'लय भारी', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन!

17 Aug 2020 16:04:17
Nishikant kamat_1 &n


‘तुझी कायम आठवण येईल’ म्हणत अभिनेता रितेश देशमुखने वाहिली श्रद्धांजली!


मुंबई : ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले आहे. लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे निशिकांत कामत यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मावळली.


निशिकांत कामतने ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’ यासारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘जुली २’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’ सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात अभिनय केला होता.






 
 
अजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी दिग्दर्शन थांबवून केवळ अभिनेता म्हणूनच काम केले. निशिकांत कामत यांनी ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामतने ‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘फुगे’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनदेखील केले होते.
 
 
लिव्हर सोरायसिस या आजाराशी निशिकांत कामत गेल्या काही काळापासून झगडत होते. यातून ते बरेही झाले होते, मात्र काही कालावधी नंतर त्यांना पुन्हा हा त्रास सुरु झाला होता. हा त्रास वाढल्याने त्यांना हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभर या आजाराशी झुंज देताना त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अखेर सोमवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.







Powered By Sangraha 9.0