केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एम्स रुग्णालयात दाखल!

18 Aug 2020 10:58:35
Amit shaha_1  H


श्वसनास त्रास झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल!


दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील एम्समध्ये रात्री दोनच्या सुमारास त्यांना दाखल केले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वात अमित शाह यांच्यावर उपचार केले जात आहेत.


या महिन्याच्या सुरुवातीस, २ ऑगस्टला त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्टझाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमित शाह यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शाह यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी त्यांनी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे ट्विट केले.


''आज माझी कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो आणि माझ्या प्रकृतीसाठी ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली व माझ्या कुटुंबीयांना धीर दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आणखी काही दिवस मी होम आयसोलेशन मध्ये राहणार आहे. कोरोनाशी मुकाबला करण्याकरीता मला मदत करणाऱ्या आणि माझ्यावर उपचार करणाऱ्या मेदांता हॉस्पिटलातील सर्व डॉक्टर्स व स्टाफचेही आभार,'' असे ट्विट करत त्यांनी कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, रात्री उशिराने त्यांना त्रास जाणवू लागल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.




Powered By Sangraha 9.0