजांना मानवंदना म्हणून त्यांच्यावर हा विशेष लेख...अनेक तपस्वी ‘स्व’ साधनेसाठी ईश्वराला सगुण रुपात कल्पितात, पण पंडित जसराज हे एकमेवाद्वितीयच! कारण, त्यांनी आपल्या दैवी व ओजस्वी स्वराकृतींनी शास्त्रीय संगीताच्या मूळ स्वरूपाला जराही धक्का न लागू देता, त्यातली अभिजातता आणि मांगल्य कायम राखत, आपल्या स्वरांवाटे सामान्यांसाठी त्याचं सगुण निर्माण केलं. म्हणूनच गेली सात दशके निष्काम, निरपेक्ष, निराकांक्ष मनानं नादब्रह्माची उपासना करणार्‍या पंडित जसराजांचं कार्य देदीप्यमान ठरतं. १७ ऑगस्टला वयाच्या नव्वदाव्या वर्षी शास्त्रीय संगीतातला हा तारा निखळला असला तरी अग्नीच्या सप्तज्वाला या त्यांच्या कर्तृत्वाच्या शिखा आहेत. ज्ञानाला चिकटत जाणारा मानवी मर्यादांचा गंध त्या जाळून टाकतील याची खात्री आहे. अनेक वर्षांत न घडलेलं असं लोक विलक्षण, लोकत्व ल्यालेलं कार्य ‘पंडित जसराज’ या नावानं फुलतं, फळतं आहे आणि सदैव तसेच राहील, यात तीळमात्र शंका नाही. जसराज हे अखिल शास्त्रीय संगीत धर्माचे प्रवक्ते होते. स्वर परमात्म्याची सच्छील पताका उंच उभारून त्यांनी प्रत्येक रसिकाच्या मनात चैतन्याचा स्फूर्तिमंत्र प्रज्वलित केला. म्हणूनच जसराजांचं गाणं स्वर्गीय आनंदाची मनमुक्त बरसात करतं. संगीत, समाज आणि मानव यात स्वर, चैतन्य, अस्मिता, जागृती, निस्सीम भक्ती, निष्ठा, प्रेम इत्यादी सद्गुणांचा परमोत्कर्ष साधणारा तेजस्वी संदेश त्यांनी आपल्या गाण्यावाटे दिला आहे. भारतीय शास्त्रीय संगीतासाठी आणि त्याच्या प्रत्येक चाहत्यासाठी याहून मोठी समाधानाची बाब ती काय?


संगीत आणि त्यातही अभिजात संगीत याची एक सोपी, सुंदर व्याख्या जसराजांनी करून ठेवली. ‘संगीत ही अखिल मानवाची खरी भाषा आहे. ती देवरूप आहे. शुचितेचा स्पर्श देतं ते अभिजात संगीत.’ म्हणूनच मनाच्या बिलोरी काचेचं चमचमणार्‍या हिर्‍यात रुपांतर करणारा त्यांचा प्रत्येक सूर, प्रत्येक आलाप, प्रत्येक तान, हरकत अगदी सहज आणि हळुवारपणे चिरकाल टिकणार्‍या मांगल्याचं प्रोक्षण करीत यायची. प्रत्येक आलाप, तान, हरकत, मुरकी नवांकुराप्रमाणे उल्हासित करायची, शिवाय गातांना कुठलाही बडेजाव नाही अथवा उगीच काहीतरी अनोखे अथवा कठीण असे काहीतरी सादर करत असल्याचा दिखावा नाही. ‘ओम श्री अनंत हरी नारायण’ हे मंगल स्वर त्यांच्या मुखातून बाहेर पडायला लागले की घरंदाज, साक्षात दैवी गाणं असलं की गाणार्‍याच्या अंतरंगात आणि बाह्यसृष्टीतही निश्चित परिणाम होतो यावर ठाम विश्वास बसायला लागायचा. जसराजांच्या प्रत्येक मैफिलीनं हे पटवून दिलं की या क्षणभंगुर आयुष्यामध्ये संगीत हेच एक शाश्वत सुख आहे. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलंच होतं. अविरत मेहनतीच्या दीर्घ कालावधीनंतर हळूहळू हे दैवी स्वर अंतरंगात साकार व्हायला लागतात. त्या साकारीत रूपांचं मनोभावे पूजन करीत राहिलं की यथावकाश त्यांच्या प्रकटीकरणातून भावही व्यक्त व्हायला लागतो. नित्य तन्मयतेनं मानसपूजा सुरूच ठेवली तर स्वरांचं प्रकट होणारं रूप मग भक्तियोग साधायला लागतं. त्या दैवी स्वरांचं आणि ते धारण करणार्‍या थोर कलाकाराचं नातं मग अतूट धाग्यांनी जोडलं जातं. त्यावेळी जात, धर्म देश, सीमा अशी क्षुल्लक बंधने मागे पडतात आणि समोर उभी ठाकते ती अमोघ दैवी कलाकृती. कुठल्याही गायकाला, वादकाला करावी लागणारी उपासना तडजोडीविनाच असावी हेच त्याचं द्योतक आहे.
