पंगतीतलं पान

    दिनांक  16-Aug-2020 16:05:51
|
Best seller book in marat
 
 


जुलै २०१८ च्या ‘ललित’च्या अंकात ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ जाहीर केली होती. प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडेंची बहुचर्चित ‘हिंदू’ कादंबरी वाचायची आणि त्यावर आधारित कादंबरी लिहायची. पण, ‘हिंदू’चा पूर्वार्ध लिहायचा नाही, त्याचप्रमाणे ‘हिंदू’चा उत्तरार्धही लिहायचा नाही. ‘हिंदू’मध्ये असंख्य उपकथानकं विखुरलेली आहेत. त्यातील एका उपकथानकावर स्वतंत्र कादंबरी लिहायची. अशी ही अभूतपूर्व स्पर्धा! या स्पर्धेची शेवटची तारीख होती ३१ डिसेंबर, २०१८. माननीय मधु मंगेश कर्णिक, प्रा. डॉ. विलास खोले आणि प्रा. रंगनाथ पठारे यांच्या निवड समितीने प्रा. अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या कादंबरीची एकमुखाने पहिल्या बक्षिसासाठी शिफारस केली. ही कादंबरी लवकरच ‘’मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस मुंबई’तर्फे प्रकाशित होत आहे. त्यातले एक प्रकरण.
 
 
भीमा मावशी गुलाबला वाढता वाढता विचारत होती , “बाबू रे. आता लयं झालं आसं सड्यासारखं हिंडनं. लगीन कर. ते किरड गावचे लोकं तं चकरा मारू मारू परेशान हायेत. त्यांचं मामकूळ बी लय वरचं आहे. शाळीग्राम पाटील सांगत होता तुया मौशाले की, हे हातचं जाऊ देऊ नका. तू काहून लगीन करत नाई?”
 
 
गुलाबला या प्रश्नाचे समर्पक उत्तर कधी देता आले नाही. कारण, त्याच्याजवळ या प्रश्नाचे समर्पक उत्तर नव्हतेच. त्याला या भागातली मुलगी करण्याची हिंमत होत नव्हती. तिला आपले हे रिसर्च, कॉन्फरन्स, पीएच.डीचा अभ्यास वगैरे प्रकरण कितपत झेपेल याची त्याला शंका होती. मुंबई/ दिल्लीतील त्याच्या आजुबाजूच्या मुली त्याला फारशा आवडत नव्हत्या. तोे मुंबईच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये जेव्हा एम.ए. करत होता तेव्हा आजूबाजूला भरपूर मुली होत्या. त्यातल्या निम्म्याहून अधिक महाराष्ट्राबाहेरच्या होत्या. केस कापलेल्या, लिपस्टीक लावणार्‍या, तोकडेे कपडे घालणार्‍या, त्यातल्या काही तर धु्रमपान करणार्‍या होत्या. अशी मुलगी फुलगावच्या धांर्डेपाटलाच्या वाड्यावर ‘पाटलीणबाई’ म्हणून कशी न्यायची? एक वेळ तो न्यायला तयार होईल पण त्यातली एकतरी यायला तयार झाली असती का?
 
 
या कशमकशमध्ये गुलाब पंचविशीला आला तरी लग्न झालेले नव्हते. आजकाल तर त्याला वाटायला लागले की असेच राहावे. सुदैवाने साहेबराव आहेत धांर्डेपाटलांचे नाव पुढे चालवायला. साहेबराव व त्याच्यात पाटलांच्या पोरात असते तशी भांडणं कधीच नव्हती. उलटपक्षी अपवादात्मक ठरेल असा जिव्हाळा होता. कदाचित गुलाब इस्टेटीत कधी वाटा मागायचा नाही, असे साहेबरावला वाटत असावे.
 
 
साहेबरावच्या पत्नीला, मायावहिनीला सर्व इस्टेट आपल्यालाच मिळावी असे वाटायचे. तिला मुलगा झाल्यापासून तर तिची खात्रीच झाली होती की हे सर्व आता तिचे व तिच्या मुलांचे आहे. तिला का कोण जाणे वाटायचं की गुलाब लग्न करणार नाही व तिकडेच शहरात रमेल. म्हणजे मग सर्व आपोआप तिचे व तिच्या मुलांचेच.
 
