हे असे किती काळ चालत राहायचे?

17 Aug 2020 22:17:46

vicharvimarsh_1 &nbs



हिंदू समाज, हिंदू देवदेवता, हिंदूंची श्रद्धास्थाने यांच्यावर आघात करण्याचे जे प्रयत्न जिहादी तत्त्वांकडून सुरु आहेत ते थांबणार कधी? हे असेच किती काळ चालू राहायचे?



काही दिवसांपूर्वी बंगळुरू शहरात एका फेसबुक पोस्टवरून हिंसाचार उसळला. हिंसाचार करणार्‍या समाजकंटकांना काहीतरी निमित्त हवे होते आणि ते मिळताच शहराच्या एका भागात हिंसाचाराचा भडका उडाला. बंगळुरू शहरातील काँग्रेसचे दलित आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या पुतण्याने फेसबुक पेजवर प्रेषित महंमद पैगंबर यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याचे निमित्त झाले आणि हिंसक जमावाने त्या काँग्रेस आमदाराचे घर जाळून टाकले. पोलीस स्थानकावर हल्ला करून ते पेटविले. अनेक वाहने पेटवून दिली. पत्रकारांवर हल्ले करण्यासही त्या जमावाने मागेपुढे पाहिले नाही. आपल्या देशात कायद्याचे राज्य असताना मुस्लीम समाजातील काही धर्मांध शक्ती कायदा हातात घेण्याचे साहस कसे काय करतात? दिल्लीमध्ये शाहीनबाग परिसरात ‘सुधारित नागरिकत्व कायद्या’स विरोध करण्याच्या निमित्ताने उसळलेली दंगल असो किंवा मुंबईत काही वर्षांपूर्वी रोहिंग्या मुसलमानांना पाठिंबा दर्शविण्यासाठी रझा अकादमीच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा असो, त्या मोर्चात सहभागी झालेल्यांनी असाच कायदा हातात घेतला होता. वीर जवानांच्या स्मारकावर लाथा मारून अवमान करण्यापर्यंत त्या गुंडांची मजल गेली होती. एवढेच नव्हे, तर सदर मोर्च्याच्या बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचे दुःसाहस मोर्च्यातील गुंडांनी केले होते. आपल्या धर्माविरुद्ध काही आक्षेपार्ह घडले की मुस्लीम समाजातील धर्मांध लगेच दंगली पेटविण्याशिवाय अन्य कोणताच कायदेशीर मार्ग हाताळताना दिसतच नाहीत.


बंगळुरू शहरातही अलीकडे असाच प्रकार घडला. तेथील काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या पुतण्याने फेसबुक पेजवर प्रेषितांसंदर्भात कथित आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून मुस्लीम समाजातील काहींची डोकी भडकली. काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती हे दलित समाजाचे असून ते आपल्या मतदार संघातून सातत्याने निवडून येत आहेत. मुस्लीम जमावाने त्यांच्या घरावर हल्ला केला आणि ते जाळून टाकले. तेवढ्यावरच जमाव थांबला नाही. जमावाने के. जी. हळळी पोलीस स्थानकावर हल्ला केला. मुस्लीम जमाव दगडफेक करीत होता, जाळपोळ करीत होता, आजूबाजूच्या इमारतींवरून पोलिसांवर हल्ले केले जात होते. अग्निशामक दलाच्या गाड्याही जमावाच्या हल्ल्यांमधून वाचल्या नाहीत. रस्त्यावरून जाणार्‍या लोकांवरही, ते कोणत्या धर्माचे आहेत याची विचारणा करून आणि ते मुस्लीम नसल्याची खात्री पटल्यावर त्यांच्यावर हल्ले करीत होते, अशी माहिती बाहेर आली आहे. जमावाने अगदी पूर्वनियोजित पद्धतीने हा हल्ला केला असल्याचे पोलिसांनीही म्हटले आहे. जमावाने आगी लावण्यासाठी पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि पेंट थिनरचा वापर केला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये आढळून आले आहे. बंगळुरूमध्ये जो हिंसाचार उसळला, त्यासंदर्भात आतापर्यंत ३०९जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काहींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