रागाची शुद्धता सांभाळत, तालाच्या अनुषंगाने बंदिशीची रेखीव मांडणी, सुबक लयकारी आणि भावपूर्ण श्लोकांची ख्याल गायनात गुंफण, मखमली आवाजात सुरांची करामत चालली असताना त्यात विरघळून येणारी काळजाचा ठाव घेणारी सहज सम, दमसासाच्या दाणेदार-स्पष्ट-पेंचदार आणि सुराला चिकटून असणार्‍या सहजतेनं येणार्‍या ताना, लयीच्या अंगाने बोलांचे पूर्ण शब्द, शब्दांचे सौष्ठव सांभाळून शब्दांची ओढाताण न करता सहजतेने गायले जाणारे शब्द, तीन सप्तकात फिरणारा सुरेल आवाज, सस्पंदक सुसाट ताना, मींड, तिहाई, गमक, नोटेशन्स यांचा अद्वितीय संगम अशी कितीतरी वैशिष्ट्य त्यांच्या गाण्यात सामावलेली होती. म्हणूनच त्यांचा पाझरणारा प्रत्येक स्वर अमोघ स्वरानुभूती देऊन जायचा. धगधगतं ईश्वरचैतन्य आपल्या गाण्यावाटे सदेह उभं करणार्‍या पंडितजींचा प्रवास अर्थातच सोपा नव्हता. अडथळे, संकटं, अपयश त्यांच्याही मार्गात ‘आ’ वासून उभे होतेच. सृजनशीलता आणि सर्जनशीलता उराशी बाळगत ते सतत नवनिर्मितीचा आविष्कार घडवत राहिले म्हणूनच मूर्च्छना पद्धत शास्त्रीय संगीतात ते रुजवू शकले. पुढे त्याचा अधिक अभ्यास करून ‘जसरंगी’च्या रूपानं अमूल्य ठेवा शास्त्रीय संगीताला दिला. हवेली संगीताला खर्‍या अर्थानी त्यांनी वैश्विक मंच उपलब्ध करून दिला. ज्ञानाच्या स्पर्शानं अस्मिता येते. हिच अस्मिता जसराजांनी आपल्या गाण्यावाटे दुसर्‍यांच्या जीवनात ज्ञानकिरण पोचवून त्याला उभारी आणण्यासाठी खर्च केली म्हणूनच मांगल्याचा जन्मदाता ‘ओंकार’ ही प्रसन्न चित्तानं त्यांच्या गळ्यात सदैव वास करतोय हे जाणवत राहायचं. निमग्नता, सर्वस्वाचे समर्पण, अंतःकरणाचे पावित्र्य, इंद्रियांचा निग्रह, मनाची शांती आणि चित्ताचे शांतीपूर्वक प्रवाहित राहणे, उत्तम गाण्यासाठी किती आवश्यक आहे हे त्यांच्याकडे बघितल्यावर लगेच पटायचे. स्वरांचे अनुकंपन, सृजनशील आलापी, गायकीत भावगर्भ तादात्म्य ही त्यांच्या गायकीत हमखास जाणवणारी वैशिष्ट्ये होती. मैफिलीतला प्रत्येक स्वर विचारपूर्वक, वेगवेगळ्या जोडकामातून मांडला जात असे, जेणेकरून स्वरांचा व्यक्तिवाद एकसंध भासावा. त्यातून रागाची बढत सहजतेने होते, असं पंडितजी नेहमी म्हणायचे.