 
गुलाबच्या जाण्याचा दिवस पक्का झाल्यापासून तो आनंदात होता, सर्वांशी प्रेमाने बोलत होता. अगदी आई व वडिलांशीसुद्धा दोनचारदा प्रेमाचा वार्तालाप झाला. तो विद्येच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात रमायला लागला तेव्हापासून आईवडिलांपासून दूर गेला. महिन्या/दोन महिन्यांतून एखादे खुशालीचे पत्र यापलीकडे त्याचा घराशी काही संबंध नसायचा. कधीकधी साहेबरावाचे पत्र येत असे. ‘हुरडा आला आहे, ये’, ‘सोनपूरच्या नारायण पाटलाची मुलगी अमरावतीला बी. ए़़. करतेय. ये लवकर. बघण्याचा कार्यक्रम करू व जमलं तर बार उडवू’ वगैरे आशयाची पत्रं असायची. गुलाब कधी उत्तर द्यायचा तर कधी नाही. साहेबरावाने कधी त्याचा राग धरला नाही.
 
 
गुलाब दिल्लीला जाण्याअगोदर गावातल्या मित्रांना पार्टी देणार होता. एका रात्री त्यांची पार्टी सुरू झाली. पार्टीतील भान्या, गणपत, प्रकाश, सुभाष त्याच्याबरोबर नगरपालिकेच्या शाळेत होते. भान्या व गणपत गुलाबचे खास दोस्त होते. पक्याने सातवीत तर सुभाषने दहावीत शाळा सोडून शेती करायला लागले होते. सुभाष थोडा महत्त्वाकांक्षी होता. त्याच्याकडे ५० एकर कोेरडवाहू जमीन होती. तो तालुक्यात शेतकरी संघटेनेचे काम करायचा. म्हणून त्याच्या छातीवर सतत शेतकरी संघटनेचा बिल्ला असायचा.
 
 
त्यांची प्रत्येकाची एकेक क्वार्टर संपली होती. एकेक जण मोकळा झाला होता. “गुलाब भौ. तुले सांगतो, सरकार कोनत्याबी पक्षाचं असो, कास्तकाराचं मरन नक्की आसतं. कास्तकाराले जीतं मारनंं सुरू हाय भौ. तू कोनता बी पेपर काड. हर दीन दोन चार शेतकर्‍यांच्या आत्महत्याच्या बातम्या असतातच.”
 
 
हा सुभाषचा आवडता विषय होता. “आरं पन सायाचे हो. येवडी आंदोलनं करता, मारे दिर्ल्लीफिल्लीले बी जाता, मंग एकदाचं सोडवून का टाकत नाही? गुलाब भौ. तुले सांगतो, सालं पानी पडो ना पडो, पन हर साल याहीचं आंदोलन हायेच. काय मस्करी हाय काय?’
 
 
’पक्या, तुुह्या सारक्या कास्तकारानीच तं आंदोलनाले येश भेटत नाही. गुलाबभौ, याहीले घर बसल्या कापसाचे, तुरीचे भाव वाडवून पायजे. आसं कुटं होतं बी? आँ? आरं, त्यासाटी आंदोलनात शामील व्हावं, एकीने राहावं; तं हा पक्या शेट गावात माणीकचंद खात, गांडीले वारं घालत पडेल आसते. अशानं कुटं जमते बी?”
 
 
गुलाबला आठवले की, १९८०च्या दशकात महाराष्ट्रात शरद जोशी हे नाव गाजायला लागले होते. त्यांनी ‘शेतकरी संघटना’ स्थापन करून ‘रास्ता रोको’, ‘रेेल रोको’ वगैरे अभिनव पद्धतीची आंदोलनं केली होती. तेव्हासुद्धा शरद जोशी ही ब्राह्मण व्यक्ती कास्तकारांचे नेतृत्व कशी करते, याबद्दल चर्चा रंगायच्या. एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला जोशीबुवांच्या आंदोलनाचे वारं पार पडले होते. त्यांच्या संघटनेच्या चिरफळ्या उडाल्या होत्या.
 
