शाहीनबागेतही ‘कमळ’ फुलले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2020   
Total Views |

BJP_1  H x W: 0


शाहीनबाग आंदोलनाच्या आयोजकाने भाजपमध्ये सहभागी होणे यास काहींचा विरोध असू शकतो. ज्या आंदोलनाच्या विरोधात पक्षाने कठोर भूमिका घेतली, त्यास पक्षात का घ्यायचे, हा प्रश्न अतिशय रास्त आहे. मात्र, यामुळे एका अराजकतावादी आंदोलनामध्ये फूट पडली आहे आणि त्यामुळे अनेकांचे खरे चेहरे पुन्हा उघडकीस आले आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.



गतवर्षी हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करून घेतला. लोकसभेत सरकारचे बहुमत असल्याने तेथे मंजुरी मिळण्यास अडचण नव्हतीच. मात्र, राज्यसभेत बहुमत नसतानाही सुयोग्य ‘फ्लोअर मॅनेजमेंट’च्या आधारे सरकारने विधेयक मंजूर करून घेतले. त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर झाले. म्हणजे विधेयक संसदेत मांडणे, त्यावर सविस्तर चर्चा होणे, चर्चेअंती मंजुरी मिळणे आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात (सीएए) रुपांतर होणे अशा ससंदीय लोकशाहीच्या नियमांप्रमाणेच सर्व काही झाले. मात्र, काँग्रेससह अन्य लोकांनी त्यालाच लोकशाहीविरोधी ठरवित मोदी सरकार हुकूमशाही करीत असल्याचा नेहमीचा आरोप केला. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या मुस्लीम राष्ट्रांमधील धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन या भारतात शरणार्थी म्हणून राहणार्‍यांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यासाठी कायदा असावा, अशी मागणी देशात दीर्घकाळापासून होत होती. कारण, या धार्मिक अल्पसंख्याकांना अधिकृत मुस्लीम राष्ट्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य मिळत नाही, त्यांच्या मूलभूत हक्कांची नेहमीच पायमल्ली होत असते. अशा धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व द्यायलाच हवे, अशी भूमिका महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही वेळोवेळी घेतली होती. त्यामुळे केंद्र सरकारने त्यासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे खरेतर सर्वांनी स्वागत करण्याचीच गरज होती. मात्र, काहीही झाले तरी केंद्र सरकारच्या म्हणजेच भाजप सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध करायचा, त्याबद्दल जनतेची दिशाभूल करायची आणि देशात अराजक पसरविण्याचा प्रयत्न करायचा, असा अजेंडा असलेल्या विरोधी पक्षांसह पुरोगामी म्हणवणार्‍या मंडळींनी ‘सीएए’विरोधात देशातील अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या मनात भीती पसरविण्यास सुरुवात केली. मुस्लीम समाजाच्या मनात भय निर्माण करून भडकविण्यासाठी या मंडळींनी मग अद्याप मसुदाही तयार न झालेल्या ‘एनआरसी’सोबत ‘सीएए’ जोडणे सुरू केले होते.


त्यानंतर या अराजकाला व्यवस्थित रूप देण्यासाठी दिल्लीतल्या शाहीनबाग परिसरात कथित आंदोलनाच्या रुपात एक तमाशा बसविण्यात आला. तेथे अल्पसंख्याक समाजातील महिला आणि लहान मुलांना बसविण्यात आले आणि तब्बल तीन महिने तेथे या कथित आंदोलकांनी अराजक मांडले होते. तेथे वापरली जाणारी भाषा, देशाच्या पंतप्रधानाविरोधात, संसदेविरोधात ओकली जाणारी गरळ आणि हिंसेचे केले जाणारे थेट समर्थन याची परिणती पुढे दिल्लीत झालेल्या हिंसाचारात झाली. त्यामध्ये सक्रिय होती ती ‘पीएफआय’ ही संघटना, जेएनयु, जामिया मिलिया इस्लामियामधील विद्यार्थी आणि सत्ताधारी आप पक्षाचे नेते. त्यामध्ये सूत्रधाराची भूमिका बजावली ती नक्षली चळवळीचे पाठीराखे असणार्‍या देशातील कथिक बुद्धिवादी मंडळींनी. या सर्व हिंसाचाराचे खापर केंद्र सरकारवर फोडण्यासाठी यांची ‘इकोसिस्टीम’ सक्रिय झाली होती. चॅनेल चर्चा, लेख याद्वारे भारतात अल्पसंख्याकांवर कसे अत्याचार होतात, हे अगदी रंगवून रंगवून सांगायला सुरूवात झाली होती. कोरोनाचे संकट आले नसते तर देशभरातच अशा प्रकारची हिंसा त्यांनी घडवली नसती, याची खात्री देता येत नाही.