शास्त्रीय संगीतातील बंदिशी या नेहमीच जगण्यातलं तत्वज्ञान, प्रेम, भक्ती, श्रद्धा, उत्कटता, समीपता अशा कितीतरी भावनांची मनमुक्त उधळण करत असतात. पंडित जसराजांनी रचलेल्या बंदिशी अत्यंत चैतन्यपूर्ण आणि सखोल वैचारिक बैठक असलेली तरीही भावसौंदर्याचा कळस गाठलेली त्यांची गायकी अधिक उलगडून दाखवणार्‍या आहेत यात तिळमात्र शंका नाही. गाण्यासारखी कला जोपासत टिकवून ठेवण्यासाठी लागणारं आत्मसंयमन, तितिक्षा आणि ईश्वरार्पण भाव त्यांच्या प्रत्येक बंदिशीतून जाणवतो. उदाहरणच द्यायचं झालं, तर ‘आज तो आनंद आनंद, पूर्ण ब्रह्म सकल घट व्यापक सो आयो ग्रहनंद’ या त्यांच्या ‘अहिर भैरव’मधल्या बंदिशीतून जसराज प्राणा-मनातून फुलून आले आहेत. ईश्वर ज्याप्रमाणे सृष्टी निर्माण करतो, त्याप्रमाणे अंशात्मक सृष्टी भक्तालाही निर्माण करता यावी लागते आणि त्याच्या सृष्टीत त्याला ईश्वराचे अस्तित्व जाणवले तर कृतकृत्य होत आनंदाने त्या सगुणाचे स्वागत करताना पंडितजींची मनाची प्रसन्नता त्यांनी बंदिशीत चपखल उतरवली आहे. ‘गुजरी तोडी’मधली ‘चलो सखी सौतन के घर जैय्ये’ या बंदिशीत तर त्यांनी साध्या, सोप्या, सुलभ भाषेत नायिकेचा ‘सौतन’च्या घरी जाण्याचा हट्ट किती निरागसपणे मांडला आहे. त्यांच्या अनेक बंदिशींमध्ये अल्ला, राम, देवी, कान्हा, साई अशी सारीच पात्रे येऊन गेली आणि त्या सार्‍यांनाच त्यांनी शब्दांनी आणि आपल्या स्वर्गीय स्वरांनी पूर्ण न्याय दिला. गायकाकडे स्वर, ताल, लय याबरोबरीनेच शब्दाचे आयुध आहे ही नवी दृष्टी त्यांनी दिली. स्वच्छ- निर्मळ शब्द आणि प्रत्येक शब्दातून पाझरणारा ईशस्वर बंदिशीच्या अर्थाशी आणि त्यातील भावनांशी तद्रूप होऊन श्रोत्यांपुढे मांडला गेला आहे. सश्रद्ध ऐकताना श्रोते आणि उत्तम गायक यांचा तो सुरेल संगम म्हणजे जणू दोन प्रियदर्शनी कमळेच एकरूप होऊन गंधर्वचरणी विराजली आहेत. म्हणूनच जसराजांचा गाणं चिन्मयस्वरूपाचा सहज निर्मळ हुंकार वाटतो. त्यांच्या समर्थ शिष्यांमार्फत त्याचा प्रसार व प्रचार अविरत होत राहील, याबद्दल दुमत नाही. कारण, त्याचं अधिष्ठानच आकाशाएवढं आहे, अद्वैताकडे संकेत करणारं.
स्वरतत्त्वाशी एकरूप झालेली पंडित जसराजांची देखणी समाधी ‘संगीत’ हे व्यापक आणि सर्वांना समाविष्ट करणारं असतं, हे सत्यवचन अधोरेखित करणारी असायची. ही समाधी देहरूपानं आता दिसणार नसली तरी स्वरतत्त्वाशी घनिष्ट नातं सांगणारे त्यांचे सूर सदैव तेवत राहतील. तृप्तीनं सजीव महाबलवान होतो असं म्हणतात. मोहोळ उठावा तसा तृप्तीचा झंकार अजूनही कानात वास करतो आहे. पंडितजींचे लाघवी स्वर, ‘भटियार’ रागातले त्यांचेच हे शब्द अशा दुःखद प्रसंगी धीर देऊन जाताय,
कोई नहीं अपना, ये जगत रैन का सपना!
समझ बूझ मन मेरे, जो चाहो तो तरना,
नित हरी को भजना, मेरे मना!!- निराद जकातदार
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.