 
गुलाबला अशा गप्पांत रस होता आणि नव्हताही. त्याच्या या लोकांबद्दल भावना ज्याला ‘अ‍ॅम्बिव्हॅलंट’ म्हणतात, तशा होत्या. त्यांच्यात उठबस करताना त्याला आपण एका प्राचीन कृषी संस्कृतीचा भाग आहोत याचे भान यायचे, आनंद आणि अभिमानसुद्धा वाटायचा. पण जर तो यांच्यात १५-२० दिवस राहिला तर त्याला यातला सडकेपणा, कुपमंडूक वृत्ती त्रस्त करत असे.
 
 
त्याला एक मात्र दिसत होते की, आज शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली असल्यामुळे ग्रामीण भागातली सत्ता समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. आरक्षण, दलित आणि स्त्रियांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमुळे आर्थिक सुबत्ता दिसत होती. त्याच्या भागातल्या एखाद्या गावी त्याच्या लहानपणी एक मोटारसायकल दिसत असे, तेथे आता घरटी कमीतकमी एक मोटारसायकल दिसते.
 
 
परवा रात्री तो तांबट आळीतून येत होता तेव्हा त्याने मोजल्या तरी तब्बल पंधरा मोटारसायकली तेथे दिसल्या. प्रत्येेक मोटारसायकलची किंमत ५० हजार रूपये धरली तर तेथे साडेसात लाख रूपये उभे दिसत होते. या सुबत्तेने त्याला एकीकडून आनंद जरी होत असला तरी दुसरीकडून त्याला हातातून निसटत असलेल्या सत्तेबद्दल वाईटही वाटत होते. एके काळी फक्त काशाकाकाची बुलेट ३५० गावात फिरत असे. काशाकाकाच्या रॉयल एनफिल्डचे फायरिंग दोन मैलावरून ऐकू येत असे. आता या नव्या गदारोळात ते सर्व विरघळले होते.
 
 
 
गुलाब दिल्लीत पोहोचला तेव्हा दुपारचे २ वाजले होते. स्टेशनच्या बाहेर आल्यावर त्याला ठिकठिकाणी राजमा चावल, छोले भटुरे, आलू पराठे व सामोसे विकणार्‍या गाड्या दिसल्या आणि त्याचे मन आनंदाने नाचू लागले. त्याला हे सर्व प्रिय होते, दिल्ली फार प्रिय होती आणि दिल्लीतले बौद्धिक वातावरण तर अतिप्रिय होते.
 
 
तो चटकन एका हातगाडीवर गेला, एक आलू पराठ्याची ऑर्डर दिली व दिल्लीत असल्याबद्दल स्वतःचाच हेवा करू लागला. त्याला आधुनिक जीवनातील वेगवान प्रवासाची गंमत वाटत होती. काल या वेळी आपण फुलगावला होतो आणि आज देशाच्या राजधानीत आहोत. त्याला वसंत आबाजी डहाकेच्या एका कवितेतल्या ओळी आठवल्या. ‘ही चाकं माणसाचं स्थैर्य शोषून घेतात’ असा काही तरी आशय व्यक्त करणारी कविता होती ती. गुलाबला त्यातला निराशेचा सूर खटकला होता. त्याला वाटायचे की चाकं आहेत म्हणून तर आधुनिक मानव एका वाईट अनुभवातून, एका वाईट वातावरणातून चटकन दुसर्‍या, नव्या, आश्वासक वातावरणात जाऊ शकतो.
 
 
 
तो ‘स्कूल ऑफ सोशियोलॉजी’च्या आवारात मागच्या दाराने आत शिरला जेथून पुरुष विद्यार्थ्यांचे हॉस्टेलजवळ होते.
“ओय गुलाब की गल है? काके, तू अभी आ रहा है क्या?” त्याचा रूम पार्टनर सुखबीरसिंग विचारत होता. गुलाबने रूम उघडता उघडता थोडक्यात कहाणी सांगितली. सुखबीर त्याची बॅग उचलत आत आला व म्हणाला, “अब समान ऐसा ही रहने दे और जल्दीसे तैय्यार हो जा. मेसमध्ये चलते है. आज खानेमे चिकन होगा.”
 
