केरळच्या 'राज्य फुलपाखरा'ची उत्तर कोकणातून दुर्मीळ नोंद

    दिनांक  17-Aug-2020 18:17:11
|

butterfly _1  H

पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ 

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) - केरळचे राज्य फुलपाखरु असणारे 'मलबार बॅण्डेड पिकाॅक' फुलपाखराची नोंद उत्तर कोकणातून करण्यात आली आहे. संगमेश्वरमधील देवरुखमधून या फुलपाखराची रविवारी नोंद करण्यात आली. साधारणत: गोव्यापर्यंत दिसणाऱ्या या फुलपाखराच्या उत्तर कोकणातील नोंदी या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत.


butterfly _1  H


 
 
'मलबार बॅण्डेड पिकाॅक' फुलपाखरु हे भारतातील तिसऱ्या क्रमाकांचे आकर्षक फुलपाखरु आहे. 'पिकाॅक' जातीच्या फुलपाखरांमधील तेे सर्वात वेगाने उडणारे फुलपाखरु मानले जाते. जगात केवळ पश्चिम घाटामध्ये सापडणारे हे फुलपाखरु (प्रदेशनिष्ठ) केरळच्या उत्तरेपासून गोव्याच्या दक्षिणेपर्यंत प्रामुख्याने आढळते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये 'मलबार बॅण्डेड पिकाॅक' फुलपाखराच्या दुर्मीळ नोंदी महाराष्ट्रातूनही करण्यात आल्या आहेत. रविवारी हे फुलपाखरु संगमेश्वरमधील देवरुखचे रहिवासी आणि निसर्ग निरीक्षक प्रतीक मोरे यांना आढळून आले. मोरे यांनी घराच्या आवारात तयार केलेल्या फुलपाखरु उद्यानात हे फुलपाखरु बागडताना दिसले. उत्तर कोकणात हे फुलपाखरु आढळल्याची ही आजवरची चौथी नोंद आहे. यापूर्वी देखील मला 'मलबार बॅण्डेड पिकाॅक' फुलपाखरु देवरुखमध्ये उडताना दिसल्याची माहिती प्रतीक मोरे यांनी दिली. मात्र, रविवारी प्रथमच या फुलपाखराचे जवळून दर्शन घेऊन त्याचे छायाचित्रे काढण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
 


 
 
मोरे यांनी आपल्या फुलपाखरु उद्यानातून ८३ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद केली आहे. यापूर्वी 'मलबार बॅण्डेड पिकाॅक' फुलपाखराची नोंद तळकोकणातून झाली आहे. २०१० मध्ये फुलपाखरु अभ्यासक हेमंत ओगले यांना सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये हे फुलपाखरु आढळून आले होते. त्यानंतर २०१५ मध्ये प्रणव गोखले यांनी या फुलपाखराची चिपळूणमधील ताह्मनमळा येथून नोंद केली होती. चीर फळाची झाडे या फुलपाखराच्या अळ्यांची खाद्य वनस्पती आहे. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या हंगामात ही फुलपाखरे दिसून येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस कोषातून ही फुलपाखरे बाहेर पडतात. यामधील नर फुलपाखरु दुपारी आणि संध्याकाळी उडताना पाहावयास मिळते. मादी फुलपाखरु उन्हात उडणे पसंत करत नाही. लॅटना आणि पागोडा फ्लाॅवर (क्लेरोडेन्ड्रम पॅनीक्युलम) या झाडांवर ही फुलपाखरे आकर्षित होतात. महत्त्वाचे म्हणजे 'वन्यजीव संरक्षण कायद्या'मध्ये दुसऱ्या श्रेणीत 'मलबार बॅण्डेड पिकाॅक' फुलपाखराला संरक्षण देण्यात आले आहे. 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.