आपल्या घरावर जो हल्ला झाला, त्याबद्दल बोलताना आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांनी सांगितले की, “मी गेली २५ वर्षे या भागात राहणार्‍यांना मुस्लीम समाजास माझ्या भावासारखे समजत होतो. तरीही माझे ५०वर्षांचे घर जाळून टाकण्यात आले. मी आमदार असताना आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक मतांनी मी विजयी झालो असताना, माझी जर अशी अवस्था होत असेल तर बाकीच्यांविषयी न बोललेच बरे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आपण पुलकेशीनगर मतदार संघातून चार वेळा निवडून आलो आहोत. येथील मुस्लीम मतदारांशी माझे चांगले संबंध आहेत. या दंगलीला कोणी ‘बाहेरच्यांनी’ चिथावणी दिल्याने ही घटना घडली, असेही या काँग्रेस आमदारांनी सांगितले. आपल्या घरावर जो हल्ला झाला त्याची माहिती पत्रकारांना देताना अखंड श्रीनिवास मूर्ती यांना अश्रू अनावर झाले होते. बंगळुरूमधील घटनेचे पडसाद कायम असताना त्यात तेल ओतण्याचे काम उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील एका मुस्लीम नेत्याने केले. अखंड मूर्ती यांच्या पुतण्याचे नाव नवीन आहे. नवीनला मारण्यासाठी मेरठच्या त्या व्यक्तीने जाहीरपणे ५५ लाख रुपयांचे इनाम घोषित केले आहे. वृत्तवाहिन्यांवरील बातम्यामध्येही त्या माणसाची छबी झळकली आहे. बंगळुरूमध्ये ११ ऑगस्ट रोजी जी दंगल झाली, त्याबद्दल, ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’कडे बोट दाखविले जात आहे. त्या संघटनेच्या कार्यालयावरही पोलिसांनी छापा टाकला आहे. ही दंगल घडविण्यामागे नेमके कोण आहेत, त्याचा छडा लावणे अत्यावश्यक आहे. आपल्या धर्माविरुद्ध काही आक्षेपार्ह घडले तर कायदा हातात घेण्याचा अधिकार मुस्लीम समाजास कोणीही दिलेला नाही. अल्पसंख्याक आहेत म्हणून तुम्ही काहीही करा, तुमच्यावर काहीही कारवाई होणार नाही, असा जो मुस्लीम समाजाचा समज झाला आहे, तो बाजूला करून त्या समाजास कायद्याची बूज राखण्यास शिकवायला हवे!


शृंगेरीमध्ये आद्य शंकराचार्यांचा अवमान!


आद्य शंकराचार्य यांच्या नावाशी निगडित शृंगेरी हे स्थान हिंदू समाजासाठी पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्या शहरामध्ये असलेला शंकराचार्य यांच्या पुतळ्याचा अवमान करण्याची घटना उजेडात आली आहे. शंकराचार्य यांच्या पुतळ्याच्या वर असलेल्या मेघडंबरीवर काही जिहादी तत्त्वांनी इस्लामी झेंडा लावल्याचे आढळून आले. त्या घटनेचे शहरामध्ये तीव्र पडसाद उमटले. बंगळुरूमधील घटना ताजी असतानाच असा प्रकार घडल्याचे आढळून आले. जिहादी तत्त्वे राज्यातील जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. जो झेंडा तेथे गुंडाळण्यात आला होता, त्यावर अरेबिक भाषेत काही मजकूर लिहिलेला होता. ही घटना कळतच हिंदू समाजाने त्याचा निषेध केला. तसेच हे कृत्य करणार्‍यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. या घटनेसंदर्भात पोलिसांनी दोघं मुस्लिमांना अटक केली आहे. पण, हे कृत्य कोणी तरी दारूच्या नशेत केले आहे. त्यास जातीय रंग दिला जाऊ नये, असे स्पष्टीकरण देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. कर्नाटकचे मंत्री सी. टी. रवी यांनी हे कृत्य करणार्‍यांना कठोर शासन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. शृंगेरीमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात ‘पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया’ आणि त्या संघटनेशी संबंधित संघटनेचे नाव घेतले जात आहे. हिंदू समाजासाठी पवित्र असलेल्या तीर्थस्थानी हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याचे प्रकार थांबणार की नाही?

आखाती देशामध्ये हिंदू देवतांची विटंबना

भारतात हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याचे प्रयत्न जिहादी तत्त्वांकडून केले जात असतानाच आखाती देशांमध्ये हिंदूंच्या देवतांची विटंबना करण्यात आल्याची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. बहारीनमधील एक दुकानांमध्ये असलेल्या गणेशमूर्ती दोन बुरखाधारी महिलांनी जमिनीवर फेकून त्या मूर्तीचे तुकडे तुकडे केल्याचे त्या चित्रफितीमध्ये दिसत आहे. अत्यंत थंड डोक्याने हे कृत्य सदर महिलेने केल्याचे दिसून येते. त्या घटनेसंदर्भात बहारीन सरकारने त्या महिलेवर कारवाईचा बडगा उगारला आहे आणि भारतानेही यासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू समाज, हिंदू देवदेवता, हिंदूंची श्रद्धास्थाने यांच्यावर आघात करण्याचे जे प्रयत्न जिहादी तत्त्वांकडून सुरु आहेत ते थांबणार कधी? हे असेच किती काळ चालू राहायचे?
Powered By Sangraha 9.0