रामललासाठी २८ वर्ष आज्जींनी केला उपवास

02 Aug 2020 15:56:09
urmila chaturvedi_1 




नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या शिलान्यासाची तयारी सुरू झाल्यानंतर जबलपूरमध्ये राहणाऱ्या ८१ वर्षीय आज्जींची तपस्या पूर्ण होणार आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वादग्रस्त ढाँचा हटवल्यानंतर त्यांनी हा संकल्प सुरू केला होता. राम मंदिराचा पाया रचल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही, तोपर्यंत फलाहार करून राम जप करत उपवास करेन, अशी शपथ २८ वर्षांपूर्वी उर्मिला चतूर्वेदी यांनी घेतली होती. 
जबलपुरच्या विजय नगरमध्ये राहणाऱ्या उर्मिला देवी यांनी त्या काळात उपवास सुरू केला होता. लोकांनी त्यांना बऱ्याचदा समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या अडून राहिल्या. राम मंदिर प्रकरणी निकाल लागल्यावरही त्यांना आनंदही तितकाच झाला होता. त्यांनी निर्णय देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या होत्या. अयोध्येत पाच ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करतील. शिलान्यास कार्यक्रम होईल. उर्मिलाजी त्या दिवशी दिवसभर राम नामाचा जप करणार आहेत. 
अयोध्येत गेल्यावर रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतरच अन्न ग्रहण करेन, अशी त्यांची इच्छा आहे. कोरोनामुळे आमंत्रितांनाच या कार्यक्रमाला जाता येणार आहे, त्यामुळे त्यांनी त्या दिवशी तरी किमान उपवास सोडावा, अशी घरच्यांची इच्छा आहे. परंतू आज्जी त्यासाठीही अद्याप तयार झाल्या नाहीत. उर्मिलाजींच्या मते, अयोध्येत राम मंदिराचे निर्माण होणे हे त्यांच्या पूर्नजन्माप्रमाणेच आहे. माझा संकल्प पूर्ण झाला आहे परंतू उर्वरित जीवन अयोध्येत रामाच्या सहवासात घालवण्याची इच्छा त्यांना आहे. अयोध्येत राहण्याची सोय व्हावी, असा प्रयत्न त्या करत आहेत.



Powered By Sangraha 9.0