पुण्याच्या ‘वॉरिअर आजी’चे ट्रेनिंग सेंटर लवकरच सुरु होणार!

    दिनांक  17-Aug-2020 14:30:43
|
Sonu sood _1  H


अभिनेता सोनू सूदने दिलेला शब्द केला खरा!


पुणे : लाठ्याकाठ्यांचा पारंपरिक खेळ खेळून मोठ्यमोठ्याना अचंबित करणाऱ्या पुण्याच्या ८५ वर्षांच्या आजीबाई सोशल मीडियावर रातोरात चर्चेत आल्या. लाठ्याकाठ्या खेळ दाखवून पोटाची खळगी भरणाऱ्या या आजींची ओळख ‘वॉरिअर आजी’ अशी होऊ लागली. आजींचा व्हायरल व्हिडीओ बघितल्यानंतर शांताबाई पवार यांना मदत करण्याची इच्छा अभिनेता रितेश देशमुख, सोनू सूद यांनी व्यक्त केली होती. ‘या व्हिडीओतल्या आजी कोण? त्यांच्यासाठी मला ट्रेनिंग सेंटर सुरु करायचे आहे, जिथे त्या मुलींना, महिलांना स्वरक्षणाचे धडे देतील’, अशी इच्छा अभिनेता सोनू सूदने व्यक्त केली होती. सोनूने आपला शब्द पाळला असून लवकरच आजीचे ट्रेनिंग सेंटर सुरु होणार आहे. गणेशोत्सवाचा मुहूर्तावर आजीचे ट्रेनिंग सेंटर सुरु होणार आहे.


आजींचा व्हिडीओ बघितल्यानंतर “या आजींचे काही तपशील मिळू शकतील का? त्यांच्याबरोबर एक लहान प्रशिक्षण शाळा सुरु करायची आहे. जिथे त्या आपल्या देशातील महिलांना काही आत्मसंरक्षणाचे तंत्र शिकवू शकतील.” असे ट्वीट सोनू सूदने केले होते. त्यानंतर ‘निर्मिती’ संस्थेने ट्विटरवर शांताबाई पवार यांच्यासह फोटो शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली. “निर्मिती परिवारातील सदस्यांनी या ‘वॉरिअर आजी’ची भेट घेतली. शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे क्लास सुरु करण्याचे स्वप्न “निर्मिती फाऊंडेशन” येणाऱ्या बावीस ऑगस्टला सत्यात उतरवत आहे. सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाली असून लवकरच आजीचे हक्काचे व्यासपीठ त्यांना मिळणार आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.


कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने हातावरचे पोट असणाऱ्यांना प्रचंड हाल सोसावे लागले होते. यापैकीच एक या ‘वॉरिअर आजी’! पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करणाऱ्या या आजींनी या महामारीच्या काळात आपले घर चालवण्यासाठी पुण्याच्या रस्त्यांवर लाठ्याकाठ्यांचे खेळ दाखविण्यास सुरुवात केली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आजीचा व्हिडीओ करून तो सोशल मिडीयावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आजी चर्चेत आल्या. या व्हिडीओमुळेच आजींच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.