कोरोनामुक्त न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार!

17 Aug 2020 09:36:21
NewZealand_1  H



कोरोनामुळे न्युझीलंडच्या निवडणुका लांबणीवर!

ऑकलंड : कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडवर पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसने आक्रमण केले आहे. मागील २४ तासात न्यूझीलंडमध्ये १३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ६९ वर पोहोचली आहे. जून महिन्यात न्यूझीलंडने देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. तसेच न्यूझीलंडमध्ये १०२ दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने देशात शिरकाव केल्याने न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे, कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढल्याने न्यूझीलंडमधील सर्वसाधारण निवडणुका चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.


आरोग्यविषयक महासंचालक अॅशले ब्लूमफील्ड यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, सर्व नवे कोरोनाबाधित हे ऑकलंडमधील एक क्लस्टरशी संबंधित आहेत. यामधील एक मुलगा या महिन्याच्या सुरुवातील अफगाणिस्ताहून न्यूझीलंडमध्ये होता. सुरुवातीला तो कोरोना निगेटिव्ह होता. परंतु १४ दिवसांच्या क्वॉरन्टाईन कालावधीच्या बाराव्या दिवशी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. तेव्हापासून तो ऑकलंडमध्ये क्वॉरन्टाईन आहे. तर इतर १२ कोरोनाबाधित हे स्थानिक होते. नव्या कोरोनाबाधितांसह न्यूझीलंडमधील रुग्णांची संख्या आता १२७१ झाली आहे. त्यामध्ये ६९ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी शुक्रवारी ऑकलंड क्षेत्रात अलर्ट ३चा लॉकडाऊन आणि इतर ठिकाणी अलर्ट २चा लॉकडाऊन घोषित करुन २६ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन १२ दिवसांचा असणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत न्यूझीलंडने एक महिन्यांचा राष्ट्रीय अलर्ट ४च्या स्तरावरचा लॉकडाऊन केला होता. या कालावधीत एकही नवा रुग्ण न आढळल्याने जून महिन्यात कोरोना विरुद्धची लढाई जिंकणारा न्यूझीलंड पहिला देश बनला होता. परंतु १०२ दिवसांच्या अंतरानंतर मागील आठवड्याच्या सुरुवातीपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे.







Powered By Sangraha 9.0