 
जेवून आल्यावर रूमवर आल्यावर गुलाबने गिझर सुरू केला व बॅग रिकामी करायला सुृरूवात केली. सर्व काही आवराआवर झाल्यावर त्याने मस्तपैकी ताणून दिली. संध्याकाळी त्याने लायब्ररीत लावलेल्या नोटिसेस वाचल्या. त्याला तेथे पुढच्या आठवड्यात होत असलेल्या एका सेमिनारची सूचना दिसली, ते जातीव्यवस्थेबद्दल होती. त्याने सेमिनारची वेळ व कोणत्या हॉलमध्ये होणार आहे, याची मनात नोंद केली.
 
 
संध्याकाळचे ०७ वाजत आले होते. ‘स्कूल ऑफ सोशिऑलॉजी’ चा कॅम्पस एव्हाना शांत झाला होता. गुलाबला ही वेळ फार आवडायची. अनेक शक्यता पोटात असलेली ही वेळ, ही शांतता. ती वेळ साधारण अर्धापाऊण तास टिकायची.त्याला जातीव्यवस्थेबद्दल कॉलेजपासून कुतूहल होते. एखादी सामाजिक संस्था किती चिवट असू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतातील जातीव्यवस्था. अमेरिकेतील गुलामी हळूहळू का होईना संपली. आधी कायदा करून संपली आणि नंतर शिक्षण, आर्थिक विकास वगैरे घटकांनी जवळपास संपुष्टात आणली.
 
 
तसं जातीव्यवस्थेचे झालेले नाही. आपल्याकडेसुद्धा कायदे झालेले आहेत, अनेक दलित कुटुंबांचा आर्थिक विकास दणक्यात झालेला दिसून येतो. हा विकास फक्त शासकीय नोकर्‍यांतून झाला असे नाही तर पुण्याच्या मिलिंद कांबळेंच्या ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ च्या (डिक्की) मते, आता दलित उद्योजकांची संख्या वाढत आहे. गुलाबने ठरवले की पुढच्या वेळी पुण्याला जावे आणि या मिलिंद कांबळेंना भेटावे. त्यांची मुलाखत घ्यावी आणि त्यांच्याकडून डाटा घ्यावा.
 
 
ही एक बाजू झाली. दुसरीकडे जातीव्यवस्था अधिकाधिक घट्ट होत असल्याचे दिसत आहे. असे का, याचे अभ्यासावर आधारित उत्तर देता आले पाहिजे. ही व्यवस्था भारतभर आहे. सुखबीरसिंग सांगत होता की, जरी शीख धर्मात जातीव्यवस्था नसली तरी समाजजीवनात आहे. गुलाब सुखबीरसिंगबरोबर काही महिन्यांपूर्वी अमृतसरचे सुवर्ण मंदिर बघायला गेला होता, तेव्हा त्याने प्रत्यक्ष तेथील जातीव्यवस्था बघितली होती. ते दोघे सायकलरिक्षात फिरत होते.
 
 
जेवणाची वेळ झाली होती. ते एका ढाब्यासारख्या हॉटेलात गेले व जेवण मागवले. गुलाबने वेटरला सांगितले की तीन ताटं आण, आमच्याबरोबर आमचा रिक्षावालाही आहे. सुखीबीर काही बोलला नाही व खाली मान घालून जेवू लागला. गुलाबने पाचदहा मिनिटं वाट पाहिली. रिक्षावाला जेवायला आत आला नाही. गुलाबने रागारागाने वेटरला विचारले तर त्याने सांगितले की, रिक्षावाला बाहेर जेवत आहे. तेव्हा सुखीदरने सांगितले की तोे दलित समाजातला आहे व तो आत येऊन जेवणार नाही. गुलाबला आश्चर्य वाटले. जरी धर्मतत्त्वांमध्ये जातीव्यवस्थेचा उल्लेख किंवा समर्थन नसले तरी सर्व समाजांत तिचे अस्तित्व आढळतेच.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.