सुशांत सिंह राजपूत आत्महत्येची घटना पुन्हा घडणार!

    दिनांक  20-Aug-2020 14:21:15
|
sushant_1  H x


घटनाक्रम समजून घेण्यासाठी सीबीआय ‘रिक्रिएट’ करणार सुशांतची आत्महत्या!

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सुशांत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवले आहे. सुशांत प्रकरणी सीबीआय पुन्हा एकदा सगळा घटनाक्रम तपासून पाहणार आहेत. सुशांतची उंची, त्याच्या सीलिंगची असलेली उंची, त्याचे वजन, तिथल्या पंख्याची उंची या सगळ्याची तपासणी करून ही घटना नेमकी कशी घडली हे जाणून घेण्यासाठी या घटनेचे ‘रिक्रिएशन’ करण्यात येणार आहे. सुशांतची आत्महत्या होती, की हत्या याचा तपास करण्यासाठी हे नाट्य सीबीआयच्या पथकाकडून घडवण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.


अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे. सोबतच मुंबई पोलिसांनी गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही दिले आहेत. आता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआयची एसआयटी टीम शुक्रवारी मुंबईत येणार आहे. सीबीआयची टीम वांद्रे पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेणार आहे.


या प्रकरणी सीबीआयने गुजरात केडरचे आयपीएस मनोज शशिधर यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत केली आहे. दिल्ली सीबीआय मुख्यालयात कार्यरत असलेल्या गुजरात केडरच्या महिला आयपीएस अधिकारी गगन दीप गंभीर यासुद्धा या टीमचा एक भाग आहेत. या प्रकरणात १० लोकांची टीम एकत्र काम करणार आहे.


सीबीआयचा तपास बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असेल. ज्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेला ६० दिवसांपेक्षा अधिकचा काळ लोटल्याने या प्रकरणातील घटनास्थळावरील क्राइम सीन जवळजवळ पुसला गेला असू शकतो. त्यामुळे सध्या सीबीआयजवळ फक्त घटनास्थळावरुन घेण्यात आलेल्या छायाचित्रांचा आधार असणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.