मात्र, या पार्श्वभूमीवर दि. १६ऑगस्ट रोजी एक महत्त्वाची घटना घडली. त्याकडे देशाचे थोडे दुर्लक्षच झाले. या घटनेमुळे शाहीनबागेतच आता ‘कमळ’ फुलले आहे. शाहीनबाग आंदोलनाच्या आयोजकांपैकी एक असलेल्या शहजाद अली यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शहजाद अली म्हणतात, “आंदोलन संपले आणि कोणताही विचार न करता मी भाजपमध्ये आलो, असे झालेले नाही. मी आंदोलनाच्या आयोजकांपैकी एक होतो, आंदोलन सुरू करण्यामागे आमची भूमिका हिंसाचार किंवा अराजक पसरविण्याची अजिबात नव्हती. मात्र, साध्याभोळ्या आंदोलकांचा वापर अनेकांनी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी केला आणि त्यामुळे संपूर्ण मुस्लीम समाजच त्यामुळे लक्ष्य झाला. ‘सीएए’विषयी सरकारतर्फे आमच्याशी संवाद साधला जावा, अशी आमची अगदी सुरुवातीपासूनची मागणी होती. आमच्या मनातील प्रश्न, संशय दूर करण्यासाठी असा संवाद होणे गरजेचे आहे. आजही आमची तीच भूमिका आहे. आज मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे असा संवाद व्हावा यासाठी मी अधिक जोरकसपणे प्रयत्न करू शकणार आहे.”



त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे मुस्लिमांचे शत्रू आहेत, असा प्रचार नेहमीच केला गेल्याचे शहजाद म्हणतात. त्यामुळे खरे काय ते जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत जाऊन नेमकी भूमिका समजून घेणे गरजेचे होते आणि मी आता नेमके तेच करीत असल्याचे ते सांगतात. दुसरी एक बाब म्हणजे, “गेल्या सहा वर्षांचा विचार केला तर मोदी सरकारने मुस्लीम समाजासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही. हिंदू समाजाला जेवढ्या योजनांचा लाभ मिळतो, तेवढाच लाभ मुस्लिमांनाही मिळाला आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाने विनाकारण कोषात राहण्याची गरज नाही, त्यामुळे नुकसानच होणार आहे,” असेही शहजाद अली सांगतात. शहजाद अली यांच्या भाजप प्रवेशात महत्त्वाची भूमिका बजावली ती दिल्ली प्रदेश भाजपचे प्रसारमाध्यम प्रमुख अशोक गोयल देवराह आणि निगहत अब्बास यांनी. शहजाद यांची आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाविषयीची नाराजी गोयल आणि अब्बास यांनी नेमकी हेरली होती. त्यानंतर ते शहजाद अली यांच्या संपर्कात होते. अब्बास यांच्या मते, काँग्रेस आणि आप यंनी मुस्लीम समाजाची नेहमीच दिशाभूल केली आहे. दिल्लीतील हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार कोण, हे आता जनतेसमोर आले आहे. त्यामुळे आता मुस्लीम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात यायचे असेल, तर भाजप हाच त्यांच्यासाठी योग्य पर्याय आहे. त्यामुळे शहजाद अली यांचा भाजपप्रवेश हा महत्त्वाचा ठरतो.



आता शहजाद अली यांच्या भाजपप्रवेशाबद्दल समर्थक आणि विरोधक यांना आक्षेप असणे साहजिक आहे. ज्या शाहीनबाग आंदोलनाच्या विरोधात पक्षाची भूमिका होती, त्याच्या आयोजकाला भाजपमध्ये घेणे योग्य नाही, असे समर्थक सांगतील; तर ही आंदोलनाशी प्रतारणा असल्याचा दावा आंदोलक करतील आणि आपसारखा संधीसाधू पक्ष मात्र शाहीनबाग प्रकरण भाजपनेच घडविले, असा दावा करून मोकळे होतील. मात्र, या सर्वांपेक्षा खुद्द शहजाद अली यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. शहजाद अली यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यामागे निव्वळ स्वार्थ आहे, हे कोणीही सांगेल. मात्र, शहजाद यांच्या भाजप प्रवेशामुळे देशाला धोकादायक असलेल्या या आंदोलनामध्ये फूट पडली, हे सर्वांमध्ये महत्त्वाचे. कारण, आताची परिस्थिती पाहिल्यास आंदोलकांमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शहजाद अली हे कधीही आंदोलनस्थळी आले नाहीत, त्यांचा आयोजनाशी संबंध नाही असा दावा आता करण्यात येत आहे. मात्र, आता त्याकडे कोणी लक्ष देणार नाही. कारण, शहजाद अली यांच्या भाजपप्रवेशामुळे आंदोलनात सहभागी होणारे सर्वसामान्य लोक विचार करायला लागले आहेत.कोरोना संकट संपल्यानंतर पुन्हा तमाशा सुरू करायचा, हा शाहीनबागवाल्यांचा डाव नाही, याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे जर आंदोलनामुळे फूट पाडण्यासाठी भाजपनेच शहजाद यांना फोडले असेल तर त्यात वावगे काहीही नाही. उलट अशा प्रत्येक अराजकदावादी आंदोलनामध्ये फूट पाडून सामाजिक स्वास्थ्य सुधारणार असेल तर यापुढे हे धोरणे राबविणे इष्ट ठरेल.

@@AUTHORINFO_V1@@